रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती-
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या व्यवसाय शिक्षण विभागामार्फत रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरू शकतील, असे विविध अभ्यासक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात सुरू करण्यातआले आहेत.
विद्यार्थ्यांना व्यवसाय कौशल्य प्राप्त करून देणारे असे हे अभ्यासक्रम असून राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कारखान्यांमध्ये काम करण्यास आवश्यक ठरणारे असे कौशल्य उमेदवारांना प्राप्त होते. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि आठवीनंतर शिक्षण घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतात.
विविध अभ्यासक्रम
शिवणकाम, विद्युत, कृषी, रसायने, संगणक, भाषा, सौंदर्यसाधना, मुद्रण, चामडी वस्तू, वाणिज्य, वस्त्रप्रावरणे, कॅटरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पॅरामेडिकल आदी विषयांमध्ये अभ्यासक्रम सुरू केले आहेत.  यामध्ये ६ महिने कालावधीचे ४२८ अभ्यासक्रम, १ वर्ष कालावधीचे १२० अभ्यासक्रम, २ वर्षे कालावधीचे १९६ असे साधारणत: ७७० पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यातील काही अभ्यासक्रम अंशकालीन तर काही अभ्यासक्रम पूर्णकालीन आहेत.
माध्यमिक पूर्वस्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम हे मूलभूत तंत्रज्ञान, यांत्रिकी तंत्रज्ञान आणि विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान या तीन गटांत विभाजित करण्यात आले आहेत. विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान या गटांत कार्यशाळा तंत्रज्ञान, मूलभूत विद्युत ज्ञान, संगणक माहिती व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी चित्रांकन, वेल्डिंग आणि प्लंबिंग, फिटिंग आणि ग्रामीण तंत्रज्ञान, विजेवर चालणारी यंत्रे आणि घरगुती उपकरणे यांसारख्या विषयांचा समावेश आहे.
मूलभूत तंत्रज्ञान या गटात अभियांत्रिकी चित्रकला, ऊर्जा व पर्यावरण, कृषी व्यवसाय, गृह आणि वैद्यकशास्त्र, कृषी, ऊर्जा व पर्यावरण, गृह आणि आरोग्य, अभियांत्रिकी कार्यशाळा या विषयांचा समावेश होतो.
यांत्रिकी तंत्रज्ञान या गटात ऑटो अभियांत्रिकी, सुतारकाम, कार्यशाळा तंत्रज्ञान, मूलभूत विद्युत तंत्रज्ञान, संगणक माहिती व तंत्रज्ञान वेल्डिंग, प्लंबिंग आदी विषयांचा समावेश होतो. शासकीय आणि अशासकीय अशा ७७० पेक्षा अधिक संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या संस्थांमध्ये ७८ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच तांत्रिक शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांना मनात उद्योजकतेची बीजे रोवण्यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण मंडळाच्या काही प्रमाणपत्र परीक्षांना थेटपणे बसण्याची सवलत दिली जाते. तंत्रनिकेतन प्रवेशास १५ टक्के जागा राखीव असतात. अकरावी व्यावसायिक प्रवेशासाठी ४० टक्के जागा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी २५ टक्के राखीव असतात. या अभ्यासक्रमांमुळे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी चित्रकला, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील सर्किट रेखांकने या विषयांची मूलभूत तत्त्वे संपादन करता येणे शक्य होते.
१०+२ स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम
हे अभ्यासक्रम मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान, गोडय़ा पाण्यातील मत्स्य व्यवसाय, पीकशास्त्र, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, कार्यालय व्यवस्थापन, लघु उद्योग आणि विक्री, विक्री आणि विपणन, बँकिंग, संगणक शास्त्र, रसायने प्लान्ट ऑपरेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सामान्य सिव्हिल अभियांत्रिकी, स्कूटर आणि मोटार सायकल दुरुस्ती, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स या विषयांमध्ये करता येतात. हे अभ्यासक्रम १५७५ संस्थांमध्ये सुरू करण्यात आले असून सुमारे १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम केल्यानंतर रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी साहाय्य व्हावे किंवा त्यांना पुढील शिक्षण घेता यावे असे दोन हेतू हे अभ्यासक्रम सुरू करण्यामागे आहेत. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी कायद्यांतर्गत व्होकेशनल टेक्निशियन म्हणून एक वर्षांची शिकाऊ उमेदवारी करण्याची संधी मिळते. या काळात १४४० रुपये दरमहा विद्यावेतनही मिळते. या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या ठरावीक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना थेट बसण्याची सवलत दिली जाते.
