मोठय़ा भावासाठी घेतलेला शर्ट धाकटय़ा भावापर्यंत आणि मोठय़ा ताईची पुस्तके पार शेवटच्या भावंडापर्यंत वापरण्याची आपली सवय! पण गेल्या काही वर्षांमध्ये कोणतीही वस्तू घेतली की त्या वस्तूच्या पाकिटावरील एक्सपायरी डेट बघून घेण्याची सवयही आपल्याला नव्याने जडली आहे. ती गाडीच्या बाबतीतही अमलात आणायला हवी..
नवीन गाडी घेणं ही आपल्याकडे आता तेवढी नावीन्याची आणि कुतूहलाची बाब राहिली नाही. पूर्वीच्या गाडय़ांच्या तुलनेत नव्या गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्नही नेहमी नेहमी उपटत नाही. पूर्वी एखादी गाडी घेतली की, जवळपास प्रत्येक मोठय़ा ट्रिपनंतर एकदा गॅरेजमध्ये नेऊन गोष्टी जागच्या जागी आहेत ना, हे पाहावे लागायचे. आता तेवढी मोकळीक नव्या तंत्रज्ञानामुळे मिळते. पण म्हणून काही गोष्टींकडे लक्ष पुरवणं खूप महत्त्वाचं आहे. गोष्ट झिजून पार नाहीशी होईपर्यंत वापरण्याची आपल्याला सवय असते. तसंच एखादी वस्तू तुटत नाही, म्हणजे ती उत्तमच आहे, असाही एक समज आपण मनोमनी केलेला असतो. पण हा समज गाडीच्या बाबतीत खूप घातक ठरू शकतो. कारण गाडीचे काही भाग वेळोवेळी, त्यांची एक्सपायरी डेट संपल्यानंतर बदलण्याची गरज असते. अशाच काही भागांबाबत आणि त्यांच्या एक्सपायरीबाबत जाणून घेऊ..
चाइल्ड सीट
आजकाल लहान मुले आणि गाडी असलेल्या घरांमध्ये चाइल्ड सीट अगदीच नेहमीची झाली आहे. त्यातही आपल्या सवयीप्रमाणे मोठय़ा भावाच्या मुलाच्या वेळी घेतलेलीच चाइल्ड सीट लहान भावाच्या मुलापर्यंत टिकवण्याचा आपला प्रयत्न असतो. पण ही सीट कालांतराने खराब होते. तिचा पृष्ठभाग खराब होऊन तो तुटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या सीटसाठी असलेले बेल्टही ताणले जाऊन सैल पडतात. या सीटचं आयुर्मान सहा वर्षांचं असतं. एकदा घेतलेली सीट सहा वर्षांनी टाकून देऊन नवीन घ्यायला हवी. तसंही चाइल्ड सीट सहा वर्षांपर्यंत कोणीच वापरत नाही. तरीही मॅन्युफॅक्चरिंग डेटपासून सहा वर्षांपर्यंतच या सीटचं आयुर्मान असतं, हे लक्षात ठेवायला हवं.
इंजिन ऑइल
गाडीचं इंजिन ऑइल कधी बदलावं, याच्या स्पष्ट सूचना प्रत्येक गाडीच्या मॅन्युअलवर दिल्या असतात. तरीही साधारण दर १२ ते १८ महिन्यांनी किंवा १० हजार किलोमीटरनंतर इंजिन ऑइल बदलायला हवं. इंजिन ऑइल वेळच्या वेळी बदललं नाही, तर गाडीची गतिमानता कमी होते. त्याचा थेट परिणाम गाडीच्या इंजिनावर होतो. गाडीचं इंजिन हा आत्मा मानल्यास या ऑइलचं महत्त्व लक्षात यायला हवं. अनेकदा इंजिन ऑइल बदलण्याकडे दुर्लक्ष केलं जातं, ते टाळलं पाहिजे.
