राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लखनऊमध्ये केलेलं वक्तव्य हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारं आहे अशी टीका विहिंपने केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी हे वक्तव्य पिंपरीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे. ते म्हणाले की, “शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हे जनतेची दिशाभूल करणारं असून यामुळे समाजात अशांती पसरेल. राम जन्मभूमी निर्माण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिले होते” असंही ते म्हणाले.
मिलिंद परांडे म्हणाले की, “लखनऊमध्ये जे शरद पवार यांनी वक्तव्य केले, मुस्लीम नागरिकाकरीता ट्रस्ट का नाही बनवली. हे दिशाभूल करणारे वक्तव्य आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजात अशांती पसरेल. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला राम जन्मभूमी निर्माणासाठी ट्रस्ट किंवा व्यवस्था बनविण्याचा आदेश दिलेला आहे. मुस्लिमांकरिता ट्रस्ट बनवली पाहिजे असा कुठलाही विषय सुप्रीम कोर्टाने सांगितला नाही. त्यामुळे नसलेले विषय उकरून काढणे किंवा निर्माण करणे ज्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम तेढ निर्माण होईल हाच हेतू या वाक्यामागे दिसत आहे. त्यामुळे एवढ्या जबाबदार नेत्याने बेजबाबदार वक्तव्य करून समाजाची अशांती निर्माण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
आणखी वाचा – राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही? : शरद पवार
पुढे ते म्हणाले की, CAA ला विश्वहिंदू परिषदेचं पूर्ण समर्थन आहे. एक मोठी ऐतिहासिक चूक दूर करण्याकरिता CAA आणलेले आहे. याविरोधात अनेक राजकीय पक्ष विरोधी भूमिका घेत आहेत ती चुकीची आहे. संबंधित कायदा हा कोणाचे नागरिकत्व रद्द करणारे नसून नागरिकत्व देण्याच्या हा कायदा आहे. जे हिंसेचा उपयोग करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे असे ही ते म्हणाले आहेत. देशाच्या विरोधात जे कोणी घोषणाबाजी करत आहे त्यांच्या विरोधात देखील कारवाई केली पाहिजे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हजारो संत देशभर फिरून CAA किती उपयोगी आहे हे समजावून सांगतील असं ते म्हणाले.