अमेरिकेतील गृहविक्रीची आकडेवारी भारतीय बाजारातील हालचाली नियंत्रित करेल, अशा वातावरणातून सध्या आपण जात आहोत. हे म्हणजे, स्वत:ची उत्तम प्रतिकार व्यवस्था कोलमडून गेली की थोडय़ादेखील कारणाने त्रास होत राहतो, तसे आपले झाले आहे.
आपली बाह्यबाजू इतकी नाजूक बनली आहे की, देशांतर्गत भांडवल बाजारात काही अब्ज डॉलरची विक्री झाली की रुपयाचे मूल्य इतक्या लक्षणीय प्रमाणात कोसळते की त्यामुळे परकीय चलन बाजारात घबराट निर्माण होते. वास्तविक, बाह्य बाजूने आपला प्रश्न मोठी चर्चा होत असलेल्या चालू खात्यावरील तुटीशी (करंट अकाउन्ट डेफिसिट, कॅड नाहीतर कॅपिटल अकाउन्टशी) अधिक संबंधित आहे. मोठी वाढ होत असलेली अर्थव्यवस्था आणि वायदे व तेलाची मोठी आयातक असलेला भारत आपली वाढ सुरू असेपर्यंत कॅड अधिक असलेला देश राहणारच आहे. परंतु, अधिक वाढ साध्य करत असलेल्या आपल्यासारख्या अर्थव्यवस्थेने देशात अधिकाधिक भांडवल आकर्षति करायला हवे आणि त्यामुळे परराष्ट्र बाबतीतही संतुलन राखायला हवे. पण दुर्दैवाने, देशात व्यवसायविषयक प्रतिकूल होत असलेले वातावरण आणि पुरेशा व वेळेवर केलेल्या सुधारणांचा अभाव यामुळे देशात येणारा दीर्घकालीन भांडवलाचा ओघ आटला आहे.
याचा परिणाम म्हणून, रुपयाच्या मूल्यामध्ये होत असलेल्या प्रत्येक टक्क्याच्या घसरणीसोबत आपली आयात महागते आहे आणि त्यामुळे किमतींवरील दबाव वाढतो आहे. आयातीच्या दरामुळे चलनवाढीच्या दरावर दडपण येत असताना रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यताही तितक्या प्रमाणात कमी होत चालली आहे.
निसर्गाप्रमाणे अर्थशास्त्रातही आपोआप बरे होण्याची प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया नेमकी आत्तासारख्या वेळी सुरू होते. रुपयाचे मूल्य घसरत असेल, तर आपल्या निर्यातकांना आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळेल. पण दुर्दैवाने, आपण दोन्हींची गल्लत करतो आहोत. बराच काळ सुधारणांचा अभाव आणि पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे आपल्या कार्यक्षमतेला फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ना आपली गुणवत्ता अफाट आहे, ना दर स्पर्धात्मक आहे. त्यामुळे रुपयाच्या अवमूल्यनाचा फायदा आपल्याला होत नाही आणि आपण रुपयाचे घसरते मूल्य, अधिक व्याजदर व मंदावलेली वाढ अशा दुष्टचक्रात अडकलो आहोत.
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? याचे उत्तर आहे, की यावर झटपट असे कोणतेच उत्तर नाही आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग तितका सोपाही नाही. व्यवसायविषयक वातावरण आणि व्यवसायविषयक आत्मविश्वास हिरावला गेला आहे आणि तो पुन्हा भरून येण्यासाठी मोठा काळ जावा लागेल.
आपल्या सरकारच्या हे लक्षात आले आहे आणि निदान त्यांच्या गेल्या काही कृतींमध्ये तरी याविषयी जागृती दिसते आहे. वाढीला चालना देण्यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्याचे परिणाम अद्याप दिसू लागायचे आहेत. नजिकच्या भविष्यात तातडीने परिस्थिती सावरलेली दिसणे अवघड आहे. परंतु, यावेळी गुंतवणुकीचे चक्रा पुन्हा सुरू होण्याची प्रक्रिया पारंपरिकरित्या खासगी कॉर्पोरेटच्या भांडवलाच्या मार्गाने होणार नाही, तर पायाभूत सुविधा विकासाच्या मार्गाने होईल. सरकारने या दिशेने अनेक पावले उचलली आहेत आणि येत्या काळात आपल्याला त्याचे परिणाम दिसून येतील. तोपर्यंत धीर धरण्याशिवाय पर्याय नाही.
निसर्गाप्रमाणे अर्थशास्त्रातही आपोआप बरे होण्याची प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया नेमकी आत्तासारख्या वेळी सुरू होते. रुपयाचे मूल्य घसरत असेल, तर आपल्या निर्यातकांना आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळेल. पण दुर्दैवाने, आपण दोन्हींची गल्लत करतो आहोत.
लेखक एगॉन रेलिगेअर लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा