साहित्य किंवा कोणत्याही कलेचा आस्वाद घेत असताना त्यातलं काहीतरी मनाला आत खोलवर भिडावं लागतं. तसं झालं की आपसूकच ओठांवर शब्द येतात.. ‘वा!’ हे तादात्म्य पावणं वा दाद देणं म्हणजे त्या कलाकृतीची समीक्षाच होय. या पाक्षिक सदरात या आस्वादाचा दरवळ वाचकांना अनुभवायला मिळणार आहे..

गौरी देशपांडे या लेखिकेचं सगळं काही आवडीनं वाचणारे आणि सगळ्यावर फुली मारणारे असे वाचकांचे दोन तट मला ठाऊक आहेत! तिच्या लेखनावर टीका करणारे आणि कौतुकाचा वर्षांव करणारे समीक्षालेखही नजरेत भरावेत इतके विरुद्ध ध्रुवावरचे आहेत. तिच्या लेखनमर्यादाही अनेकांनी उत्तम तऱ्हेनं दाखवलेल्या आहेत. तिची पात्रं तिला हवं तसं वागतात; तिचे प्रेमानुभव समाजापासून तुटलेले असतात, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. मला गौरी आवडते हे कळल्यावर एक मित्र भडकून म्हणाला, ‘अरे, पण तिच्या लेखनात काही स्वत:चा ‘थॉट’ नाही रे! कशी तुला आवडते?’ मला वाटतं, ‘थॉट’च्या पलीकडे, तिच्या स्त्रीवादी भूमिकेपलीकडेही तिचं साहित्य मला तिच्या भाषेमुळे आवडतं. आणि विनोदामुळेही! हो, गौरीची विनोदबुद्धी अफाट आहे. आणि त्याकडे म्हणावं तितकं लक्ष गेलेलं नाही आपलं.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
boy visiting museum joke
हास्यतरंग :  पुतळा तोडलास…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल

माझ्या पुढय़ातलं ‘विंचुर्णीचे धडे’ हे तिचं पुस्तक मी वाचतोय. फलटणजवळच्या विंचुर्णी या खेडय़ात राहायला गेलेली ती गौरी देशपांडे नावाची अति-संवेदनशील लेखिका, तिची स्वप्नं आणि त्यानंतरचा तो भ्रमनिरास! गंभीरच पुस्तक आहे ते.. याविषयी वादच नाही. माझा रोहित खाडिलकर नावाचा मित्र म्हणतो तसं ‘विषय कट्’! काही पुढे ऑग्र्युमेंटच नाही. पण त्याचवेळी त्या पुस्तकामध्ये लेखिकेने कमाल करत विनोदाचे निदान सात-आठ ठळक प्रकार जात्याच वापरले आहेत, हेही नक्की. त्याबाबतही विषय ‘कट्’!

हे बघा ना- विंचुर्णीची तोंडओळख थेट पु. ल. देशपांडय़ांच्या ‘खोगीरभरती’मधल्या ‘पानवाला’ या लेखातल्या अतिशयोक्तीपूर्ण विनोदाची आठवण करून देतेय मला!

‘‘पण फलटणपासून जेमतेम दहा कि. मी.वर असणारे विंचुर्णी भारताच्या नकाशात राहू द्या; पण महाराष्ट्राच्या नकाशातही सापडणार नाही. मला ते एकदाच, फलटणच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेत, त्यावेळच्या मॅनेजरने हाताने काढलेल्या, त्यांच्या खोलीत लटकलेल्या एका नकाशात आढळले होते. (म्हणून हरखून जाऊन मी तिथे एक ठेव ठेवली!)’’

