‘मर्ढेकर, अरुण कोलटकर, वसंत सरवटे आदींनी मराठी साहित्यातील विनोद समृद्ध केला’ हे म्हणणे कदाचित कुणालाही पटणार नाही. चिं. वि. जोशींसारख्या साहित्यिकावर ‘विनोदी लेखक’ असा कायमचा शिक्का मारल्यानंतर मराठी साहित्य क्षेत्राने अत्रे, पुलं आणि पुढे रमेश मंत्री वगरे यापलीकडला विनोद लक्षातच घेतला नाही; हा काही सरवटे, कोलटकर किंवा मर्ढेकर यांचा दोष नव्हे. यापकी दोघे कवी. सरवटे व्यंगचित्रकार. ‘बरी तोतजया नळाची, शिरी धार- मुखी ऋ चा’ म्हणणारे मर्ढेकर, ‘बळवंतबुवा’च्या नजरेने जग पाहणारे कोलटकर हे केवळ कविताच नव्हे तर विनोदही समृद्ध करताहेत, हे लक्षात घेतले गेले नाही. कारण, विनोद म्हणजे स्वत:वरही हसता येण्याची क्षमता, हे ओळखलेच गेले नाही. तेच सरवटे यांचे झाले. २०१६ च्या फेब्रुवारीत सरवटे यांनी नव्वदीत प्रवेश केला तेव्हाच्या सोहळ्यात, सरवटय़ांचे महत्त्व जाणणारे बहुतेक जण व्यंगचित्रकारच आहेत, हे लक्षात आले होते. सरवटे हे चित्रकार, हास्यचित्रकार, व्यंगचित्रकार, व्यंगचित्र-मालिकाकत्रे अशा भूमिकांमध्येच वावरले आणि त्या भूमिकांमधला सूक्ष्म फरकही त्यांनी ओळखला हे खरे; पण साहित्याच्याच वाटांवर नेहमी भेटणाऱ्या सरवटे यांचा िपड साहित्यिकाचा आहे, हे काही अभ्यासकांनी ओळखूनही समाजाने त्याकडे लक्ष पुरवले नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, चित्रांमधील आशयाऐवजी आपण आजही कौशल्याकडे अधिक पाहतो! कौशल्य तर सरवटे यांच्याकडे होतेच. कलेचे रीतसर शिक्षण न घेताही, ‘एसीसी’सारख्या करडय़ा सिमेंट कंपनीत नोकरी करतानाही त्यांनी रंगरेषांचा अभ्यास ताजा ठेवला होता. विस्तारलेली ‘बटाटय़ाची चाळ’ असो की कोल्हापुरी चपलांचा जोड-  स्थिर/ वस्तुचित्रांमध्ये अधिक तपशील आणि अधिक घनता देण्याचा त्यांचा निर्णय हा वस्तूंकडे आपल्याला नीट निरखूनच पाहायला लावण्यासाठी असे. ‘ललित’च्या दिवाळी अंकांची त्यांची मुखपृष्ठे स्वच्छ पांढऱ्या पाश्र्वभूमीवर पोपटी, गुलाबी, पिवळा अशा मोजक्याच पण प्रसन्न आणि ठसठशीत रंगांमध्ये असत.. ही सरवटे यांची सारी शैलीवैशिष्टय़ेदेखील एरवी ‘वाचक’ असणाऱ्यांना लक्षात राहिलेली असतील.. पण या शैलीमागे आणि ती सिद्ध करणाऱ्या कौशल्यामागे काही विचार होता, हे लक्षात राहिलेले कमी. तो विचार काय होता, याची चर्चा करणारे आणखी कमी. मध्यमवर्गीय जाणिवेच्या पलीकडे जाऊन साहित्यिकांनी मध्यमवर्गीय जगण्याचे निरीक्षण केले पाहिजे, हा जो विचार साठीच्या दशकापर्यंत तग धरून होता (पुढे तो मध्यमवर्गीयतेचेच कोडकौतुक पुरवताना आत्मरतीत वाहून गेला), तिथपासूनच सरवटे यांचीही सुरुवात झालेली दिसते. नंतरच्या दशकांत मराठी कवींनी किती जागतिक कवी वाचले, कादंबरीकारांनी किंवा कथाकारांनी मराठीपलीकडे किंवा स्वत:पलीकडे पाहिले की नाही, हा सारा भाग शंकास्पदच असला तरी सरवटे मात्र त्यांच्या साहित्य प्रकाराचा – व्यंगचित्रांचा- अभ्यास जागतिक संदर्भानिशी करीत राहिले होते. यातून मानवी भवितव्याबद्दलच्या यंत्रयुगोत्तर चिंता, हा त्यांच्या चिंतनाचा विषय ठरला. सत्तरीच्या दशकात एकविसाव्या शतकाबद्दलची व्यंगचित्रमालिका करताना, ‘‘समोरच्या बििल्डगमध्ये आज पॉवर सप्लायचा दिवस दिसतोय.. खिडक्या बंद दिसताहेत’’ अशी ओळ खाली असणारे दोन उंच इमारतींचे चित्र सरवटे यांनी काढले, तेव्हा ‘झोपु योजने’सारख्या, चाळकऱ्यांना जमिनीवरून उचलून लिफ्टही चालत नसलेल्या टोलेजंग खुराडय़ांमध्ये टाकणाऱ्या योजना कुणाच्या ध्यानीमनीही नव्हत्या! पण यथावकाश हे चित्र खरे ठरू लागले. मग आले अलीकडल्या ‘ललित दिवाळी’चे एक मुखपृष्ठ; ज्यात माणसे एका प्रचंड यंत्रातून, एकमेकांसारखीच होऊन बाहेर पडताहेत. ते यंत्र इतके मोठे की, एखाद्या मॉलची घाटदार इमारत जणू! सरवटे यांची निधनवार्ता शनिवारी आल्यानंतर त्यांना आदरांजली तर वाहिली गेलेली आहेच. आता यापुढे सरवटे यांच्या साहित्यिक महत्तेची चर्चा उपस्थित केल्यावर लोकांना कंटाळा वगरे येऊ लागला किंवा कोलटकर आणि मर्ढेकर यांसारखी नावे सरवटेंच्या नावासोबत घेणे चूकच, असे आधीच ठरवून टाकले, की मग ते यंत्राचे मुखपृष्ठही खरे ठरलेले असेल.

Story img Loader