पर्यावरणाचा प्रश्न सध्या जगभरात गंभीर रुप धारण करत आहे. यामध्ये कचऱ्याचा प्रश्न आघाडीवर असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. शहरांच्या विविध भागांत असणाऱ्या कचऱ्याबरोबरच समुद्रात असणाऱ्या कचऱ्याची समस्याही मोठी असल्याचे समोर आले आहे. यामुळे समुद्रात असणाऱ्या जीवसृष्टीवरही त्याचा वाईट परिणाम होत आहे. समुद्रात रोज किती कचरा फेकला जातो याबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप इनिशिएटीव्ह या संस्थेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ही आकडेवारी ऐकून तुम्ही अक्षरश: हैराण व्हाल.
एका दिवसात जगभरात समुद्रात फेकला जाणारा कचरा थोडाथोडका नसून ९ कोटी २० लाख कीलो इतका आहे. यामध्ये जितके धागे आणि दोऱ्या मिळाल्या आहेत त्यापासून २८ किलोमीटर लांब टॉवेल बनू शकतो. तर समुद्र किनाऱ्यावर येणारे नागरिक याठिकाणी अनेकदा नारळपाणी, शीतपेये घेणे पसंत करतात. हे पिण्यासाठी वापरले जाणारे स्ट्रॉ समुद्र किनाऱ्यावर कायमच मोठ्या प्रमाणात सापडतात. एका दिवसात समुद्रात इतके स्ट्रॉ सापडतात की त्यापासून २४३ किलोमीटर लांबीचा स्ट्रॉ बनविला जाऊ शकतो. तर जगात समुद्रात इतक्या प्लास्टीकच्या बाटल्या सापडल्या की ज्यामुळे ५ स्विमिंग पूल भरु शकतील.
याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे सिगारेट ही केवळ मानवासाठीच हानिकारक नसून ती समुद्रासाठीही हानिकारक असते. समुद्रातून येणाऱ्या एकूण कचऱ्यातून २४ लाख सिगरेटची थोटकं मिळाली. ही सगळी थोटकं एकत्र केली तर ४२.१९५ कीलोमीटर इतकी त्याची लांबी होईल. ऑलिम्पिक मॅरेथॉनच्या स्पर्धेत स्पर्धकांना साधारण इतके अंतर धावावे लागते. याशिवाय १७ लाख अन्नपदार्थांच्या पिशव्या, १५ लाख प्लास्टीक बाटल्या, ११ लाखांपर्यंत प्लास्टीक बाटल्यांची झाकणे दिवसाला मिळतात. तर वर्षाला जवळपास ८० लाख मॅट्रीक टन प्लास्टीक समुद्रात जाते. या सगळ्या गोष्टींचा समुद्री जीवांवर परिणाम होत असून त्यांच्या जीवाला हानी पोहोचत आहे.