गोरखपूर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये दलित कार्यकर्त्यांच्या घरी शुक्रवारी भोजन केले. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी भाजप सरकारने प्रयत्न केल्याचे आदित्यनाथ यांनी नमूद केले.
मकरसंक्रांतीनिमित्त अमृलाल भारती यांच्या निवासस्थानी भोजन घेतल्यानंतर योगींनी आपल्या सरकारने पाच वर्षांत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ४५ लाख घरे दिल्याचे नमूद केले. तर अखिलेश सरकारने केवळ १८ हजार घरे दिली होती असा दावा आदित्यनाथ यांनी केला. अखिलेश हे २०१२ ते २०१७ या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. भाजपच्या काळात २.६१ कोटी घरांमध्ये शौचालय तर उज्वला योजनेंतर्गत १.३६ कोटी कुटुंबांना लाभ झाल्याचे योगींनी नमूद केले. केंद्र तसेच राज्य सरकारने एकत्रितपणे विकासकामे केल्याचे त्यांनी नमूद केले. जे घराणेशाहीचे राजकारण करतात ते कोणत्याही घटकाला न्याय देऊ शकत नाहीत अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. समाजवादी पक्ष सरकारच्या काळात दलित तसेच गरीबांचे हक्क हिरावून घेण्यात आल्याचा आरोप योगींनी केला.