अजितदादा बरेच सुधारले दिसतात, कारण शांत मुद्रेने ते प्रसार माध्यमांना समोरे गेलेले बघितले, असे प्रशस्तीपत्र शरद पवार यांनी दिल्यावर अजितदादांना आणखी हुरूप आलेला दिसतो. पृथ्वीराज चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार आहेत, मग त्यांना कशाला लागली विधानसभेची आमदारकी, अशा खोचक सवाल करतानाच नारायण राणे हे एकदम तुकडे पाडतात, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
एरवी फक्त कामापुरते बोलणारे अजितदादा विधिमंडळ आणि वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात मात्र एकदम बदललेले बघायला मिळाले. जोरदार बॅटिंग करताना अन्य नेत्यांच्या टोप्याही त्यांनी सहजतेने उडविल्या. दक्षिण कराड मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार का मागे घेतला, या प्रश्नावर शेकापचे गणपतराव देशमुख यांना सांगोल्यातून पाठिंबा दिला तसेच दुसरे बुजुर्ग म्हणून विलासकाका पाटील यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले. शेवटी काका महत्त्वाचे असतात, अशी गुगली टाकली. काका शरद पवार यांना उद्देशून तर हा टोला नव्हता ना, असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला.
कराडमध्ये विलासकाकांना निवडून द्या म्हणजे कराडला दोन आमदार मिळतील, असे आवाहन आपण प्रचाराला गेल्यावर करणार आहोत. पृथ्वीराज चव्हाण आधीच विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांना निवडून दिल्यास एकच आमदार शहराला मिळेल. विलासकाका निवडून आल्यास दोन आमदार (पृथ्वीराज आधीच विधान परिषदेचे आमदार असल्याने) लाभतील, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.
..तर पृथ्वीराजांच्या खात्यांची चौकशी
पावणे चार वर्षे निर्णय घेण्यास विलंब लावणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीच्या आधी दीड महिने अचानक सक्रिय होण्यामागे काही तरी काळेबेरे असावे, अशी शंका पवार यांनी उपस्थित केली. आधी बिल्डर्स आणि ठेकेदारांना भेटीसाठी वेळ दिला जात नव्हता. शेवटी तुमचे प्रकरण मार्गी लागले आहे, येऊन भेटा, असे निरोप दिले गेले. सत्तेत आल्यावर नगरविकास आणि गृहनिर्माण या पृथ्वीराज चव्हाण यांनी भूषविलेल्या खात्यांनी दोन महिन्यांन घेतलेल्या निर्णयांची चौकशी करू, असे सांगत काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काँग्रेसच्या जाहिरातीमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे स्वाक्षरी करताना दाखविण्यात येत आहेत. वेळेत स्वाक्षऱ्या केल्या असत्या तर ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा