गोव्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री
मनोहर पर्रिकर हे राजकारणाच्या पठडीबाहेरचे, आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व. आयआयटीमधून अभियंता झालेले,
प्रामाणिकपणा व चारित्र्याबाबत तडजोड नाही
प्रत्येक माणूस आकलन झालेल्या तत्त्वज्ञानानुसार आपल्या जीवनात काही तत्त्वे पाळतो. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, पण प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि मूलभूत तत्त्वांबाबत कोणतीही तडजोड मी करणार नाही. मी कोणतेही काम करून घेण्यासाठी कोणालाही लाच देणार नाही, असे व्यवसायात आल्यावर मी ठरविले होते. त्यानुसार आजपर्यंत आचरण केले आहे. त्यामुळे सुरुवातीला सहा महिने मला उद्योगासाठी वीज कनेक्शनही मिळाले नव्हते. पण मी पैसे दिले नाहीत. तरी मी आज उद्योगधंद्यात आहे. अगदी जीवनमरणाचा प्रश्न आला, तर व्यवसायात टिकून राहण्यासाठी तडजोड करीन. पण तशी वेळ येणार नाही. एकदाच अशी जीवनमरणाची वेळ आली होती तेव्हा केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी योग्य ती पावले टाकण्याची (लाच देण्याची) जबाबदारी मी माझ्या सल्लागारांवर टाकली होती. नाहीतर कंपनीच सुरू झाली नसती. त्या घटनेला अनेक वर्षे झाली. मुख्यमंत्री झाल्यावर तशी वेळ आली नाही. माझा व्यवसाय तांत्रिक क्षेत्रातील आहे. ऑर्डर मिळविण्यासाठी मी कधीही पैसे दिले नाहीत. राजकारण व व्यवसाय यात मी अंतर ठेवले आहे. नितीन गडकरी यांच्याबाबत ‘पूर्ती’वरून जे घडले, त्यात राजकारण आहे. मी काही चुका केल्या आणि ३०-४० वेळा दंडही भरले. अगदी मुख्यमंत्री असतानाही पाच-सहा वेळा मी दंड भरले. माझ्या मुलाने नो-पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती. पण मी मुख्यमंत्री आहे, असे न सांगता दंड भरला. पोलीस अधिकारी सूर्यवंशीला येथे मारले, तसे मारायलाही गेलो नाही.
माझ्या पदाचा वापर करून कोणतेही वैयक्तिक लाभ, सवलती घ्याव्यात असे मला कधीही वाटत नाही. मुख्यमंत्री म्हणून मला विमानप्रवासात श्रेणीवाढ करून घेण्याचा नियमानुसार अधिकार आहे. मी विमानप्रवास भरपूर करीत असल्याने विमान कंपनीकडूनही श्रेणीवाढ मिळू शकते. पण मी इकॉनॉमी श्रेणीतून विमानप्रवास करतो. मी सरकारी तिजोरीतून नाही, तर स्वत:च्या खिशातून वर्षांला ३ लाख रुपये विमान प्रवासावर खर्च केले आहेत. तुमचे वर्तन कसे आहे, ते प्रत्येकाने पाहिले पाहिजे. माझे अनुकरण कोणी राजकारणी करतील, असे वाटत नाही. पण संपूर्ण नाही, तरी ७०-८० टक्के तरी अनुकरण करतील. सरकारी तिजोरीतील पैसे वाया घालवू नये, असे नैतिक दडपण अन्य नेत्यांवर कदाचित येईल. निदान त्यांना तसे सांगण्याचा नैतिक अधिकार मला येईल, असे वाटते. नैतिक अधिकार हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. जनशक्ती तुमच्यामागे असल्याशिवाय किंवा जनतेचा पाठिंबा असल्याखेरीज तुम्हाला कोणीही राजकारणात विचारणार नाही. नैतिक अधिकारातून जनशक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. लोकांचा पाठिंबा नसेल, तर त्यांचा दिगंबर कामत होतो. त्यांना जनाधार नव्हता, केवळ काही आमदारांचा पाठिंबा होता. महाराष्ट्रातील काही नेत्यांची अवस्था तशीच आहे. त्यामुळे एखादा नियंत्रणाबाहेर जातो. काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठा फरक आहे. भाजपमध्ये कोणी चुकीची गोष्ट केली, तर त्याला प्रमाणपत्र मिळणार नाही. त्याला हळूच बाजूला काढले जाते. केवळ राजकारणी, नोकरशहा यांनाच दोष देऊन चालणार नाही. जनतेमधील नैतिकता राजकारण्यांमध्ये प्रतिबिंबित होत असते. प्रसिद्धीमाध्यमे तरी संपूर्ण स्वच्छ आहेत का? मी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना केवळ एकदाच वैयक्तिक खर्चाने जेवण दिले आहे. मला प्रसिद्धीमाध्यमांसाठी काही करायचे असेल, तर वैयक्तिक लाभासाठी किंवा माझ्या बाजूने लिहिण्यासाठी काहीही करणार नाही. शासनाकडून प्रसिद्धीमाध्यमांसाठी काही योजना केल्या. माझ्या स्वेच्छाधिकारातून व वैयक्तिक लाभासाठी काही केले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा