कन्या : सहकार्य मिळेल
अमावास्या व्ययस्थानातून होत आहे. या कालावधीमध्ये स्वत:हून इतरांच्यात हस्तक्षेप करणे टाळा. बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. अफवांवर विश्वास न ठेवलेला चांगला. शुक्र तूळ राशीत धनस्थानात, मंगळ कन्या राशीत प्रथम स्थानात ५ सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. गणेश चतुर्थीला श्रीगणेशाचे आगमन सर्व कुटुंब एकत्रित येऊन उत्साहवर्धक वातावरणात कराल. नोकरदार वर्गाने केलेल्या प्रकल्पाचे कौतुक केले जाईल. व्यावसायिकदृष्ट्या अनेक सुविधा राबवणे सहज शक्य होईल. मोठ्या प्रमाणात केलेली आर्थिक गुंतवणूक नफा मिळवून देणारी ठरेल. मात्र उधारीवरती व्यवहार करणे टाळा. राजकीय क्षेत्रात कामांना गती मिळेल. मित्रांमार्फत होणारा व्यवहार लाभ करून देईल. कौटुंबिकदृष्ट्या सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत पथ्यपाणी सांभाळा.
शुभ दिनांक : १०, ११
महिलांसाठी : खर्च सांभाळून करा.
स्मिता अतुल गायकवाड