केबिन एअर फिल्टर
गाडीतील हवा फिल्टर करण्याचं महत्त्वाचं काम करणाऱ्या या केबिन एअर फिल्टरचं आयुर्मान प्रदेशानुरूप बदलतं. तरीही साधारणपणे गाडी २५ ते ३० हजार किलोमीटर चालल्यानंतर एकदा हे फिल्टर बदलायला हवेत. गाडीत डिफ्रॉस्ट मोड ऑन करूनही समजा केबिनमध्ये येणाऱ्या हवेचा झोत खूपच कमी आहे किंवा ब्लोअर स्विच चालू केल्यावर आवाज खूप येऊनही हवा येत नसेल, तर गाडीतील केबिन एअर फिल्टर बदलण्याची गरज आहे, असं धरून चालायला हरकत नाही.
वातानुकूलन व्यवस्था
गाडीतील वातानुकूलन व्यवस्था हा आजकाल प्रत्येक गाडीचा अविभाज्य घटक झाला आहे. खिडक्या उघडय़ा ठेवून लांबचा प्रवास करण्याऐवजी खिडक्या बंद करून वातानुकूलन व्यवस्था सुरू ठेवून हा प्रवास झाल्यास थकवा कमी येतो. पण ही वातानुकूलन प्रणाली दर वर्षी तपासून बघायला हवी. गाडीच्या वातानुकूलन व्यवस्थेतून येणारी हवा थंडगारच असायला हवी. ती तशी नसल्यास तातडीने वातानुकूलन व्यवस्थेची तपासणी करून घ्यायला हवी. हवा थंड करण्यासाठी आवश्यक असलेला गॅसही वेळोवेळी तपासून पाहायला हवा. हा गॅस तर प्रत्येक वर्षी बदलून घेतला पाहिजे.
टायर
गाडीचे टायर दर सहा वर्षांनी बदलायलाच हवेत. गाडीच्या टायरच्या बाहेरच्या कडेवर असलेला डॉट नंबर टायरची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि वर्ष सांगतो. उदाहरणार्थ टायरवर ५०११ असं लिहिलं असेल, तर तो टायर २०११च्या ५०व्या आठवडय़ात तयार झाला आहे. त्यामुळे तो २०१७च्या अखेरीस बदलायला हवा, हे लक्षात घ्यायला लागेल. त्याशिवाय गाडीचा वापर खूप खडकाळ प्रदेशातून किंवा खराब रस्त्यांवर होत असेल, तर अशा गाडीचे टायर चार-साडेचार वर्षांनी बदलायला हवेत. त्यासाठी गाडीच्या टायरची काळजीही व्यवस्थित घ्यावी लागते.
एअरबॅग्ज
गाडीतील एअरबॅग्जचं आयुर्मान १० ते १२ र्वष इतकं असतं. त्यानंतर एअरबॅग्ज बदलून घेण्याचा सल्ला ऑटोतज्ज्ञ देतात. वास्तविक एअरबॅग ही गोष्ट दर वेळी उपयोगात येत नाही. किंबहुना ती येऊ नये, अशीच प्रत्येकाची इच्छा असते. तरीही एखाद्या अपघाताच्या प्रसंगी उत्तम स्थितीतील एअरबॅग्ज जीव वाचवू शकतात.
एअर फिल्टर
गाडीचा एअर फिल्टर प्रत्येक २० हजार किलोमीटरनंतर किंवा प्रत्येक वर्षी बदलायलाच हवा. हा फिल्टर खराब झाल्यास गाडीच्या इंधन टाकीत हवा जाण्याचा संभव असतो. त्याशिवाय गाडीच्या मॅन्युअलमध्येही गाडीच्या एअर फिल्टरची एक्सपायरी डेट लिहिलेली असते.
ब्रेक ऑइल
ब्रेक ऑइल आणि गाडीची सुरक्षा हे समानार्थी शब्द आहेत. प्रत्येक दहा हजार किलोमीटरनंतर गाडीची ब्रेक प्रणाली तपासून तिची देखभाल-दुरुस्ती केलीच पाहिजे. दर तीन वर्षांनी ब्रेक ऑइल बदलायलाच हवं. पण ब्रेक ऑइल जास्त गडद आणि घट्ट झाल्यासारखं वाटत असेल, तर ते तातडीने बदलायला हरकत नाही. त्यासाठी मेकॅनिकचा सल्ला कधीही मोलाचा ठरेल.
रोहन टिल्लू – rohan.tillu@expressindia.com