राज्याच्या अर्थसंकल्पात जलयुक्त शिवार अभियानासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षभरापासून महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून सरकार त्याकडे पाहात आहे. राज्यातील मराठवाडा आणि अन्य काही भागातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर जलसंपदा विभागाने राज्यभर १६ मार्चपासून सुरू केलेल्या जलजागृती सप्ताहाचा समारोप जागतिक जलदिनी म्हणजे २२ मार्च रोजी होणार आहे. ‘माती अडवा आणि पाणी जिरवा’ असा संदेश देऊन त्या अनुषंगाने प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबविणाऱ्या जालना कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियंता यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची दखल घेत असतानाच जलयुक्त अभियानाच्या यशस्वितेसाठी पाणलोट क्षेत्रात ‘माथा ते पायथा’ पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त केली आहे.
मराठवाडा शेती साहाय्य मंडळाच्या जालना शहराजवळील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या मते मशागतीमुळे शेतीतील मातीची उलथापालथ आणि ज्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण वाढते. जमिनीच्या वरच्या भागातील माती वाहून जाताना त्यासोबत पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटकही वाहून जातात. ‘नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सव्‍‌र्हे लॅण्ड युज प्लॅनिंग’ संस्थेच्या अभ्यासात आणि पाहणीत ही बाब स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राने १९९४ मध्ये जालना तालुक्यातील कडवंची गावाची पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी निवड झाली. ‘माती अडवा आणि पाणी जिरवा’ हे सूत्र ठेवून इण्डो जर्मन पाणलोट विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत कडवंची गावात शेतीची बांधबंदिस्ती, समतल चर, पीक नियोजन, पाण्याचा योग्य वापर या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न आणि स्थानिक शेतक ऱ्यांच्या सक्रिय परिश्रमातून कडवंचीचा कृषी विकास झाला. राज्यातील प्रादेशिक असमतोलाच्या संदर्भातील केळकर समितीने २०१३ मध्ये राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात कडवंची परिसरात पाणी व्यवस्थापन आणि अन्य प्रयत्नांमुळे झालेल्या कृषी विकासाचा उल्लेख केलेला आहे.
सेवानिवृत्तीनंतर जालना कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमाशी स्वत:स जोडून घेणारे प्रा. बी. वाय. कुळकर्णी यांच्या मते शेतातील माती शेतातच अडविणे आणि पाणीही शेतातच जिरविणे महत्त्वाचे आहे. माती वाहून जाणे शेतीसाठी योग्य तर नाही. परंतु वाहून जाणाऱ्या पाण्यांमुळे नदी-नालेही भरतात. त्यामुळेच कृषी विज्ञान केंद्र माती अडविणे व पाणी जिरविणे कसे महम्त्त्वाचे आहे, यावर लक्ष केंद्रित करते. स्थानिक शेतक ऱ्यांनी स्वारस्य दाखविल्याने खरपुडी परिसरात दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बांधबंदिस्तीची कामे झाली.
lxmanr1234@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा