दहावी-बारावीनंतर पुढील अभ्यासक्रमांची निवड करताना विद्यार्थ्यांची अंगभूत क्षमता, कल आणि आवड लक्षात घ्यायला हवी. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरते.
दहावीची परीक्षा ही बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी पहिली स्पर्धात्मक परीक्षा असते. अनेक अर्थानी दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या असतात. याचे मुख्य कारण म्हणजे या दोन वर्षांत मुलाच्या भावी करिअरची दिशा साधारणपणे ठरत असते. त्यामुळे पालकमंडळीही आपल्या पाल्याच्या दहावी-बारावीच्या अभ्यासाविषयी दक्ष असतात. मुलांच्या अभ्यासाविषयी वर्षभर चिंता वाहणाऱ्या पालकांना परीक्षा पार पडल्यानंतर मुलाला किती गुण मिळतील याविषयी धास्ती वाटत असते,पण मुलाच्या मार्काविषयी आणि त्यानंतरच्या प्रवेशप्रक्रियेविषयी पालकांना वाटणाऱ्या सतर्कतेची जागा चिंता, तणाव, आक्रस्ताळेपणा यांनी घेतली तर वातावरण बिघडण्याची शक्यता अधिक असते. मुलाच्या भवितव्याविषयी पालकांना काळजी वाटणे स्वाभाविक असले तरी मुलाच्या करिअर निवडीसाठी मार्कापेक्षा विद्यार्थ्यांची क्षमता, कल आणि निवड लक्षात घ्यायला हवी.
खरे तर भोवतालच्या स्पर्धात्मक वातावरणाची जाणीव विद्यार्थ्यांनाही असते. त्यामुळे अभ्यास, परीक्षा, करिअर याविषयी त्यांनीही काही आराखडे बांधलेले असतात. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ‘पुढे काय करायचं?’ याचा बराच विचार केलेला असतो. मात्र, त्यांनी ही निवड कुठल्या आधारांवर केली आहे, ते संदर्भ योग्य आहेत का, हे जाणून घेण्यासाठी आणि मुलांना आवश्यक तिथे मदत करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पालकांचा आणि मुलांचा सुसंवाद असणे आवश्यक असते. अभ्यासक्रमाची निवड करताना पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षा लादण्यापेक्षा आपल्या मुलाची बौद्धिक-मानसिक-भावनिक क्षमता, आवड, कल लक्षात घ्यायला हवा.
अपेक्षांचे ओझे
दहावी आणि बारावीच्या वर्षांत वेगवेगळे शिकवणीवर्ग, सल्ले, मार्गदर्शन या सगळ्यात विद्यार्थ्यांची दमछाक होत असते. हे सर्व सुरू असतं ते अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी आणि चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी! मात्र, प्रत्येक विद्यार्थ्यांला सर्वोत्तम गुण मिळणं शक्य नसतं आणि साहजिकच त्यामुळे आधी ठरवल्यानुसार आवडत्या विद्याशाखेत अथवा हव्या त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळेलच याची शाश्वती नसते. याचे मुख्य कारण विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध जागा यांचं
व्यस्त प्रमाण.
अपेक्षांचे ओझे वर्षभर वागवणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे भांबावून जायला होतं तर मुलाच्या दहावीच्या-बारावीच्या वर्षांमध्ये आपण घेतलेली मेहनत, आपला वेळ, आपला पसा वाया गेल्याची भावना पालकांमध्ये येते. अशी परिस्थिती या परीक्षांच्या निकालानंतर अनेक घरांमध्ये उद्भवते आणि त्यातून वेगवेगळ्या समस्याही निर्माण होतात..
पुढे काय?
मुळात ‘पुढे काय?’ हा प्रश्न अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्याशाखांपुरताच मर्यादित असल्यानं अशा विद्याशाखांमध्ये चांगल्या महाविद्यालयांमध्ये, हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही तर काय करायचं, असा प्रश्न करिअर समुपदेशकांना विचारला जातो. या प्रश्नाला नराश्याची छटा असते. सर्वप्रथम एक वास्तव आपण मान्य करायला हवं की, करिअर घडविण्यासाठी अभियांत्रिकी अथवा वैद्यकीय विद्याशाखाच उपयुक्त ठरते असे नाही. इतर अनेक विद्याशाखासुद्धा उत्तम करिअर घडवण्यासाठी उपयुक्त असतात.
अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय वा अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घ्यायला हवा, असा पालकांचा अट्टहास योग्य नाही. अशी इतर अनेक क्षेत्रे आहेत जिथे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मोठा वाव मिळू शकतो तसेच अशा हुशार विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रात प्रवेश केला तर त्या क्षेत्राचा दर्जा आणि त्यातील गुणवत्ता वाढीस लागू शकते. एखाद्या हुशार विद्यार्थ्यांला इंग्रजी विषयात चांगली गती असेल तर त्याने बारावीनंतर इंग्रजी विषयात पदवी- पदव्युत्तर पदवी- पीएच.डी असे मार्गक्रमण केले तर त्याची प्रगती योग्य दिशेने आणि योग्य वेगाने होते.
