काळाबरोबर मुलींचे मासिक पाळी सुरू होण्याचे वय कमी झाले आहे, तर आई होण्याचे वय वाढले आहे असे म्हटले जाते. स्त्रीच्या जीवनातील या दोन महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल सांगताहेत ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ….
आपल्याकडे मुलींची मासिक पाळी साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षांपासून पंधराव्या-सोळाव्या वर्षांपर्यंत सुरू होते. आशियाई देशांमध्ये इतर देशांच्या तुलनेत मुलींची पाळी लवकरच सुरू होण्याकडे कल दिसतो. दहा ते चौदा वर्षे हे पाळी सुरू होण्याचे योग्य वय समजले जाते. मुलीच्या वयाची नऊ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पाळी आली किंवा ती पंधरा वर्षांची होऊनही पाळी आलीच नाही तर स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखविणे गरजेचे आहे. एखाद्या मुलीची मासिक पाळी सुरूच न होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. शरीरात गर्भाशयच नसणे, गर्भाशयाची वाढ पुरेशी झाली नसणे, बीजकोषांची (ओव्हरीज) वाढ कमी असणे, शरीरात स्त्रवणाऱ्या हॉर्मोन्समध्ये कमतरता असणे अशी काही गंभीर कारणेही यात असू शकतात.
पाळी आल्यानंतर सुरूवातीच्या दिवसांत ती महिन्याच्या महिन्याला येईलच असे नव्हे. पहिल्यांदा पाळी आल्यावर चार- पाच महिने आलीच नाही असेही होऊ शकते आणि नंतर हळूहळू पाळीच्या चक्रात नियमितपणा येतो. काही मुलींची पाळी उशिरा येऊन त्यांना पाळीदरम्यान अंगावर खूप कमी जाते. तर काही मुलींची पाळी नियमित येऊनही त्यांची हीच तक्रार असते. यांतील प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे जावेच लागते असे नाही. मात्र काही मुलींच्या बाबतीत पाळीत सहा महिने, वर्षांचा खंड पडतो आणि नंतर पाळी येऊन वीस-पंचवीस दिवस रक्तस्त्राव थांबत नाही. याला ‘प्युबर्टल मेट्रोपॅथीया’ असे म्हणतात. रक्तस्त्राव खूप होत असेल तर मुलींचे हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे.
मासिक पाळी म्हटले की त्याबरोबर संकोचही येतो. पाळी नेमकी कधी सुरू होणार हे माहीत नसल्याने प्रत्यक्ष ती सुरू होते तेव्हा मुलगी घाबरून जाते. टीव्हीवरील जाहिराती, वेगवेगळे कार्यक्रम पाहून तिच्या मासिक पाळीबद्दल काही चुकीच्या कल्पना तयार होऊ शकतात. आता मुलींना शालेय अभ्यासक्रमातूनच स्वत:च्या शरीराबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न होतो. मात्र सर्व शिक्षकांना हा विषय परिपूर्णतेने सांगता येतोच असे नाही. त्यामुळे घरात मुलीची आई ,आजी, मोठी बहीण यांनी त्याविषयी अधिक माहिती करून घेऊन मुलीला ती तिच्या भाषेत समजावून सांगावी. यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. मुलगी सहावी- सातवीत गेल्यावर तिच्या दप्तरात अपारदर्शक पिशवीत सॅनिटरी पॅडस् ठेवून द्यावेत. वेळ आली की त्याचा वापर कसा करायचा ते आधीच शिकवावे. पाळी आल्यानंतर सॅनिटरी पॅड साधारणपणे किती वेळाने बदलावे, वापरून झालेल्या पॅडची विल्हेवाट कशी लावावी हेदेखील तिला वेळीच सांगायला हवे, शिकवायला हवे.
पाळी सुरू झाल्यानंतरचा टप्पा असतो लैंगिक शिक्षणाचा. मुलींची वाढ दहाव्या वर्षांपासून चौदा- पंधरा वर्षांच्या होईपर्यंत झपाटय़ाने होते. त्यामुळे या वेळी शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती मुलींना देऊन ठेवावी. तिची वृत्तीही या काळात बदलते. ती अधिक स्वप्नाळू होते. त्याबाबत तिला न रागवता आवश्यक त्या गोष्टी समजावून सांगाव्यात. पुरूष तिचा स्त्री म्हणून कोणत्या प्रकारे गैरफायदा घेऊ शकतात आणि अशा वेळी काय केले पाहिजे याबाबतची माहितीही तिला याच वयात देणे आवश्यक आहे.
फास्ट फूड खाण्याचे प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे. शाळेत सर्व मुली व्यायाम होईल असे मैदानी खेळ खेळत नाहीत. अशाने मुलींना लहान वयातच लठ्ठपणा येतो आणि त्यामुळे पाळीच्या चक्रावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे खाण्यावर योग्य नियंत्रण आणि नियमित व्यायाम या गोष्टी वाढत्या वयात गरजेच्या आहेत. याबरोबरच ‘पीसीओडी’ म्हणजेच ‘पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीझ’मुळेही पाळीत अनियमितता येऊ शकते. या समस्येचे प्रमाण मुलींच्यात खूप वाढताना दिसत आहे. अतिरिक्त वाढलेले वजन व पीसीओडी या दोन्ही कारणांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
आपल्याकडे ग्रामीण भागांत अजूनही मुलगी अठरा वर्षांची होण्यापूर्वीच तिचे लग्न करून देण्याचा घाट घालण्याचे प्रमाण मोठे आहे. मुलीच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी, खरे तर ती शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभी राहण्यापूर्वी तिचे लग्न करायचे नाही ही मानसिकता व्यापक प्रमाणावर रूजणे आवश्यक आहे.
लग्नाचे वय वाढण्याचे प्रमाण प्रामुख्याने शहरी समाजात आढळते. खरे पाहिले तर माणसाच्या अपेक्षांना अंत नसतो. शिकायचे होते ते शिकून झाले, नोकरी मिळाली की आणखी मोठय़ा पगाराची नोकरी मिळू दे, स्वत:चे घर होऊ दे, परदेशी जायची संधी मिळू दे नंतर लग्न करू, असा विचार केला जातो. पण वय वाढते तसा स्वभावात हट्टीपणा आणि शरीरात एक प्रकारचा कडकपणा (स्टिफनेस) येतो. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची, साहचर्याची सवय राहत नाही. तिशीत लग्न झाल्यावर बाळासाठी जोडपी पुन्हा दोन-तीन वर्षे थांबतात. त्यामुळे एखाद्या जोडीदारात दोष आढळला तरी तो लक्षात यायला आणखी उशीर झालेला असतो. स्त्रीला गर्भधारणा होण्याच्या दृष्टीने वाढलेले वय अडचणी निर्माण करण्याची शक्यता असते. पंचविशीत स्त्रीचे पहिले बाळंतपण वैद्यकीयदृष्टय़ा योग्य समजले जाते. त्यामुळे हवे ते शिक्षण पूर्ण झाल्यावर तरी मुलींनी लग्न लांबवू नये.

आम्हाला मूलच नको असे म्हणणारी जोडपी तुरळक आहेत. पण ‘एकच मूल पुरे’ असे नव्या पिढीतील काही जोडप्यांचे मत असते. एक टे मूल एक प्रकारच्या मानसिक घुसमटीत वाढते. त्यामुळे शक्य असल्यास त्याला एखादे भावंड असावे असा विचार जरूर करावा. हा विचारही योग्य वेळी करायला हवा. भावंडांमध्ये तीन- चार वर्षांचे अंतर असणे योग्य समजले जाते. हे अंतर किती असावे ते आईच्या वयानुसार ठरवावे. गर्भधारणेच्या वेळी स्त्रीचे वय जास्त असेल तर गरोदरपणातील मधुमेह किंवा अतिरक्तदाब (हायपरटेन्शन) या समस्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य वेळी गर्भधारणा होणेच इष्ट आहे.   
शब्दांकन- संपदा सोवनी

Story img Loader