कसला भारी ‘इंट्रो’ आहे यार! या शेवटच्या वाक्यात कर्वे-परांजपे कुटुंबियांच्या वर्तनात आणि लेखनात जाणवणारा ‘विक्षिप्ताचा विनोद’ही जाणवतो. गो. मा. पवार यांनी गंगाधर गाडगीळांच्या विनोदात विक्षिप्ताचा अंश असल्याचं म्हटलं आहे. गौरीच्या पुस्तकात तर तो असणारच! विंचुर्णीच्या तिच्या घरातल्या प्राण्यांची नावंही त्याची साक्ष देतात. एका मांजराचं नाव बेटाच्या आठवणीवरून ‘मायोर्का’ (जिची लवकरच ‘मायाक्का’ होते!). जपानच्या मुक्कामाची आठवण म्हणून अन्य दोन मांजरींची नावं असतात : ‘मोमो-रिंगो’! आणि एका बोक्याचं नाव तर पॉपस्टार असलेल्या डेव्हिड बूईवरून तेच ठेवलं जातं! हा बोका सुंदर, पांढराशुभ्र असतो. त्याचा एक डोळा निळा आणि एक तपकिरी असतो. आणि म्हणून तो होतो- ‘डेव्हिड बूई’! गौरीनं एवढं सांगून पुढे लिहिलंय : ‘‘अजूनही इकडेतिकडे फलटणात फिरताना एकदम एक गुबगुबीत पांढरेशुभ्र मांजर नजरेस पडले तर समजावे : डेव्हिड बूईची त्याच्या आईशी चांगली ओळख होती!’’

हे लिहितानाही मी अशक्य हसतोय! भाषेशी खेळणं हा विनोदाचा प्राण नसला तरी डोळा असतो. चांगल्या विनोदनिर्मितीसाठी लेखकाची भाषेकडे बघायची नजरही त्याला थोडी पालटावी लागते. उपहास हे त्या बदललेल्या नजरेचंच पर्यवसान असतं. कोल्हटकरांपासूनची ही विनोद परंपरा ‘विंचुर्णीचे धडे’मध्ये समाजाचे प्रश्न मागे धरत सशक्तपणे उभी राहिलेली आहे. विंचुर्णीच्या नित्य दुष्काळाचं वर्णन करताना गौरीनं पटकन म्हटलंय : ‘‘(पाझर) तलाव आटत जातो तसे आमच्या तोंडचे पाणीही!’’ हे आता अत्यंत बुद्धिमान- witty असं विधान आहे. ‘तोंडचे पाणी’ या दोन शब्दांमुळे गांभीर्य येतं आणि शाब्दिक मजाही येते. मग ती पुढे हाँगकाँगमध्ये जाऊन नवरा भेटल्यावर त्याच्या गळ्यात पडून रडते. तिनं लिहिलंय,- ‘‘त्याला बिचाऱ्याला वाटते, की मी त्याला भेटल्याच्या आनंदानं रडतेय म्हणून. पण मी लगेचच त्याचा भ्रमनिरास करून सांगते- ‘हा एवढा पाऊस काय करायचाय इथे? तिथे (विंचुर्णीत) माझी झाडं, जनावरं, माणसं पाण्याविना मरत असताना!’ त्यालाही आता सवय झालीय म्हणा!’’

आणि मग अशा प्रसन्न, नर्मविनोदाची ‘सवय’ आपल्याला होते- न होते तोवर ती थेट हल्ला करणारी वाक्यं लिहिते. तिच्याकडे काम करणारा पोरगेला गोरख ‘निंबाळकर’ असल्याने त्याला सारे ‘अहो-जाहो’ करतात हे बघून तिनं अजूनही समाजातली सरंजामशाही उपहासात पकडत लिहिलंय : ‘‘आणि मला जरा खेदानेच उमजले की ‘निंबाळकर’ म्हणजे इथले राजघराणे! ते समजेला कमी, भाकरीला महाग आणि गुणांना नन्ना असले तरी ‘अहो-जाहो’च!’’

