13भटकंतीच्या छंदामागे सर्वाचे पाय जरी सारखे असले तरी त्यामागचे मन प्रत्येकाचे निराळे असते. भास्कर सगर हे असेच मनस्वी कलाकार आणि हाडाचे भटके. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात या दोन्ही छंद-वृत्तीचा मिलाफ दिसतो. ही भारतभूमी भटकायची आणि तिला चित्रात साठवायचे हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांचा छंद! त्यांच्या या छंदातील कर्नाटक भ्रमंतीचा हा अध्याय!

भटकंती आणि चित्रकला हे दोन्ही माझे आवडीचे विषय. यातूनच दरवर्षी एखादा प्रदेश, विषय निवडायचा आणि त्या दृष्टीने वर्षभर भटकायचे, ती-ती स्थळे पाहायची, त्यांचा अभ्यास करायचा आणि चित्र रंगांमधून त्यांना साठवून घ्यायचे ही आता सवयच जडली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मी या मालिकेसाठी निवडला तो दक्षिण भारत! कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या दक्षिणेकडील चार राज्यांत भटकंती केली आणि या राज्यांतील अनेक निसर्गरम्य स्थळांना मी माझ्या चित्रांतून बांधून घेतले.
चार राज्यांमधली ही भटकंती कधी बसने, कधी रेल्वेने, कधी दुचाकीने तर कधी चक्क पायीदेखील झाली. वाटा-आडवाटांवर दडलेली ही स्थळे शोधत हिंडायची. तिथवर पोहोचलो, की शांत-निवांतपणे ती पाहायची आणि मग त्यांच्याशी सलगी होताच त्या-त्या स्थळांतले रंग कागदावर उतरवायला घ्यायचे. गेले वर्षभर माझा हा उपक्रम सुरू होता.
दक्षिण भारताच्या या ध्यासातूनच मी कर्नाटकच्या मोहिमेवर काही दिवसांपूर्वी जाऊन आलो. कर्नाटक म्हणजे प्राचीन संस्कृती, वैभवशाली वारसा असलेली ऐतिहासिक नगरे, वास्तुशिल्प, स्थापत्यविशेष आणि निसर्गरम्य स्थळे यांनी भारलेला प्रदेश आहे. अशा या वैविध्याने, वैशिष्टय़ाने भारलेल्या राज्याचा वेध घेण्यासाठी आम्ही दुचाकीवरून भटकायचे ठरवले. हवे तिथे जायचे, हवे तिथे थांबायचे. चित्रांच्या मनोराज्यात यथेच्छ बागडायचे या साऱ्यांसाठी आम्हाला ही भटकंती मानवणारी होती. यासाठी माझा मित्र शहाजी नगरे बरोबर होता. मग आमची तयारी झाली आणि आम्ही दुचाकी मोहिमेवर रवाना झालो.