पालकांनी ठरवलेल्या ज्ञानशाखेत प्रवेश मिळाला नाही तर मग पर्यायी विद्याशाखेत प्रवेश घेण्याऐवजी प्रारंभीच विद्यार्थी आणि पालकांनी मिळून वेगवेगळ्या पर्यायांचाही विचार करायला हवा.
प्रत्येक ज्ञानशाखा करिअरच्या संधी देत असतं, ही बाब लक्षात घ्यायला हवी. मात्र अनिच्छेनं अथवा पर्याय नाही, म्हणून प्रवेश घेऊ नये. जर अशा हतबलतेतून एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला गेला तर मग विद्यार्थी त्या अभ्यासक्रमाला कधीच गांभीर्याने घेत नाही. वेळकाढूपणा करणे, अभ्यास करताना प्रेरणा नसणे, पुढील ध्येय नसणे अशा प्रकारे विद्यार्थ्यांची अवनतीच सुरू होते. यामुळे ना धड व्यक्तिमत्त्वाचा विकास होत, ना अभ्यासक्रमातील विषयांचा सखोल अभ्यास. केवळ पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा उपचार पार पाडला जातो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही मोजक्या घटकांचा आणि मोजक्या प्रश्नांचा अभ्यास केला की बस्स, असा एक सरधोपट मार्ग विद्यार्थी स्वीकारतात. मात्र यातून कुठलेही करिअर आकार घेणे फार कठीण असते. पुढील काळात आपापल्या विद्याशाखेतील विषयांचे अल्पज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची भंबेरी उडायला सुरुवात होते. विविध प्रकारच्या स्पर्धापरीक्षांकडे वळण्याची क्षमता त्यांच्यात नसते.
राज्य लोकसेवा आयोगातर्फे तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अधिकारी पदासाठी वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा पदवी स्तरावरील अभ्यासक्रमावर आधारित असतात. त्याकरता पदवी अभ्यासक्रमाचे नीट आकलन होणे आवश्यक असते.
विविध क्षेत्रे
सर्वप्रथम दहावी-बारावीनंतर केवळ अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होतात आणि इतरांना होत नाही, हा भ्रम काढून टाकायला हवा. सध्या विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या अंगभूत क्षमता लक्षात घेऊन त्याचा जाणीवपूर्वक विकास केला, त्यात तज्ज्ञता मिळवली तर तो गुण विद्यार्थ्यांला चांगलं करिअर घडवण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. एखाद्या विद्यार्थ्यांचं भाषेवर प्रभुत्व असेल, आत्मविश्वासाने त्याला बोलता येत असेल, तर तो विद्यार्थी निवेदक, रेडियो जॉकी, डिस्क जॉकी, सादरकर्ता अशा अनेक क्षेत्रांत करिअर करू शकतो. अशा करिअरच्या संधी मोठय़ा शहरांसह निमशहरी भागांमध्येही निर्माण होत आहेत.
कौशल्यप्राप्त व्यक्तींची चणचण विविध क्षेत्रांत भासत आहे. उत्तम इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर मिळत नाहीत असं आढळून आलं आहे. त्यामुळे कौशल्यनिर्मितीवर अधिकाधिक भर देण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये असे गुण शालेय जीवनातच दिसू लागतात. त्यांना जर परीक्षेमध्ये अधिक गुण मिळत नसतील, मात्र अशा कलांमध्ये त्यांना गती असेल तर हे गुण पालकांनी ओळखून, मुलाला त्या क्षेत्रातील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उत्तेजन द्यायला हवं. अन्यथा, संबंधित विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
करिअरनिवडीबाबत लोकानुनय करण्यापेक्षा किंवा उगीचच महागडय़ा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांची क्षमता, कल आणि आवड लक्षात घेऊन पदवी अभ्यासक्रम निवडण्याचा सुज्ञपणा दाखवायला हवा. ५५ दिवसांच्या या लेखमालेतून अशा वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधील करिअर पर्यायांची ओळख करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यातून तुमच्या यशाचा मार्ग सुकर व्हावा, हीच अपेक्षा!
नया है यह!
मास्टर्स प्रोग्रॅम इन मेडिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी
हा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीने सुरू केला आहे. कालावधी- ३ वष्रे. अर्हता- एमबीबीएस. पत्ता- आयआयटी,
खरगपूर- ७२१३०२. वेबसाइट- gate.iitkgp.ac.in/mmst
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com