भारतातील वस्त्रोद्योगातील तांत्रिकतेत २००६ ते २०११ दरम्यान वार्षिक सरासरी ११% वृद्धिदराने वाढ होत आली आहे आणि २०१२ ते २०१७ दरम्यान हा दर २०% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ते गुंतवणुकीसाठी अत्यंत योग्य क्षेत्र ठरले आहे. वाढती उत्पादन पातळी, आधुनिकीकरण आणि शहरीकरण त्याबरोबर शेती आणि बांधकाम विभागातील मजुरांची कमी झालेली उपलब्धता यांच्यामुळे वस्त्रोद्योगासारख्या रोजगारप्रवण क्षेत्रालाही स्वचालन व तंत्रज्ञानाची कास धरावी लागली. या पाश्र्वभूमीवर भारतासह इटली, जपान, स्वीडन, ब्रिटन आणि अमेरिकेतील १३० पेक्षा जास्त प्रदर्शकांचा सहभाग त्याबरोबरच बेल्जियम, चीन, फ्रान्स आणि जर्मनीतील नवनवीन उत्पादने, सेवा आणि वस्त्रोद्योगातील तंत्र-तंत्रज्ञान तसेच नॉन वोव्हनमधील तंत्रज्ञान दाखवणारे ‘टेकटेक्स्टाइल इंडिया २०१३’ हे प्रदर्शन येत्या ३-५ ऑक्टोबर २०१३ दरम्यान गोरेगावस्थित मुंबई प्रदर्शन संकुलात योजण्यात आले आहे. जगभरातून ४,००० हून अधिक व्यावसायिक प्रदर्शकांनी भेट देणे अपेक्षित असलेले हे प्रदर्शन म्हणजे वस्त्रोद्योगातील सरकारी विभागाचे प्रतिनिधी, कंपन्यांचे मुख्याधिकारी आणि तंत्रज्ञांचा महामेळावाच ठरेल. प्रदर्शनाला सहकार्य करणाऱ्या नॅशनल ज्यूट बोर्ड (एनजेबी), इंडियन टेक्निकल टेक्सटाइल्स असोसिएशन (आयटीटीए) आणि टेक्प्रोसिल यांची प्रदर्शनात दालने असतील.

Story img Loader