प्रसारमाध्यमे :
अतिशय वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रात प्रसारमाध्यमांचा समावेश ठळकपणे करावा लागेल. वर्तमानपत्रांची संख्या वाढली आहे. देशातील लहान-मोठय़ा शहरांमधून वृत्तपत्रे प्रकाशित होत आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडियो या क्षेत्रांची वाढ विस्मयचकित करणारी आहे. या वाढीमुळे या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासते. या क्षेत्रात करिअरच्या पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात-
* जाहिरात व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी :
या व्यक्तींना संभाव्य ग्राहक, सृजनशील चमू आणि माध्यमांसोबत संवाद साधावा लागतो. सृजनशील कल्पना सुचवाव्या लागतात. संकल्पनांचं सादरीकरण करावं लागतं. आर्ट वर्क्‍सची निर्मिती आणि माध्यमांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाचं संनियंत्रण करावं लागतं. कोणत्याही विषयातील पदवीधराला ही संधी मिळू शकते. तथापि, ‘मास कम्युनिकेशन’मधील विशेषत: जाहिरात विषयातील पदविका व एमबीए (मार्केटिंग) असल्यास उत्तम. वार्षकि वेतन साधारणत: चार ते पाच लाख रुपयांपर्यंत राहू शकतं. हे क्षेत्र अत्यंत स्पर्धात्मक असल्यानं आपल्या गुणवत्तेवर आणि परिश्रमावर वेतनाचे पुढील टप्पे लवकर गाठता येतात.
* जाहिरात विक्री प्रतिनिधी :
या व्यक्तींना जाहिरात तसेच माध्यम संस्थांशी व्यवसायाच्या अनुषंगानं चर्चाविनिमय करावा लागतो. अधिकाधिक जाहिराती मिळवून व्यवसायवृद्धी करण्याचं उद्दिष्ट अशा व्यक्तींना दिलं जातं. महसूल वाढीसाठी या व्यक्तींची कामगिरी उपयुक्त ठरत असल्यानं अशा व्यक्तींना प्रगतीच्या विपुल संधी मिळू शकतात. कोणत्याही विषयातील पदवी आणि एमबीए इन मार्केटिंग अशी अर्हता असणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात संधी मिळू शकते. प्रारंभीचे वार्षकि वेतन साडेचार लाख रुपये ते पाच लाख रुपये असू शकते. शिवाय वेळोवेळी वित्तीय प्रोत्साहन दिलं जातं.
* माध्यम नियोजनकार (मीडिया प्लॅनर) :
विविध माध्यमांसाठी जाहिरात, प्रसिद्धी वा जनसंपर्कासाठी आवश्यक असणाऱ्या माध्यम नियोजनाचं काम या व्यक्तींना करावं लागतं. माध्यम प्रस्तावांचं विश्लेषण आणि वस्तुनिष्ठ मांडणी करावी लागते. ग्राहकांचे अधिकाधिक समाधान करणाऱ्या, व्यवहार्य व ग्राहक आकर्षति होतील अशा कल्पना सुचवाव्या लागतात. जाहिरात विषयातील पदविका आणि मार्केटिंग विषयातील एमबीए असल्यास प्राधान्य मिळू शकतं. कोणत्याही विषयातील पदवी आणि काही संस्थांनी सुरू केलेली एमबीए इन मीडिया प्लॅिनग अशी अर्हता या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी योग्य ठरते. वार्षकि वेतन साडेतीन लाख रुपये ते चार लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं. तुमच्या परिश्रमानुसार व गुणवत्तेवर आधारित वेतनवृद्धी वा इतर सुविधा मिळू शकतात.
* कॉपी रायटर :
जाहिरातीच्या क्षेत्रात या व्यक्तींना महत्त्वाचं स्थान असतं. उत्तम कॉपी लेखकाला करिअरच्या विपुल संधी प्राप्त होऊ शकतात. क्रिएटिव्ह चमूसोबत विचारविनिमय करून  सृजनशील, चटकदार कॅचलाइन तयार करणं, शीर्षक ठरवणं, जाहिरातीच्या ओळी तयार करणं यासारखी सृजनशील कामं या व्यक्तीला करावी लागतात. कोणत्याही विषयातील पदवीधराला कॉपीरायटर म्हणून संधी मिळू शकते. तथापि, जाहिरात वा ‘मास कम्युनिकेशन’मधील पदवी अथवा पदविका असल्यास उत्तम. त्याचबरोबर किमान दोन-तीन भाषांवर प्रभुत्व असावं. प्रारंभी वेतन साडेतीन लाख ते चार लाखांपर्यंत मिळत असलं तरी प्रतिभावंत कॉपीरायटरला यापेक्षा अधिक वेतन मिळू शकतं. आíथक प्रगतीच्या संधीही लवकरात लवकर मिळू शकतात.
