उजनी धरणाच्या कालव्यांसाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना येत्या दोन महिन्यात मोबदल्याच्या वाटप करण्याचा निर्णय राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. संपादित केलेल्या जमीनीचा शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ . दीपक म्हैसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली .
उजनी धरणाच्या कालव्यांसाठी २५-३० वर्षांपूर्वी पंढरपूर , मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत . मात्र या शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप मोबदला मिळालेला नाही . मोबदला मिळण्यासाठी पंढरपूर , मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षे विविध मार्गाने सातत्याने पाठपुरावा केला . विधिमंडळातही या बाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता . मात्र त्यावेळच्या काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित होता. माधव भांडारी यांच्या नेतृत्वाखालील जनजागर प्रतिष्ठानने या संदर्भात पाठपुरावा केल्यामुळे जलसंपदा खात्याने मोबदला देण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे ८३ कोटी इतकी रक्कम वर्ग केली होती . तरीही प्रशासनाकडून मोबदला वाटपासाठी हालचाल होत नव्हती.
आमदार प्रशांत परिचारक यांनीही गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न सोडविण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरु केला होता . आ. परिचारक यांनी या बाबत बैठक बोलाविण्याची मागणी केली होती . त्याची दखल घेत पुनर्वसन प्राधिकरणाने बैठकीचे आयोजन केले होते.
एकूण खातेदारांपैकी २५७२ खातेदारांना २ महिन्यात मोबदल्याचे पूर्ण वाटप करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित ३५०० खातेदारांना लवकरात लवकर मोबदला वाटप करण्यासाठी आवश्यक ती कार्यपद्धती निश्चित करण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले . कोणत्याही स्थितीत डिसेम्बर २०१९ पर्यंत मोबदल्याचे वाटप पूर्ण व्हावे अशा सूचना जलसंपदा खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.