हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।। हा चरण बुवांनी पुन्हा एकवार उच्चारला.. अन् ते म्हणाले..
बुवा – श्रीसद्गुरूंच्या कृपेनंच अंत:करणात त्यांचं ध्यान साधेल..
योगेंद्र – मग ‘आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे’.. बुवा हे माजघर म्हणजे काय हो? म्हणजे या चरणात अभिप्रेत असलेलं ‘माजघर’ कोणतं असावं?
अचलदादा – माजघर या शब्दाचा अर्थ घराचा मध्यभाग.. तिथं अगदी मोजक्या लोकांना प्रवेश असतो.. अंगणात आणि ओसरीवर सर्वाना मुक्त प्रवेश असतो, पण माजघराचं तसं नसतं.. आताच्या शहरीकरणात ओसरी, पडवी, माजघर या शब्दांचे अर्थच लोकांच्या स्मरणातून अस्तावले आहेत म्हणा..
बुवा – माजघर हा शब्द ‘माजिवडा’ या शब्दावरून आला, असं वाटतं.. माजिवडा म्हणजे मध्यभाग. ‘ज्ञानेश्वरी’त ज्ञानी पुरुषाच्या वर्णनात हा शब्द आला आहे.. माउली सांगतात, ‘‘तैसें ऐक्याचिये मुठी। माजिवडें चित्त किरीटी। करूनि वेधी नेहटीं। आत्मयाच्या।।’’ भगवंत अर्जुनाला सांगताहेत की, हा ज्ञानी जो आहे तो नेहमी ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून त्याला आत्मवेधी राखतो!
हृदयेंद्र – वा! ऐक्याच्या मुठीत चित्त राखतो.. काय रूपक आहे..
बुवा – तर सद्गुरूऐक्यामध्ये चित्त एकवटून आत्मवेध साधत राहिला पाहिजे.. माउलींनी आणखी एके ठिकाणी माजघर हा शब्द वापरलाय बरं का! तेराव्या अध्यायात आत्मस्वरूपस्थ पुरुषाचं वर्णन करताना तो जे ब्रह्मसुख भोगत असतो त्याचं वर्णन आहे.. आता मूळ मुद्दा असा की ज्ञानी आणि आपल्यासारखी सामान्य माणसं, यांच्यात नेमका काय फरक आहे? जसा माझ्यासारख्या सामान्य माणसाला हाडामांसाचा देह लाभला आहे, तसाच त्यालाही लाभला आहे.. माझ्यासारखेच हात-पाय, कान-नाक-डोळे त्याला आहेत.. बाह्य़रूपानं तो तसाच आहे, पण खरा भेद आहे तो आंतरिक स्थितीत! माझी आंतरिक स्थिती भेदसहित आहे तर त्याची भेदरहित, अभेद आहे!! या देहापासून सुरुवात करून माउली फार सुरेख शब्दांत सांगतात, ‘‘हे गुणेंद्रिय धोकौटी। देह धातूंची त्रिकुटी। पाच मेळावा वोखटी। दारूण हे।।’’ हे शरीर म्हणजे तीन गुण आणि इंद्रियांची धोकटी अर्थात पिशवी आहे आणि वात, पित्त, कफ या धातूंचं त्रिकूट इथं जमलं आहे.. पंचतत्त्वांनी बनलेलं हे शरीर बलवान आहे.. ‘‘हे उघड पांचवेउली। पंचघा आंगीं लागली। जीव पंचानना सांपडली। हरिणकुटी हे।।’’ हा देह म्हणजे जणू उघड उघड पाच नांग्यांची इंगळीच आहे! याला पाच प्रकारचे अग्नी लागले आहेत आणि जीव आणि आत्मा या देहाच्या सापळ्यात सापडला आहे.. ‘‘परि इये देहीं असतां। जो नयेचि आपणया घाता। आणि शेखीं पंडुसुता। तेथेंचि मिळे।।’’ तथापि अर्जुना, जो ज्ञानी आहे तो याच देहात असूनही देहबुद्धीत फसून आपला घात करून घेत नाही, उलट ब्रह्मपदालाच जाऊन मिळतो.. मग विलक्षण विशेषणांनी या ब्रह्मपदाचं वर्णन करताना माउली म्हणतात.. ‘‘जें आकाराचें पैल तीर। जें नादाची पैल मेर। तुर्येचे माजघर। परब्रह्म जें।।’’ सगळे आकार जिथे मावळतात असं हे आकाराचे पैल तीर आहे जणू..
योगेंद्र – वा!
बुवा – हे परब्रह्म आकाराच्या पलीकडल्या काठावर आणि नादाच्या पलीकडील कडय़ावर तुर्यावस्थेच्या माजघरात असते!
हृदयेंद्र – तुर्येचं माजघर!
बुवा – तर सर्वसामान्य माणसासारख्याच हाडामांसाच्या देहातच या ब्रह्मसुखाचा लाभ या ज्ञान्याला होतो! ‘‘तें सुख येणेंचि देहें। पाय पाखाळणिया लाहे’’ आता सांगा.. देह तसाच आहे, पण त्याच देहात एकजण ब्रह्मसुख भोगतो आहे तर एक प्रारब्धदु:ख भोगतो आहे! याचं कारण एकच.. आंतरिक स्थिती आणि आंतरिक वाटचालीतली भिन्नता!! ज्याची आंतरिक स्थिती केवळ सद्गुरूऐक्यता आहे आणि आंतरिक वाटचाल त्यांच्याच बोधानुरूप सुरू आहे त्याच्याच देहरूपी घराच्या माजघरात.. म्हणजे अंत:करणाच्या अगदी आतल्या कप्प्यात तोच सद्गुरू भरून आहे.. हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे!!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा