वघाळी नदीकाठावर वसलेले गाव हिंगणा बारलिंगा. अकोला शहरापासून १२ कि. मी. अंतरावर असून नदीच्या व गावाजवळून वाहणाऱ्या वरखेड नाल्याच्या पुरामुळे गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होते.
शाळा स्थापना
मुलांशी बोलणारी, त्यांच्याशी खेळणारी, मोकळीढाकळी, सदैव आनंदी, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची पूर्तता करणाऱ्या या शाळेची स्थापना २६ जून, २०१० रोजी झाली आहे.
पटनोंदणी
शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून दरवर्षी ६ ते १४ वयोगटातील मुलामुलींची १०० टक्के पटनोंदणी शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी करून घेतली जाते. ती शिकावी, टिकावी १०० टक्केउपस्थिती राहावीत म्हणून पुरेपूर प्रयत्न केले जातात.
शाळाबाह्य़ विद्यार्थी
शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांच्या शोध दरवर्षी घेतला जातो. मागील अनेक वर्षांत ६ ते १४ वयोगटातील एकही शाळाबाह्य़ विद्यार्थी नाही.
अप्रगत विद्यार्थी शोध
वर्षांच्या सुरुवातीला मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी प्रत्येक वर्गशिक्षक घेतात. विद्यार्थ्यांचा बौद्धिकस्तर निश्चित करण्यासाठी नियोजित चाचणी घेऊन मूल्यमापन केले जाते.
त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविणारा विद्यार्थी अप्रगत समजला जातो व त्या विद्यार्थ्यांकरिता उपचारात्मक अध्यापन करण्यात येते.
उपचारात्मक अध्यापन
मूलभूत क्षमता प्राप्त न झालेल्या व उजळणी मूल्यमापनात ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्याच्या आधारे संबंधित वर्गशिक्षक १ तासाचा जादा वेळ देऊन जादा कार्य केले जाते.
शाळेत राबविले जाणारे उपक्रम पुढीलप्रमाणे-
श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजविण्यासाठी मुलांच्या सहकार्याने शालेय परिसरात छोटीशी विविध रंगाच्या विविध प्रकारच्या फुलांनी व रोपटय़ांनी सजलेली बहुरंगी-बहुढंगी सुंदर अशी बाग शाळेत आहे.
पाठय़पुस्तके
सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळालेली पाठय़पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतात व मिळालेली पुस्तके वर्षभर सुस्थितीत राहावी यासाठी त्यांना कार्यानुभवाच्या तासात वर्गातच कव्हर लावली जातात.
पर्यावरण जागृती
(अ) वृक्षारोपण व संवर्धन
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या म्हणीप्रमाणे वृक्ष आपले नातलग आहेत, ते उन्हात तापतात व आपल्याला सावली देतात. सर्व निसर्गाला चैतन्य देणारा पाऊस, आपल्याला आवश्यक असणारे अन्न भाज्या, फुले, फळे, औषध, लाकूड, वृक्ष देतात म्हणून आम्ही दरवर्षी १५ ऑगस्टला शालेय परिसरात लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस त्याला खतपाणी आणि मातीचा भराव देऊन साजरा करतो. याच दिवशी वृक्षतोड थांबविण्याची प्रतिज्ञा दिली जाते.
(ब) जलसंधारण
‘थेंब थेंब किमती आहे, पाणी आपले जीवन आहे’ यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे मुलांना शिकविले जाते.
(क) शौचालय
‘गोद्रीमुक्त गाव’ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी गावकरी व विद्यार्थी यांच्यामध्ये जागृती निर्माण केली आहे. त्याचे फलित म्हणून गावात प्रत्येक घरी शौचालय बांधकामाला सुरुवात झालेली आहे.
शैक्षणिक उपक्रम-
सर्वच मुलांची ज्ञानग्रहणाची पातळी सारखी नसते. त्यामुळे काही विद्यार्थी मागे राहतात. त्यांना मागे ठेवून चालणार नाही. त्यांना पुढे आणण्याकरिता विविध शैक्षणिक उपक्रम शाळेत राबविले जातात. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढविण्याबरोबरच ज्ञानवृद्धी करण्याचा हेतू साध्य होतो.
वाचनालय
टी. व्ही.च्या मोहापायी आपला तासन्तास वेळ विद्यार्थी वाया घालवत असतात. त्यामुळे वाचनाची आवड कमी होत चालली आहे. आपण अल्पसा वेळसुद्धा वाचनासाठी देत नाही ही शोकांतिका आहे. विद्यार्थ्यांची संग्राहक वृत्ती वाढावी, पुस्तक हाताळणीचे कौशल्य प्राप्त व्हावे, वेळेचा सदुपयोग व्हावा, अवांतर वाचनाची गोडी लागावी, नवीन लेखकाची ओळख व्हावी म्हणून शाळेत छोटेसे वाचनालय आहे.
‘दिसामाजी काहीतरी लिहावे। प्रसंगी अखंड वाचीत जावे।।’ ही समर्थ्यांची उक्ती डोळ्यांसमोर ठेवून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘वाचाल तर वाचाल’ हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी कवितांचे व गोष्टींचे मिळून १९४ पुस्तकांचे वाचनालय सज्ज आहे.
विद्यार्थी सहकारी बँक
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्याच पैशातून उभी राहिलेली विद्यार्थी सहकारी बँक हा शाळेचा महत्त्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व समजावे तसेच बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी याकरिता सदर उपक्रमाचा उपयोग आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बचतीचे फायदे समजत असून गरज लागल्यास बँकेची मदतही होत आहे.
