लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या २० भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नाणी, पैठणी, मोबाइल संच आणि गिफ्ट व्हाऊचर अशी पारितोषिके शनिवारी सिनेअभिनेत्री संपदा जोगळेकर आणि वीणा वर्ल्डच्या संचालिका वीणा पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. या वेळी ‘लोकसत्ता’चे तरुणकुमार तिवाडी उपस्थित होते.
फोटो गॅलरीः ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’
‘लोकसत्ता’ आयोजित ठाणे शॉपिंग फेस्टिवलला २४ जानेवारीपासून मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली आहे. या फेस्टिवलमधील प्रत्येक दिवशीच्या भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येत असून त्यासाठी सिनेकलावंत उपस्थिती लावत आहेत. त्यामुळे या स्पर्धेविषयी आणि पारितोषिक वितरण सोहळ्याविषयी स्पर्धकांमध्ये कुतूहल असल्याचे दिसून येते. या फेस्टिवलमधील २८,२९ आणि ३० जानेवारी या तीन दिवसांतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा शनिवारी वीणा वर्ल्ड यांच्या ठाण्यातील बीकेबीन येथील कार्यालयात पार पडला. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या सिने अभिनेत्री संपदा जोगळेकर आणि वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी विजेत्या स्पर्धक, त्यांचे नातेवाईक आणि अन्य स्पर्धक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्वप्नाली जोशी, माधवी पाटील आणि अश्विनी गांगल, या तीन स्पर्धकांना सोन्याची नाणी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते.
आश्चर्य आणि आनंद
आजवर कधी लॉटरीचा शेवटचा नंबरही लागला नाही पण, लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सोन्याच्या नाण्याचे पारितोषिक लागले. त्यामुळे खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला आहे. तसेच हा उपक्रम अतिशय चांगला आहे, अशी प्रतिक्रया अश्विनी गांगल यांनी व्यक्त केली.
अश्विनी गांगल, ठाणे
उत्साह वाढला
ठाण्यात आईसोबत खरेदी करण्यासाठी आले आणि हस्तकला दुकानात या फेस्टिवलचे कुपन भरून दिले. पारितोषिक लागेल की नाही, याविषयी खात्री नव्हती. पण, सोन्याचे नाणे लागल्यामुळे माझ्यासह कुटुंबीय खूप खूश आहेत. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे सर्वाचा शॉपिंग करण्याचा उत्साह वाढला आहे. नवीन संकल्पना आहे. त्यामुळे हा उपक्रम उत्साहवर्धक आहे. तसेच पारितोषिकेही उत्तम ठेवली आहेत.
स्वप्नाली जोशी, ठाणे
खरेदी करा आणि जिंका..
ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणारे भाग्यवान ग्राहक बक्षिसांचे विजेते ठरत आहेत. खरेदीचे बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे एक कुपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कुपन्स ग्राहय़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कुपन्स संकलित करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येत आहेत. त्यातून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्याची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरातील दुकानदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.