माटुंग्याच्या ‘वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च’ या व्यवस्थापन शिक्षणसंस्थेला मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. वेलिंगकर ही स्वायत्तता मिळविणारी व्यवस्थापन क्षेत्रातील मुंबईतील तिसरी शिक्षणसंस्था ठरली आहे. याआधी जेबीआयएमएस आणि सोमय्या या व्यवस्थापन क्षेत्रातील संस्थांना विद्यापीठाने स्वायत्तता बहाल केली आहे.
विद्यापीठाच्या प्राथमिक मान्यतेनंतर संस्थेचा स्वायत्ततेसंदर्भातील प्रस्ताव राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर करण्यात आला. या दोन्ही स्तरांवर संस्थेच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर विद्यापीठाने संस्थेला पुढील पाच वर्षांसाठी ही स्वायत्तता बहाल केली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापनविषयक पदवी अभ्यासक्रमांना ही स्वायत्तता लागू असेल.
पुढील वर्षांपासून अभ्यासक्रमांकरिता स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेऊन जागा भरल्या जाणार आहेत. ‘ही प्रवेश परीक्षा घेताना सर्जनशीलता आणि उपक्रमशीलता या गुणांच्या आधारे उद्योग क्षेत्रात नेतृत्व उभे करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यावर आमचा भर असेल,’ असे वेलिंगकर ‘वी-स्कूल’चे समूह संचालक प्रा. उदय साळुंखे यांनी सांगितले. ‘देशस्तरावरीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार अभ्यासक्रमांची आखणी करण्यावर आमचा भर राहील. तसेच, भविष्यात काही नवीन प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच इंटर्नशिपचा कालावधी तीन ते चार महिन्यांपर्यंत वाढविण्यावर आमचा भर असेल,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली. वेलिंगकरतर्फे मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मास्टर ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट, मास्टर ऑफ फायनान्स मॅनेजमेंट, मास्टर ऑफ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ ह्य़ूमन रिसोर्स मॅनेजमेंट (अर्धवेळ) हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविले जातात.

Story img Loader