अभिकल्पाची वापरयोग्यता ही एकांगी नसून विविधांगी, विविधमितीय असते. संदर्भानुसार वापरयोग्यतेच्या अंगांची प्राथमिकता ठरत जाते.
सध्या अमेरिकेत निवडणूक होत आहे, त्यावरून २००० साली पहिल्यांदाच मी जेव्हा अमेरिकेत गेलो होतो त्या वेळची गोष्ट आठवते. भारतातून निघताना अख्ख्या महिन्याचा पगार मोडून पाचएकशे डॉलर गाठीशी बांधले होते. प्रत्येक वेळी ते खर्च करताना ‘‘बसचं तिकीट सहा डॉलर म्हणजे नक्की किती, तर अडीचशे रुपये. बापरे! एवढय़ा पशात मी मुंबईत कुठूनही कुठेही टॅक्सीने जाऊ शकलो असतो’’, असा गुणाकार एकदा तरी मनात होऊन जात असे. दुसरी एक गोष्ट दरवेळी खटकत असे ती म्हणजे डॉलरची प्रत्येक नोट दिसायला सारखीच, मग ती एक डॉलरची असो, की दहा डॉलरची, की शंभर डॉलरची. सर्व नोटा एकाच आकाराच्या आणि एकाच रंगाच्या. त्यामुळे प्रत्येक नोट देताना फुंकून फुंकून, डोळ्यात तेल घालून, तीनतीनदा वाचून द्यावी लागे. पाचच्या नोटेऐवजी चुकून पन्नासची नोट गेली असती तर परवडण्यासारखे नव्हते.
त्यामानाने आपल्या भारतीय चलनांचे अभिकल्प खूपच चांगले आहे. दोन आणि वीस रुपयांच्या नोटा नेहमी लाल असतात. पाच रुपयांची नोट पोपटी, दहाची तपकिरी, पन्नासची जांभळी, शंभरची निळी आणि पाचशेची परत हिरवी (पण वेगळ्या छटेची). आकारही महत्त्वाचा. मोठी नोट नेहमी मोठय़ा आकाराची, छोटी नोट छोटय़ा आकाराची. चलनाच्या नोटा या प्रत्येकालाच वापराव्या लागतात. रंग आणि नक्षीकाम यांचा काळजीपूर्वक वापर केल्यामुळे निरक्षर व्यक्तींपासून सर्वानाच भारतीय नोटा ओळखणे सोपे जाते. बँँकेत किंवा दुकानात शंभर रुपयांच्या नोटांची जुडी मोजताना वेगळ्या आकाराची व रंगाची नोट चटकन वेगळी पडते, उठून दिसते. त्यामुळे चुकांचा संभव कमी होतो. शिवाय वेगवेगळ्या आकारांमुळे अंधांनादेखील नोटा व्यवस्थित ओळखता येते.
मात्र ही काळजी अलीकडील नाण्यांच्या अभिकल्पात घेतलेली दिसत नाही. रिक्षातून उतरताना एखादे नाणे द्यावे किंवा घ्यावे लागतेच. वेळ रात्रीची असेल तर नाणे स्पर्शाने ओळखू आले पाहिजे. आजकालची पाच रुपयांची, दोन रुपयांची आणि एक रुपयाची नाणी अंधारात हाताळून बघा – त्यांतला फरक सांगणे कठीणच जाते. (त्याच्यापेक्षा छोटय़ा नाण्यांची हल्ली गरज पडत नाही, हा महागाईचा एक फायदाच म्हणूया.)
अभिकल्पाच्या ज्या गुणधर्माबद्दल आपण बोलत आहोत, त्याला इंग्रजीत ‘युजेबिलिटी’ म्हणतात. या लेखमालेतील पूर्वीच्या लेखांत या गुणधर्माचा उल्लेख जेव्हा पहिल्यांदा आला, तेव्हा त्याला मराठीत काय म्हणावे यावर आम्ही बराच विचार केला. ‘युजर’ साठी आम्ही ‘उपयोक्ता’ असा शब्द वापरत होतो. त्यावरून युजेबिलिटीसाठी प्रथम आम्ही ‘उपयोक्तता’ हा शब्द वापरणार होतो. पण तो शब्द लोकांना समजेना – युजेबिलिटीसाठी वापरलेला शब्दच युजेबल नव्हता. मग ‘वापरक्षमता’ या शब्दाचा आम्ही विचार केला, पण त्यात ‘क्षमता’ नक्की कोणाची? एखादी वस्तू ‘युजेबल’ नसेल, तर तो दोष उपयोक्त्याचा नसून अभिकल्पाचा आहे असा आमचा दृष्टिकोन आहे. ‘वापरक्षमता’मध्ये आपण उपयोक्त्याच्या क्षमतेबाबत बोलत आहोत असे वाटते. ऊहापोहाअंती आम्ही ‘वापरयोग्यता’ हा शब्द निवडला हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. तर या वापरयोग्यतेशी निगडित असलेले तीन मुद्दे या लेखात पाहू.