* वार्ताहर :
मुद्रित वा इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी वार्ताकन करण्याची संधी मिळू शकते. समाजातील विविध क्षेत्रांतील घटनांवर-घडामोडींवर नजर ठेवणे, नावीन्यपूर्ण बातम्यांचा शोध घेणे आदी कामे बातमीदाराला करावी लागतात. कोणत्याही विषयातील पदवीधराला वार्ताहर म्हणून संधी मिळू शकते. तथापि, ‘मास कम्युनिकेशन’ वा पत्रकारिता विषयातील पदवी-पदविका असल्यास उत्तम. केंद्र आणि राज्य सरकारच्या माहिती विभागात तसेच प्रसारमाध्यमांमध्येही संधी मिळू शकते. वार्षकि वेतन  अडीच लाख रुपयांपासून साडेतीन लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं. तथापि, संबंधित व्यक्तीच्या गुणवत्तेवर आणि प्रतिभेच्या आधारावर प्रगतीच्या संधी झपाटय़ाने उपलब्ध होऊ शकतात.  
* इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कार्यक्रम अधिकारी :
या क्षेत्रातील व्यक्तींना विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवाव्या लागतात. कार्यक्रमाच्या निर्मितीनंतरचे सोपस्कार (पोस्ट प्रॉडक्शन) पार पाडावे लागतात. कार्यक्रमनिर्मितीआधी नियोजन आणि तयारीचे व्यवस्थापन करावे लागते. कार्यक्रमाची प्रभावी व वेळेवर निर्मिती करण्याचं मुख्य काम या व्यक्तींचं असतं. कोणत्याही विषयातील पदवी आणि ‘मास कम्युनिकेशन’ अथवा पत्रकारितेतली पदवी असल्यास उत्तम. सध्या काही संस्थांनी टीव्ही प्रॉडक्शन पदविका अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. अशा अभ्यासक्रमांचाही या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या क्षेत्रात  प्रारंभीचं वार्षकि वेतन साडेतीन लाख रुपये ते चार लाख रुपये मिळू शकतं. तथापि, उच्च वेतन आणि झपाटय़ानं वरच्या टप्प्यावर जाण्याची संधी संबंधित व्यक्तीच्या गुणवत्तेवर व परिणामकारक कार्यशैलीवर अवलंबून असते.
* निवेदक :
विविध प्रसारमाध्यमांमध्ये तसेच खासगी कार्यक्रमांमध्ये निवेदनाची हातोटी असलेल्या निवेदकांची आवश्यकता असते. उत्कृष्ट संवाद साधण्याचे कौशल्य, आत्मविश्वास, उत्तम वाचन आणि चालू घडामोडींचे उत्तम ज्ञान ही गुणकौशल्ये उत्तम निवेदनासाठी आवश्यक ठरतात. त्याचबरोबर शब्दफेक, ठहराव, आवाजाचा पोत त्यातील चढ-उतार या गोष्टींवरही काम करावे लागते. स्वतंत्रपणे अथवा प्रसारमाध्यमांमध्ये आवडत्या विषयांच्या निवेदनाचे काम करता येते. अत्यंत सृजनशील, कामाचे समाधान देणारे, वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांसोबत वावरण्याची संधी देणाऱ्या या क्षेत्रात तयारीनिशी उतरायला हवे. या क्षेत्रात तुम्ही तुमचे स्थान निर्माण केलेत तर कामाचा उत्तम मोबदला अथवा मानधन मिळू शकते.
* अध्यापन :
अध्यापनाचे क्षेत्र उत्तम आणि मानाचे करिअर घडवण्याचे क्षेत्र आहे. छोटय़ा-मोठय़ा शहरांमध्ये वेगवेगळ्या विद्याशाखांचे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या शैक्षणिक संस्था सुरू होत असून तिथे अध्यापकांची मोठय़ा प्रमाणावर गरज भासते. त्याखेरीज वेगवेगळ्या स्तरांवरील खासगी शिकवणीवर्गामध्येही शिकवण्याची हातोटी असलेल्या अध्यापकांची आवश्यकता असते. आज अध्यापकांना उत्तम वेतन, भत्ते मिळतात तसेच नवी पिढी घडवण्याचे समाधानही मिळते. संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, बी.एड् अशी अर्हता असणाऱ्या ज्या उमेदवारांकडे प्रभावीपणे शिकवण्याचे कौशल्य आहे, त्यांना या क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नया है यह!
मास्टर्स प्रोग्रॅम इन मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी- हा अभ्यासक्रम खरगपूरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीने सुरू केला आहे.
कालावधी- ३ वष्रे.  अर्हता- एमबीबीएस.
पत्ता- आयआयटी, खरगपूर- ७२१३०२.
वेबसाइट- gate.iitkgp.ac.in/mmst
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com

नया है यह!
मास्टर्स प्रोग्रॅम इन मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी- हा अभ्यासक्रम खरगपूरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीने सुरू केला आहे.
कालावधी- ३ वष्रे.  अर्हता- एमबीबीएस.
पत्ता- आयआयटी, खरगपूर- ७२१३०२.
वेबसाइट- gate.iitkgp.ac.in/mmst
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com