विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर निकालासाठी तीन दिवसांची प्रतीक्षा उमेदवारांना अस्वस्थ करीत आहे. एकदा काय तो निकाल लागून जावा, अशा अपेक्षेत असलेल्या या ‘भावी’ आमदारांनी स्पा, जिममध्ये जाणे, मंदिरात जाऊन दर्शन घेऊन अधिकाधिक वेळ कुटुंबासमवेत घालविणेच पसंत केले आहे. अनेकांनी मतदारांचे आभार व्यक्त करणारे फलकही प्रदर्शित केले आहेत.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांचे भवितव्य ठरविणाऱ्या वांद्रे पश्चिम येथील मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाबा सिद्दिकी यांनी स्पामध्ये जाणे पसंत केले आहे. व्यायाम करणे आणि कुटुंबीयांशी अधिकाधिक वेळ घालविणे पसंत केले आहे. निकाल आपल्या बाजूनेच लागणार. त्यामुळे आपण पुन्हा व्यस्त होऊन जाऊ. परिणामी हा तीन दिवसांचा वेळ कुटुंबीयांना उपलब्ध करून दिल्याचे सिद्दिकी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब अजमावत आहेत. शंभर टक्के विजयाची खात्री असलेले अहिर यांनीही आपला बराचसा वेळ कुटुंबीयांसोबतच घालविला. निवडणुकीच्या काळात मुलीकडे अजिबात लक्ष देता आले नव्हते. तिची परीक्षा होती. त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालविला. त्याआधी जिममध्ये जाऊन व्यायाम केल्याचेही अहिर यांनी सांगितले.
कामगार नेते आणि शिवसेनेचे अंधेरी पश्चिम मतदारसंघातील उमेदवार जयवंत परब यांनी मतदारांना भेटण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला. नियमितपणे पूजा आणि मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. आपण हमखास निवडून येणार याची खात्री असल्यामुळे आधीच मतदारांचे आभार व्यक्त करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. मागठाणे मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवीण दरेकर यांना आव्हान देणारे शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांनी आपण दोन्ही दिवस आराम केल्याचे सांगितले. प्रचारामुळे आपला आवाज बसला होता. झोप मिळाली नव्हती. ती पूर्ण केली, असेही त्यांनी सांगितले.
चांदीवलीत राज्याचे माजी वस्रोद्योग मंत्री नसीम खान यांना आव्हान देणारे मनसेचे ईश्वर तायडे यांनी मात्र कार्यकर्त्यांमध्ये आपला वेळ घालविला. आपल्यासाठी निवडणुकीच्या काळात राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य होते. मनसेतून भाजपमध्ये गेलेले राम कदम यांनीही आपला वेळ मतदारांसोबतच घालविला.
निवडणुकीच्या काळात मुलीकडे अजिबात लक्ष देता आले नव्हते. तिची परीक्षा होती. त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालविला.
-सचिन अहिर, राष्ट्रवादीचे नेते