मुखी विठ्ठलनामाचा गजर, हाती टाळमृदुंग आणि खांद्यावर भगवी पताका अशा संत मुक्ताबाईची पालखी गुरुवारी बीडमध्ये दाखल झाली. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी रांगोळीची पखरण केली होती. गेल्या २०७ वर्षांपासून मुक्ताबाईची पालखी आषाढी वारी करीत आहे.
पालखीचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. टाळमृदुंगाच्या गजरात मुक्ताबाईच्या पालखीने बीड शहर भक्तिमय होऊन गेले. मध्य प्रदेशमधील नारायणखेडा गावातील प्रकाश महाजन यांची बलजोडी या पालखीसमवेत आहे. विनायकमहाराज हरणे हे िदडीचालक, तर सुधाकर पाटील पालखीचे पुजारी आहेत. मुक्ताईनगर ते पंढरपूर या प्रवासात एकूण ३४ मुक्काम होतात. पालखीसोबत शासकीय डॉक्टरांचे पथक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाण्याचे टँकर, वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असतात. मुक्ताईनगर, मलकापूर, बुलढाणा, चिखली, देवळगाव राजा, जालना, गेवराई, बीड, पाली, चौसाळा असा पालखीचा मार्ग आहे.
गुरुवारी पालखी बीड शहरात दाखल झाली. येथे संत मुक्ताई व त्यांचे आजोबा श्रीधर पंत यांची भेट होते. गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहरातील िबदुसरा नदीच्या काठावर श्रीधर पंतांची समाधी आहे. या ठिकाणी संत मुक्ताबाईची पालखी येते.