विद्यार्थी जनरल स्टोअर्स
गाव अतिशय लहान असून गावात एकही दुकान नाही. करिता शालेय उपयोगी सर्व साहित्य विद्यार्थ्यांना शाळेतच उपलब्ध व्हावे यासाठी विद्यार्थी बँकेची रक्कम जनरल स्टोअर्समध्ये गुंतवणूक होणाऱ्या नफ्याचा लाभ बँकेतील ठेवीदारांनाही होतो. शिवाय विद्यार्थ्यांला दर्जेदार साहित्य योग्य भावात व शाळेतच उपलब्ध होते. त्याशिवाय विद्यार्थी खरेदी-विक्री नफा-तोटा गणितीय संकल्पना प्रत्यक्ष अनुभव घेतात.
शालेय मंत्रिमंडळ
लोकशाहीप्रधान भारताचे जबाबदार नागरिक घडविण्यासाठी राज्यशास्त्राचे धडे विद्यार्थ्यांना बालवयातच मिळावे यासाठी शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, स्वच्छता, अर्थ, उद्योग, प्रशासन व संरक्षण आदी विभागाचे मंत्री विद्यार्थ्यांमधूनच निवडले जातात. दर महिन्यात नवीन विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळते, त्यातून विद्यार्थ्यांना राज्य कारभाराची जवळून ओळख होते.
सहभोजन
सहभोजन हा देखील एक पोषक सहशालेय उपक्रम म्हणून आम्ही राबवीत आहोत. भारतीय परंपरा जतन करणे, संवर्धन समभाव, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांच्या अंगी रुजाव्या म्हणून दुपारच्या सुट्टीमध्ये शाळेतील खिचडी घेऊन सर्व विद्यार्थी, शिक्षक आपला डबा घेऊन गोलाकार बसतात. ‘वदनी कवळ घेता.’ ही सामूहिक प्रार्थना म्हणून सहभोजनाचा आनंद घेतात. समाजमन व विद्यार्थी घडविण्याचे सामथ्र्य या सहभोजनातून मिळते.
संख्याज्ञान
सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, लहान-मोठी संख्या, संख्यांची अदलाबदल करून वाचन याद्वारे संख्याज्ञान देता येते.
संख्येवरील क्रिया
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करून घेता येतात.
सामान्य ज्ञान :
घडय़ाळ परिचय, नोटांचा परिचय, वार, महिने, तिथी, राशी, दिनांक, शके, शतक, जयंती आणि पुण्यतिथी इ. माहिती देता येते.
दादी नानी मेळावा
स्वातंत्र्यांच्या तब्बल ६३ वर्षांनी गावात उघडलेल्या शाळेत आपले नाती-नातू शिक्षणसोबतच विविध कलागुणांचे घेत असलेले धडे पाहण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी यांनाही संधी मिळावी याकरिता वर्षांतून एक दिवस दादी-नानी मेळावा आयोजित केला जातो.
माझा वाढदिवस
शाळेतील विद्यार्थी गरीब कौटुंबिक परिस्थितीत असल्याने घरी वाढदिवस साजरा करणे त्यांना व त्यांच्या पालकांना शक्य नाही. दूरचित्रवाहिन्यांवर अनेक कार्यक्रमांमधून मुलांचे साजरे होणारे वाढदिवस तसेच शालेय वाचनालयात येणाऱ्या वर्तमानपत्रात मुलांच्या वाढदिवसाच्या जाहिराती पाहून त्यांच्याही मनात वाढदिवस साजरा करावा ही इच्छा येत असेल याच भावनेतून प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेतच मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. त्याकरिता शिक्षक व गावातील दानशूर पालक यांच्या सहभागातून खर्चाची तरतूद केली जाते. व यामध्ये त्यांचाही सहभाग असावा, या उद्देशाने मुलांच्या बचत बँकेकडून एक छोटीशी भेट वाढदिवसाच्या दिवशी दिली जाते.
कात्रण चिकट वही
विद्यार्थी स्वत: वर्तमानपत्रातील कात्रणे गोळा करून वहीत चिकटवतात. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होते. ‘चित्र पाहा, माहिती लिहा’ वृत्तलेखनासारखा भाषा विषयाचे ज्ञान या उपक्रमांतून प्राप्त होते.
स्वच्छ व सुंदर शाळा, सुविचार संग्रह,
प्रश्न काढा, उत्तर द्या, बिनापाटीचा विद्यार्थी
किंग ऑफ वर्ड यासारखे उपक्रम राबविते. सर्वाचे वर्णन सविस्तर करणे शक्य नाही. त्यासाठी काही उपक्रमांचा सविस्तर वर्णन करून दाखविले आहे. वरीलप्रमाणे ‘टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ’ असा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतो. ‘जेथे आहे जिव्हाळा, तीच खरी शाळा’ ही म्हण शाळेसाठी सार्थ ठरते.
चिरंतन शिक्षण : विविध उपक्रमांतून जागृती
वघाळी नदीकाठावर वसलेले गाव हिंगणा बारलिंगा. अकोला शहरापासून १२ कि. मी. अंतरावर असून नदीच्या व गावाजवळून वाहणाऱ्या वरखेड नाल्याच्या पुरामुळे गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होते.
First published on: 05-05-2013 at 12:31 IST
Web Title: Various event for awareness in zilla parishad school