राज्याच्या व्यवसाय शिक्षण विभागामार्फत रोजगार-स्वयंरोजगारासाठी आवश्यक ठरणारे कौशल्य निर्मिती अभ्यासक्रम चालविण्यात येतात. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख-
केंद्र सरकार आणि राज्य सरकार कौशल्यनिर्मिती अभ्यासक्रमांवर भर देत आहे. ‘मेक इन इंडिया’ अथवा ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पना यशस्वी करण्यासाठी विविध घटकांसोबत कौशल्यप्राप्त मनुष्यबळाचा मोठा हातभार आवश्यक ठरणार आहे. रोजगारासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी कौशल्यनिर्मितीचे अभ्यासक्रम कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात.
अलीकडे उत्तम तंत्रज्ञ मिळणं दुरापास्त ठरत आहे. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या-स्वयंरोजगाराच्या संधी असूनही अशा नोकऱ्यांपासून वंचित राहण्याची वेळ शिक्षित मुलांवर ओढवत आहे. त्यामुळे दहावीनंतर विद्यार्थ्यांनी अशा अभ्यासक्रमांचा विचार करायला हवा. राज्याच्या व्यवसाय शिक्षण विभागामार्फत रोजगारासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरू शकतील असे अभ्यासक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहेत.
या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना व्यवसाय कौशल्य प्राप्त होत असल्याने याद्वारे कारखान्यांतील कुशल कामगारांची गरज भागवता येणे शक्य आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच आठवीनंतर शिक्षण घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतात.
हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पॅरामेडिकल, शिवणकाम, कृषी, रसायने, संगणक, विद्युत, भाषा, सौंदर्यसाधना, मुद्रण, चामडी वस्तू, वाणिज्य, वस्त्रप्रावरणे, कॅटिरग, सिव्हिल आदी. यातील काही सहा महिन्यांचे, एक वर्ष कालावधीचे तर काही दोन वष्रे
कालावधीचे आहेत.
मूलभूत तंत्रज्ञान, यांत्रिकी तंत्रज्ञान, विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान या तीन गटांमध्ये माध्यमिक पूर्वस्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम विभाजित करण्यात आले आहेत.
वेल्डिंग आणि प्लंबिंग, फिटिंग आणि ग्रामीण तंत्रज्ञान, कार्यशाळा तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, विजेवर चालणारी यंत्रे आणि घरगुती उपकरणे, मूलभूत विद्युत ज्ञान, संगणक माहिती व तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचा समावेश ‘विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान’ या गटात होतो.
वैद्यकशास्त्र, कृषी, ऊर्जा अभियांत्रिकी, चित्रकला, घर आणि पर्यावरण, ऊर्जा व पर्यावरण, कृषी व्यवसाय, गृह आणि आरोग्य, अभियांत्रिकी कार्यशाळा या विषयांचा ‘मूलभूत तंत्रज्ञान’ या गटात समावेश होतो.
संगणक माहिती व तंत्रज्ञान वेल्डिंग कार्यशाळा, मूलभूत विद्युत तंत्रज्ञान, प्लंिबग ऑटो अभियांत्रिकी, सुतारकाम आदी विषयांचा समावेश ‘यांत्रिकी तंत्रज्ञान’ या गटात होतो.
शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांना सुमारे ८० हजार विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि त्यांना मनात उद्योजकतेची बीजे रोवणे यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतात.
उच्च व्यवसाय अभ्यासक्रम
१०+२ स्तरावरील उच्च व्यवसाय अभ्यासक्रम वाणिज्य गट, मत्स्य गट, कृषी गट, तांत्रिक गट, आरोग्य व वैद्यकीय सेवा गट आणि गृहविज्ञान अशा गटांमध्ये विभाजित करण्यात करण्यात
आले आहेत. हे अभ्यासक्रम केल्यानंतर स्वयंरोजगार सुरूकरता येणं शक्य व्हावं, म्हणून सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल साहाय्य योजनेंतर्गत आíथक मदत केली जाते. व्होकेशनल टेक्निशिअन म्हणून या विद्यार्थ्यांना ‘शिकाऊ उमेदवारी योजने’अंतर्गत एक वर्षांसाठी शिकाऊ उमेदवारी करण्याची संधी उपलब्ध होते. या अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांचा भरपूर सराव करून घेतला जातो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं तांत्रिक कौशल्य सुधारतं. प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कारखान्यात काम करण्याची संधी दिली जाते. काही अभ्यासक्रमांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमांच्या समकक्ष दर्जा देण्यात आला आहे.
* इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी गटातील अभ्यासक्रम केल्यानंतर स्वयंरोजगाराच्या संधी पुढील क्षेत्रांत मिळू शकतात- इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखभाल-दुरुस्ती, वैद्यकीय आणि उद्योजकीय इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निगा आणि दुरुस्ती, इंटरकॉम उभारणी, दृक्श्राव्य उपकरणांची सार्वजनिक ठिकाणी उभारणी तसेच इमर्जन्सी लाइट, इलेक्ट्रॉनिक खेळणी उत्पादने इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती, विक्री करता येणे शक्य आहे.
* इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यानंतर रोजगाराच्या संधी पुढील क्षेत्रांत मिळू शकतात- विक्री प्रतिनिधी, रासायनिक औषध कापड गिरणी उद्योगांमध्ये यंत्रांची आणि मोटारींची दुरुस्ती, घरगुती विद्युत उपकरणांची दुरुस्ती, तपासणी, उभारणी, देखभाल आदी कामे करता येतील. छोटी उपकरणे निर्मिती, वॉटरपंप दुरुस्ती केंद्र उपकरणे विक्री एजन्सी, दुरुस्ती केंद्र आदी स्वंयरोजगार करता येऊ शकतील.
* मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यावर फॅब्रिकेशन वर्कशॉप, कंपनीच्या छोटय़ा भागांची निर्मिती असे स्वयंरोजगार करता येतील. फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टर्नर बनून यंत्रांची देखभाल दुरुस्तीचे काम मिळू शकते.
* ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यानंतर चारचाकी-दुचाकी वाहनांची दुरुस्ती जमू शकते. डिझेल आणि पेट्रोलच्या स्वयंचलित वाहनांची दुरुस्ती, तपासणी, ड्रायव्हिंग हे रोजगार मिळू शकतात.
* कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यानंतर जाहिरात निर्मिती केंद्रे, डीटीपी केंद्र, डिझायिनग, इंटरनेट सेवा, जॉब वर्क्स, प्रोजेक्ट वर्क आदी स्वंयरोजगार करता येतात. शासकीय, खासगी आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये मल्टिमीडिया इंटरनेट तंत्रज्ञ, डीटीपी, अॅनिमेशन, कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रॅमर, इंटरनेट सíव्हस प्रोव्हायडर इंडस्ट्रीज, इंटरनेट कॅफे विक्री प्रतिनिधी, संगणक यासारखे रोजगार मिळू शकतात.
* कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यानंतर इमारत बांधणी साहित्य पुरवठा, गृहनिर्माण संस्थांची देखभाल, दुरुस्तीचे कंत्राट, कामगार/ मजुर कंत्राट आदी स्वयंरोजगार करता येतील. इमारत कंत्राटदाराकडे गवंडी, प्लंबर, रंगारी, परिसर अधीक्षक आदी रोजगार उपलब्ध होतात.
द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम
हे अभ्यासक्रम रासायनिक प्रकल्पांचे कामकाज, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल अभियांत्रिकी, स्कूटर आणि मोटार सायकल दुरुस्ती, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान, गोडय़ा पाण्यातील मत्स्य व्यवसाय, पीक शास्त्र, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, कार्यालय व्यवस्थापन, लघुउद्योग आणि विक्री, विक्री आणि विपणन, बँकिंग, संगणक शास्त्र, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स या विषयांमध्ये करता येतात.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर हे अभ्यासक्रम केल्यानंतर रोजगार – स्वंयरोजगारासाठी उपयुक्त ठरू शकतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसुद्धा घेता येतं. द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी कायद्यांतर्गत व्होकेशनल टेक्निशियन म्हणून एक वर्षांची शिकाऊ उमेदवारी मिळू शकते.
नया है यह!
डिप्लोमा कोर्स इन रेल ट्रान्सपोर्ट अॅण्ड मॅनेजमेंट
हा अभ्यासक्रम रेल्वे मंत्रालयाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ रेल ट्रान्सपोर्ट या संस्थेने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पत्राद्वारे पूर्ण करता येतो. अभ्यासक्रमाचे शुल्क- पाच हजार रुपये.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवीधराला हा अभ्यासक्रम करता येईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात मुंबई हे या परीक्षेचे केंद्र आहे.
पत्ता- रूम नंबर १७ (जी ४०), रेल भवन, रायसना रोड, सेंट्रल सेक्रेटरिएट मेट्रो स्टेशन, न्यू दिल्ली- ११०००१.
वेबसाइट- http://www.irt-india.com
ईमेल- irtindia3@gmail.com
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com