गावखेडय़ातली शाळांची गरज, शिक्षणाप्रति गावक ऱ्यांची अनास्था आणि आहे ती शाळा टिकवण्यासाठी मूठभर जाणत्यांची धडपड हा विषय याआधीही मराठी चित्रपटातून येऊन गेलेला आहे. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबुंटू’ हा यातलाच नवा अध्याय म्हणता येईल. पण इथे हा विषय मांडताना दिग्दर्शकाने तो मुलांच्या दृष्टिकोनातून मांडला असल्याने आपोआपच एक निरागस भावभावनांचा पट चित्रपटभर गुंफला गेला आहे. मात्र पहिल्यांदाच मुलांना शिक्षणाची वाटणारी तळमळ आणि गरज व्यक्त करताना मुळात गावक ऱ्यांची याबद्दलची मानसिकता बदलणे, शिक्षण पद्धतीतील बदल अशा वेगवेगळ्या मुद्दय़ांचा र्सवकष विचार चित्रपटांतून के ला जात नाही. ‘उबुंटू’ पाहतानाही ते प्रकर्षांने जाणवते.

वाचा : Lucknow Central movie review जमून आलेला ‘प्लान’

‘उबुंटू’ची कथा गावात ज्या शाळेत घडते तिथली मुले आणि त्यांचे हुशार, संयमी शिक्षक (सारंग साठे) यांच्यातले नाते खूप छान पद्धतीने रंगवण्यात आले आहे. गावातील ही शाळा केवळ या शिक्षकाच्या मुलांना शिकवण्याच्या तळमळीपोटी टिकून आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत ही सहज, निसर्गाकडून अनुभव घेत व्यवहारज्ञान देणारी असल्याने मुलंही शाळेत रुळली आहेत. पण शाळेत केवळ १५ मुले दररोज हजेरी लावतात. शाळा टिकवायची तर कमीत कमी ३५ विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. त्यासाठी मुले आणि शिक्षक दोघांचीही धडपड सुरू आहे. मात्र उत्साहाच्या भरात मुलांकडून होणाऱ्या काही कृत्यांना मुलं वाया गेलीत असा ठपका लावत गावकरी आणि सरपंचांचे शाळा बंद करण्याचे प्रयत्न जोर धरतात. नेमक्या याच मोक्याच्या क्षणी सरांना आपल्या गावी जावी लागते आणि ते शाळेची जबाबदारी तिथली हुशार, समंजस मुलगी गौरीवर (भाग्यश्री सकपाळ) सोपवून जातात. इथून या चित्रपटाला नवीनच वळण मिळते आणि मूळ कथा भरकटते.
शाळेची उपस्थिती टिकवायची तर शाळेचा हुशार विद्यार्थी अब्दुल याला सांगलीतून पुन्हा गावात आणावे लागेल, या इराद्याने गौरी आणि छोटा संकेत एसटी पकडून सांगलीत पोहोचतात. खरे म्हणजे चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही वेगळे भाग वाटावेत इतके वेगळे वळण कथेला देण्यात आले आहे. आपल्या परीने वेगवेगळ्या वयातील मुलांना एकाच वर्गात बसवून हुशारीने त्यांना शिक्षण देण्यासाठी धडपडणारा शिक्षक, मुलांचा उत्साह एकीकडे आणि दुसरीकडे सरपंच-गावक ऱ्यांच्या कमालीच्या अनास्थेमुळे वैतागलेला, प्रसंगी संयम हरवून बसलेला शिक्षक हे स्थित्यंतर रंगवल्यानंतर चित्रपटात शिक्षकाच्या माध्यमातून काही ठोस प्रयत्न पहायला मिळतील, अशी भावना निर्माण होते. मात्र त्याआधीच त्यांना तातडीने गावाला पाठवून दिग्दर्शकाने कथा पुन्हा मुलांच्या हातात सोपवून दिली आहे. मग या घटनेमुळे गावक ऱ्यांच्या मनात झालेला बदल वगैरे सुखांतिका ही ओघाने येतेच. या एवढय़ा कथेत एक शाळा बंद पडली तर शहरातील लोकांना फारसा बदल घडणार नाही. पण आम्ही मुले मात्र पुन्हा एकदा गुरे चरायला कुठे न्यायची याच गणितात हरवून बसू, हे म्हणणाऱ्या गौरीच्या तोंडून व्यक्त झालेली मुलांची निरागस भावना, त्यांची शिक्षणाबद्दलची ओढ या गोष्टी सोडल्या तर बाकी कुठलीच गोष्ट पकड घेत नाही. केवळ चित्रपट पुढे सरकवण्यासाठी केलेला तो घटनाक्रम ठरतो.

वाचा : ‘या’ अभिनेत्रीने सलमानला सहा वेळा केलं रिजेक्ट

ही कथा आजच्या काळात घडतेय हे लक्षात घेऊन त्यानुसार या मुलांच्या वागण्या-बोलण्यातही ती हुशारी दिसायला हवी होती. प्रत्यक्षात तसे ते दिसत नाही. सांगलीत येताना कमीत कमी अब्दुलच्या मामाच्या हॉटेलचे नाव किंवा स्वत:च्या घरच्यांचा संपर्क क्रमांक काहीच गौरीक डे नाही हे तर्काला धरून वाटत नाही. भाषणातून अब्दुलपर्यंत अचूक पत्ता पोहोचवणारी गौरी बाकी इतर गोष्टींचा तपशिलात विचारच करीत नाही हे तितकेसे पटत नाही. त्यामुळे चित्रपटातील स्वाभाविकपणा हरवून जातो. चित्रपटातील प्रत्येक बालकलाकाराने उत्तम काम केले आहे. पण आरती मोरे, भाग्यश्री सकपाळ या दोघींचे वय आणि इतर मुलांचे वय जुळून येत नाही. विशेषत: आरतीला त्यानंतर नानाविध भूमिकांमधून लोकांनी पाहिलेले असल्याने शाळकरी मुलगी म्हणून तिला स्वीकारणे जड जाते. सारंग साठय़ेचा शिक्षक वेगळा होता पण ही व्यक्तिरेखाही कथेतच अर्धवट सोडून देण्यात आली आहे. तीच गोष्ट सरपंचाच्या भूमिकेतील शशांक शेंडे यांच्याबाबतीत सांगाविशी वाटते. ‘उबुंटू’चा अर्थ चित्रपटातून पाहणे अधिक योग्य ठरेल. पण चित्रपटातील काही गोष्टी सोडल्या तर मुलांच्या निरागस भावविश्वाची झलक दाखवण्यात दिग्दर्शक म्हणून पुष्कर श्रोत्री पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरले आहेत.

कलाकार – सारंग साठ्ये, शशांक शेंडे, भाग्यश्री सकपाळ, आरती मोरे, अथर्व पाध्ये, उमेश जगताप, कान्हा भावे, शुभम पवार.

चित्रपट समीक्षण : रेश्मा राईकवार