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया

अगदी सुरुवातीला पुण्यातून थेट पंढरपूर गाठले. विठ्ठलाचा आशीर्वाद घेत विजापूरमार्गे कर्नाटकात शिरलो. विजापूर आदिलशाहीची राजधानी. तिथल्या त्या मध्ययुगीन भव्य इमारती पाहताना जीव दडपून गेला. दिवसभर भटकून या वास्तूंचे ते बुलंदपण कागदावर उतरवले आणि आम्ही पुढे बदामीच्या वाटेला लागलो. कर्नाटकातील ही एक प्राचीन नगरी. लाल रंगाचे मोठ-मोठय़ा दगडांचे डोंगर आणि त्यांच्या कडय़ात कोरलेली लेणी. ही लेणी पाहता-पाहता थक्क झालो. या लेण्यांची चित्र काढायला रंग कमी पडले. शेजारच्याच शाकंभरी देवीचे दर्शन घेतले आणि आमची दुचाकी पट्टदकलच्या दिशेने धावू लागली. पट्टदकल हे कर्नाटकातील आणखी एक प्राचीन स्थळ. ‘जागतिक वारसा स्थळ यादी’त गौरवलेले पण या स्थळापर्यंत जाण्याचा रस्ता अगदीच खराब. तो तुडवत तिथे पोहोचलो तर सगळीकडे मंदिरेच मंदिरे समोर आली. प्रत्येक मंदिर शिल्पकलेचा अत्तुच्च्य नमुना. इतिहासापेक्षा माझ्यासारख्याला त्याच्यातील कलेच्याच प्रेमात जास्त पडायला होत होते. मंदिरांच्या या नगरीने आमचा आणि चित्रांचा बराच वेळ घेतला. आठवणींना रंगात साठवून आम्ही पुढे निघालो. पुन्हा प्रवास सुरू. आता ऐहोळे. इथले दुर्गा मंदिर खूप प्रसिद्ध. पहिल्या स्थळाची गुंगी उतरते ना तो पुढचे स्थळ त्याहून ताकदीने पुढे येत होते. चित्रांच्या शोधात निघालेल्या माझ्यासारख्या पावलांना या स्थळांमध्येच अडकायला होत होते.
ऐहोळे पाहात हंपीकडे सरकलो. हंपीला यापूर्वी सहा वेळा आलो होतो. पण पुन्हा नव्या वेळीही ही नगरी पाहण्याची आणि तिला चित्रातून उतरवण्याचा मोह टाळता आला नाही. दुसऱ्या दिवशी विरुपाक्षचे दर्शन आणि राजा कृष्णदेवराय यांचे वंशज श्री कृष्णदेवराय महाराज यांची भेट घेत आम्ही हंपी सोडली. आता पुढचा टप्पा होता चित्रदुर्ग. किल्ला अद्याप सुस्थितीत. दुर्गदर्शन, रेखाटने झाली आणि आमची स्वारी पेनुकोंडाकडे सरकली. विजयनगरच्या साम्राज्याची ही आणखी एक ओळख. इथला पेनुकोंडाचा किल्ला पाहण्यासारखा. आजही सारे काही व्यवस्थित. या साऱ्याची तिथल्या सरकारने निगाही चांगली राखलेली. हे सारे पाहिल्यावर आपल्याकडील किल्ल्यांची दुरवस्थेची आठवण झाली.
एकेक स्थळ पाहून होत-होते. स्थळदर्शन, माहिती, अभ्यास, छायाचित्रे आणि यानंतर या साऱ्यांची जलरंगांतील चित्रे.. असा प्रवास सुरू होता. आमच्या भटकंतीची जणू शाळाच झाली होती. आता आमची दुचाकी लेपाक्षीला निघाली. इथले प्रसिद्ध वीरभद्र मंदिर आणि त्यावरचे शिल्पवैभव पाहिल्यावर केवळ थक्क व्हायला झाले. श्रीरंगपट्टण आणि टिपू सुलतान ही दोन नावे शाळेत असल्यापासून ऐकत होतो. मग तोच इतिहास जागवण्यासाठी आता आम्ही श्रीरंगपट्टणला निघालो. इथला तो भुईकोट किल्ला, टिपूच्या महालाचे अवशेष, मशिदी, संग्रहालय, अन्य ऐतिहासिक इमारती पाहता-पाहता इतिहासात बुडायला झाले. प्रवास जसा पुढे सरकत होता तशी आमची ही आठवणींची चित्रे वाढत होती. श्रीरंगपट्टणपासून म्हैसूर केवळ १५ किलोमीटरवर. तिथे पोहोचलो आणि त्या राजवाडय़ाच्या पुढय़ात आपलेच खुजेपण जाणवू लागले. तो भव्य राजवाडा, त्याचे ते स्थापत्य, सौंदर्य, आतील एकेक वस्तू हे सारे उतरवताना माझ्या चित्रातील रंग अपुरे पडू लागले. किती पाहू आणि त्याला चित्रात कसे साठवू असे झाले. इथेच शेजारी तो ‘चामुंडा हिल्स’वरील महिषासुराचा पुतळा, चामुंडेश्वरी आणि सर्वात महत्त्वाचा असा तो जगप्रसिद्ध नंदी!
श्रावणबेळगोळच्या बाहुबलीच्या शिल्पाचीही अशीच कथा. अखंड दगडातील त्या गोमटेश्वराचे शिल्प पाहता-पाहता त्या कलाकारांविषयी खूप आदराची भावना तयार झाली. असेच पुढे त्या हळेबीड आणि बेलूरचे. हजारो कलाकारांनी इथे पाषाणामध्ये जणू प्राणच ओतला आहे. होयसाळेश्वर, केदारेश्वर मंदिरे, नटराज, लक्ष्मी, गणेश, महिषासूर, शिवाची ती शिल्पे पाहताना थक्क व्हायला झाले. ..शिल्पकारांच्या कलेचे हे दर्शन घेता-उतरवता माझे पाय आणि ब्रश पूर्ण थकून गेले. चिक्कमंगळूर, श्रृंगेरी, भटकळ, मडगाव किती नावे घ्यावीत. प्रत्येक स्थळावरची हीच गोष्ट!
आमच्या या साऱ्या भटकंतीमध्ये या स्थापत्य-शिल्पसौंदर्याबरोबरच मनाचा ठाव घेणाऱ्या निसर्गस्थळांचीही आमची गाठ-भेट घडत होती. अभयारण्य-वनांचे पट्टे, नद्या, जलाशय, घाटवाटा, उंच डोंगर-पर्वत, चहाचे मळे, नारळी-पोफळीच्या बागा, छोटी-छोटी खेडी, तिथली माणसे हे सारे मनाच्या कप्प्यात आणि कागदावरच्या चित्रांत साठवले जात होते.
नऊ दिवसांचा आमचा हा प्रवास गोव्याजवळ संपला. या नऊ दिवसात आम्ही तब्बल तीन हजार किलोमीटरचे अंतर तोडले होते. या भटकंतीत कर्नाटकाची ही विविध रूपे आम्ही पाहिली, मनात साठवली आणि कागदावर उतरवली. चित्रांच्या हौसेपोटी बाहेर पडलेल्या माझ्या सारख्यांच्या मनाला त्यात भारताच्या वैविध्यतेचे, त्यातील एकतेचे दर्शन घडले.
वाटा-आडवाटांवरच्या स्थळांच्या शोधात आणि चित्रांच्या नादातील या भटकंतीने मला समृद्ध
केले होते.