भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात कायमच धावांची स्पर्धा रंगते. कधी रोहित पुढे जातो, तर कधी विराट त्याला ‘ओव्हरटेक’ करतो. टी २० क्रिकेटमध्येही सध्या विराट आणि रोहित यांच्यात सर्वाधिक धावांची शर्यत रंगली आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात ही शर्यत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. पण त्यातही सध्या विराट सर्वाधिक धावांच्या बाबतीत पुढे असला. तरी सलामीला येणाऱ्या रोहितला टी २० किंग बनण्यासाठी केवळ ८ धावांची आवश्यकता आहे.
विराट आणि रोहित
विराटने आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात नाबाद ७२ धावांची खेळी केली. या सामन्यात त्याने रोहितला मागे टाकत सर्वाधिक टी २० धावांचा विक्रम आपल्या नावे केला. पण रोहितकडे याच मालिकेत विराटच्या पुढे जाण्याची एक संधी आहे. भारताकडून मैदानावर फलंदाजीसाठी उतरल्यावर केवळ ८ धावा केल्यास रोहित शर्मा विराटच्या पुढे जाऊ शकणार आहे. पण त्याचे काम केवळ इथेच थांबणार नाही. याच सामन्यात कोहली मैदानावर खेळण्यासाठी उतरताच ही शर्यत अजून रंगतदार होईल.