गौरीचं हे वाक्य वाचताना मला जुन्या काळातल्या बायका वापरायच्या तशा म्हणींची आठवण होते आहे. गौरीचा हा औपहासिक विनोद नेहमी कोटीबाज, शब्दप्रधान नसतो. ‘बत्ती’ किंवा ‘भाकरी- भाजी-भात’ यांसारख्या प्रकरणांमध्ये एकच एक वाक्यातला विनोद नाही. त्या साऱ्या परिच्छेदांमध्ये जे विनोदाचं सूत्र आहे त्यातून मग सहानुभूती बाळगणारा, आशावादी, निर्विष विनोदही तयार होतो. एकंदर ते सारं चित्र प्रसन्न, आल्हाददायक आहे. घरात काम करणाऱ्या नानींच्या हाताला मुळीच नसलेली चव, भाजीखरेदीत होणारे पुणेरी मराठी आणि विंचुर्णीच्या बोलीभाषेतले गोंधळ, तिचा लाडका भात आणि नानींची लाडकी झणझणीत चटणी- हे सारं वर्णन गमतीत केलंय तिनं! पण त्याचवेळी तिला हे पक्कं  माहितीय- की दोन सामाजिक वर्गातल्या तफावतीबद्दल बोलते आहे ती! पण कुठे कुचेष्टा नाही. किल्मिष नाही. शहरी छान आणि ग्रामीण अती-छान (एन. जी. ओ. लेखकटाईप!)- असलंही नाही! म्हणूनच ती लिहू शकते : ‘‘कधीतरी पुण्याला असताना वीजपुरवठा खंडित झाला तेव्हा आसपासच्या सर्व लोकांची जशी फें-फें उडाली, तशी आमची कधीच िवचुर्णीला उडत नाही. कारण बत्ती गेल्यावर- ‘गेली का? करत असतील पुण्या-मुंबईची भर!’ असे म्हणून आम्ही हसत आपले कंदील, काकडे, चिमण्या लावायला लागतो.’’

आणि असं प्रसन्न लिहिणारी गौरी एकदम अंधारात शिरल्यासारखी शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये शिरते.  म्हणते, ‘‘..गरगरत मी खिन्न औदासीन्याकडेच नाही, तर काहीशा व्यसनाधीनतेकडे, कडवट  cynicism कडे अधिकाधिक खोलात जाऊ लागले.’’ आणि मग धक्काच बसतो. आपण जे विनोदाचं अंत:सूत्र हेरलंय ते चुकलं का, अशी शंका येते. पण गौरीच तो विनोद अधोरेखित करत म्हणते पुढे : ‘‘आशा-निराशेच्या क्षणी मी हातात पेन घेतले..भरभर लिहून झाले. आणि ते लिहिताना बऱ्याच काळाने मनापासून हसायला आले. मला आठवत गेला- माझ्या विंचुर्णीतला आनंद, उल्हास, अभिमान..’’

अन् मग मला मात्र आठवतंय- केटी पेरी या गायिकेचं ‘रोअर’ हे अतीसुंदर गाणं! जंगलात एकटी पडलेली केटी.. तिच्यासोबतच्या माणसाचा एका वाघाने क्षणार्धात केलेला खात्मा.. तिथून तिने काढलेला पळ.. मग जंगलात मिळवलेली आत्मशक्ती.. आणि मग निश्चयी विधान :

kI got the eye of the tiger, a fighter

and you gonna hear me roar…l

(‘वाघाचे हे डोळे मिळती; नजर आता योद्धय़ाची ही! सर्वाना ऐकावी लागेल डरकाळी मग माझीही!’)

गौरीच्या शेवटच्या पुस्तकाच्या अगदी शेवटाला- ‘उत्खनन’ या कादंबरीत- वाघनख्या आल्या, पण डरकाळी मात्र ऐकू आली नाही. कधी कधी सारे बंध- नात्यागोत्यांचे, समाजसंकेतांचे, जीवलगांचेही- झुगारून माणसाला, लेखकाला डरकाळी फोडावी लागते! त्या क्षणाची ती जणू गरजच असते! अन् मग वाटत राहतं की, या बुद्धिमान, संवेदनशील गौरी देशपांडे नामक लेखिकेची तशी डरकाळी फोडायची ताकद आणि कुवत असतानाही तिनं ती कधी उद्गारली का नाही?  तिच्या लेखनमर्यादांचं मूळ इथे तर नसेल? गौरीची पुस्तकं वाचताना अनेकवार तो ‘वा!’ बाहेर पडल्यावरही काहीतरी राहून गेल्याची भावना येते, ती यामुळे तर नसेल? पण एक मात्र नक्की.. पक्कं : डेव्हिड बूईइतकीच तिची लेखणीही देखणी आहे! आणि तीही एक अवघड सिद्धी आहे! विषय ‘कट्’!

डॉ. आशुतोष जावडेकर
 ashudentist@gmail.com