पहिला मुद्दा हा, की अभिकल्पाची वापरयोग्यता ही वापराच्या संदर्भाच्या सापेक्ष असते. तुम्ही म्हणाल की हे वाक्य फारच क्लिष्ट झालं. तर वरच्या अमेरिकेच्या ट्रिपमधलं दुसरं एक उदाहरण सांगतो. माझ्या हॉटेलमधल्या खोलीत जो दिवा होता, तो वरील चित्रात दाखवला आहे. खोलीमध्ये गेल्यागेल्या दिवा चालू झाला खरा, पण झोपताना तो बंद कसा करावा हे काही मला चटकन उमजेना. एकतर एकसारखी दोन बटणे दिसत होती – मात्र त्यातलं एकच ‘बटण’ निघाले. हुबेहूब बटणासारखाच दिसणारा, पण दिव्याखालचा दुसरा भाग, हा एक स्क्रू निघाला. तो फिरवला, तर अख्खा दिवा सुटा होऊन हातात आला. दुसरे मात्र बटण निघाले. मात्र ते चालवावे कसे? दाबून पाहिले, तर दबेना. वर-खाली होईना. मग विचार केला, की फॅनच्या रेग्युलेटरसारखे फिरवून पाहावे. दिवा बंद करण्यासाठी बटण घडय़ाळाच्या उलट फिरवले तर बटण नुसते फिरत राहिले. शेवटी घडय़ाळाप्रमाणे सुलट फिरवून पाहिले, तेव्हा कुठे दिवा बंद झाला. मग मनात शंका आली. दिवा बंद झाला झाला खरा, पण परत चालू कसा करावा? बटण घडय़ाळाच्या उलट फिरवून पाहिले तर परत पहिल्यासारखे नुसते फिरत राहिले. जेव्हा घडय़ाळाप्रमाणे सुलट फिरवले, तेव्हा कुठे दिवा सुरू झाला.
मग यात एवढा बाऊ करण्यासारखे काय? या अमेरिकन हॉटेलमधील खाश्या दिव्याचं खासं बटण सुरू करण्यासाठी सुलट फिरवावं लागतं आणि बंद करण्यासाठीदेखील सुलट फिरवावं लागतं. आणि या गोष्टीत ‘वापराची सापेक्षता’ कुठे येते? खरं आहे. तशी ही गोष्ट शिकायला सोपी, सरळ वाटते. एका मिनिटात शिकता येते. असा दिवा घरी दिवाणखान्यात लावण्यास काहीच हरकत नाही. फार तर घरी आलेल्या पाहुण्यांबरोबर बोलायला एक विषय मिळेल. मात्र हाच दिवा जर हॉटेलांतल्या खोल्यांत लावला तर रोज रात्री अनेक जेटलॅगबाधित प्रवासी झोपता झोपता हे कोडं सोडवत बसतील. त्यातले काही कंटाळून हॉटेलच्या स्वागतकक्षाला फोन लावतील. रिसेप्शनिस्ट कुणाला तरी पाठवतील (नाहीतर हे वेंधळे प्रवासी चुकून स्क्रू उघडायचे आणि दिवा त्यांच्या हातातून पडायचा). किंवा त्रस्त होऊन ‘‘कुठून आलात? साधा दिवादेखील बंद करता येत नाही का?’’ असले आदरातिथ्य करतील. एकूण घरच्या वापरासाठी हा दिवा ठीक असला तरी हॉटेलच्या संदर्भात असला दिवा वापरअयोग्यच.
दुसरा मुद्दा असा की अभिकल्पाची वापरयोग्यता ही एकांगी नसून विविधांगी, विविधमितीय असते. वस्तू सहज व चटकन शिकता यावी, शिकल्यावर वापरास सोपी व जलद असावी, वस्तू वापरताना चुका कमी व्हाव्यात व झाल्याच तर लगेच सुधारता याव्यात, वस्तूशी संवाद सोपा असावा व वस्तू वापरतानाचा अनुभव आनंददायी असावा ही वापरयोग्यतेची प्रमुख अंगे आहेत.
अर्थात प्रत्येक अंगाचे महत्त्व सारखे नसते. बिनिशगी, बहुदुधी, लाथ न मारणारी गाय मिळत नाही असे म्हणतात. त्या नियमाप्रमाणेच वापरसंदर्भानुसार वापरयोग्यतेच्या अंगांची प्राथमिकता ठरवावी लागते. उदाहरणार्थ काही वस्तूंच्या वापरात जीवन-मृत्यूचा प्रश्न असतो. ऑपरेशन थिएटरमधील एखादे उपकरण, रेल्वे सिग्नल, विमानाच्या कॉकपिटमधील नियंत्रण साधने किंवा साधा गाडीतील सुकाणू वापरताना झालेली एखादी छोटी चूकदेखील जीवघेण्या अपघातास कारणीभूत ठरू शकते. अशा वेळी उपकरणाचा खात्रीलायक, बिनचूक वापर महत्त्वाचा. अगदी आणीबाणीच्या परिस्थितीतही उपयोक्त्याच्या हातून चूक होता कामा नये. त्याचा वापर शिकण्यासाठी उपयोक्त्याला अनेक दिवसांचा, महिन्यांचा किंवा वर्षांचा सराव करावा लागला तरी चालण्यासारखे आहे. नव्हे, ते आपेक्षितच आहे. नवशिक्या पायलटमागे विमानात बसून उड्डाण घेणे कुणालाच नको असते.
बँकेतील काउंटरवर, सिनेमाच्या तिकीटखिडकीत किंवा दुकानात बिलं बनवणाऱ्या प्रणाल्यांच्या व्यावसायिक संदर्भात वापरयोग्यतेच्या वेगळ्याच अंगांचा विचार केला पाहिजे. तिथे वेळेला खूप महत्त्व आहे. कामे झटझट व्हायला हवीत. काही वेळा ही कामे करणारे लोक नवशिके असतात. त्यांना या प्रणाल्या चटकन शिकता याव्यात. तेच तेच काम असंख्य वेळा करून लोक थकून जाता कामा नयेत. वॉिशग मशीन, फ्रिज, टीव्ही इत्यादी घरी वापरायच्या वस्तूंच्या अभिकल्पात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना त्या वस्तू आपल्या आपण शिकता यायला पाहिजेत. टीव्ही शिकण्यासाठी कोणीच शिकवणी लावणार नाही. त्यांच्या दैनंदिन व्यवहारात, त्यांच्या संस्कृतीत त्या चपखल बसल्या पाहिजेत. त्या घरी साजेशा दिसल्या पाहिजेत, उगाच बोजड नकोत. मोबाइल फोन, घडय़ाळ, चष्मा, कपडे इत्यादी वैयक्तिक वापराच्या वस्तूंत अनुभूती खूप महत्त्वाची. वापरल्यावर कसं मस्त, प्रसन्न वाटलं पाहिजे. निदान विचित्र, अप्रसन्न वाटता कामा नये. अनेकदा या वस्तूतून उपयोक्ता आपली अभिव्यक्ती साकार करत असतो. वस्तू त्या अभिव्यक्तीशी जुळली पाहिजे – रसभंग होता कामा नये.
शेवटचा मुद्दा हा की उपयोक्त्याच्या कौशल्यानुसार वापरयोग्यतेच्या अंगांचे महत्त्व बदलत जाते. तरुण, सुशिक्षित उपयोक्ते नवीन वस्तू पटकन शिकू शकतात, आत्मसात करू शकतात. कमी शिक्षण असलेल्या किंवा वय झालेल्या लोकांना सवयी बदलायला जास्त वेळ लागू शकतो. उपयोक्ता ग्रामीण आहे की शहरात राहणारा आहे, त्याच्या आजूबाजूला किती लोक ती वस्तू वापरतात, उपयोक्त्याचा आत्मविश्वास, वस्तू वापरून तो काय साध्य करू पाहात आहे, त्याची भाषा, संस्कृती या सर्व गोष्टींमुळे वापरयोग्यतेच्या अंगांचे महत्त्व बदलत जाते.
लेखक आयआयटी मुंबई येथील ‘औद्य्ोगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी– इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत.
anirudha@iitb.ac.in