१०+२ स्तरावरील उच्च व्यवसाय अभ्यासक्रम
हे अभ्यासक्रम तांत्रिक गट, गृहविज्ञान गट, वाणिज्य गट, मत्स्य गट, कृषी गट आणि आरोग्य व वैद्यकीय सेवा गटात विभाजित करण्यात करण्यात आले आहेत. एकूण शासकीय आणि अशासकीय १,४४४ संस्थांमध्ये ८८ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार सुरू करता येणे शक्य व्हावे, म्हणून शासनामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल साहाय्य योजनेंतर्गत अर्थसाहाय्य केले जाते. ही योजना उद्योग आणि ऊर्जा विभागाच्या वतीने चालविली जाते. या विद्यार्थ्यांना व्होकेशनल टेक्निशिअन म्हणून शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत एक वर्षांसाठी शिकाऊ उमेदवारी करण्याची संधी मिळू शकते. या काळात दरमहा १४४० रु. विद्यावेतन दिले जाते.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स व हॉर्टिकल्चर हा अभ्यासक्रम पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. पदविकेच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेशासाठी दोन टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या अभ्यासक्रमांमध्ये मुबलक प्रात्यक्षिकांचा सराव उपलब्ध करून दिला जात असल्याने विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य सारखे उन्नत होत राहते. प्रशिक्षण काळात प्रत्यक्ष कारखान्यात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. या योजनेतील काही अभ्यासक्रमांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमांच्या समकक्ष दर्जा देण्यात आला आहे.
(१) तांत्रिकी गटातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी गटातील अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटरकॉम उभारणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखभाल-दुरुस्ती, वैद्यकीय आणि उद्योजकीय इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निगा आणि दुरुस्ती, दृक्श्राव्य उपकरणांची सार्वजनिक ठिकाणी उभारणी, रोजगार आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती, विक्री, बॅटरी चार्जर, एलिमनेटर, इमर्जन्सी लाइट, इलेक्ट्रॉनिक खेळणी उत्पादने अशासारख्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ  शकतात. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यानंतर घरगुती विद्युत उपकरणांची दुरुस्ती, तपासणी, उभारणी रिवायंडर, विक्री प्रतिनिधी, रासायनिक औषध कापड गिरणी उद्योगांमध्ये यंत्रे आणि मोटारींची दुरुस्ती, देखभाल आणि रिवायंडिंग हे रोजगार आणि उपकरणे विक्री एजन्सी, दुरुस्ती केंद्र, छोटी उपकरणे निर्मिती वायंडिंग कार्यशाळा, वॉटरपंप दुरुस्ती केंद्र हे स्वयंरोजगार करता येऊ  शकतात. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यावर यंत्रांची देखभाल दुरुस्ती, कुशल कारागीर- टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट हे रोजगार आणि फॅब्रिकेशन वर्कशॉप, कंपनीच्या छोटय़ा भागांची निर्मिती हे स्वयंरोजगार उपलब्ध होऊ  शकतात. ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यावर सर्वसाधारण स्वयंचलित डिझेल, पेट्रोल वाहनांची दुरुस्ती, तपासणी, ड्रायव्हिंग हे रोजगार आणि स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांची दुरुस्ती केंद्रे हे स्वयंरोजगार उपलब्ध होऊ  शकतात. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी  हा अभ्यासक्रम केल्यावर शासकीय, खासगी आणि अशासकीय संस्थांमध्ये मल्टिमीडिया इंटरनेट टेक्निशिअन, विक्री प्रतिनिधी, कॉम्प्युटर, डीटीपी, अ‍ॅनिमेशन, कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामर, इंटरनेट सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर इंडस्ट्रीज, इंटरनेट कॅफे यांसारखे स्वयंरोजगार आणि जाहिरात निर्मिती केंद्रे, डीटीपी केंद्र, डिझायनिंग, इंटरनेट सेवा, जॉब वर्क्‍स, प्रोजेक्ट वर्क आदी स्वयंरोजगार करता येऊ  शकतात. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यावर इमारत कंत्राटदाराकडे गवंडी, प्लंबर, रंगारी, परिसर अधीक्षक आदी रोजगार उपलब्ध होतात. गृहनिर्माण संस्थांची देखभाल दुरुस्तीचे कंत्राट, कामगार/ मजूर कंत्राटे, इमारत बांधणी साहित्य पुरवठा आदी स्वयंरोजगार करता येतात.(पूर्वार्ध)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Courses for employment and self employment business
Show comments