वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते. गर्दीच्या प्रचंड लोंढय़ानंतर होणारी नदीची ही दुरवस्था टाळण्यासाठी आता स्थानिक कार्यकर्तेच सरसावले असून यंदा इंद्रायणीच्या पात्रात वारीदरम्यान ‘जलदेवता सेवा अभियान’ राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गेली चार वर्षे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या पात्रात राबवला जाणारा हा उपक्रम आळंदीत प्रथमच राबवला जात आहे.
या अभियानात वारकऱ्यांना भावनिक आवाहन करत नदी स्वच्छ ठेवण्याचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. नदीला देवता आणि आई मानले म्हणजे नदीत कचरा टाकला जाणार नाही, असा या अभियानाचा हेतू आहे. ‘अखिल विश्व गायत्री परिवार’ या संस्थेचे कार्यकर्ते शैलेंद्र पटेल यांनी ही माहिती दिली. पटेल म्हणाले, ”गेली चार वर्षे आम्ही वारकऱ्यांना आणि दिंडी प्रमुखांना भेटून जलदेवता सेवा अभियानासंबंधीची पत्रके वाटतो आहोत आणि नदीत कचरा व प्लॅस्टिक न टाकण्याची विनंती करतो आहे. वारीत कीर्तन- प्रवचन करणाऱ्यांनाही भेटतो आहे. याबरोबरीनेच जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र देऊन नदीपात्राच्या जवळपास लोखंडी कचराकुंडय़ा किंवा कचऱ्याचे प्लॅस्टिकचे डबे ठेवण्यासाठी पत्रही दिले आहे. कचराकुंडय़ा उपलब्ध झाल्यास नदीत कचरा टाकणे रोखता येईल.”
संस्थेने वारक ऱ्यांना देण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर नदीला देवता मानले जावे यासाठी नदीची पूजा करून तिची ओटी भरावी आणि ती ओटी दुसऱ्या सुवासिनीला जलदेवतेचा प्रसाद म्हणून द्यावी, असे सुचवले आहे. नदीत कचरा आणि प्लॅस्टिकबरोबरच मोठय़ा प्रमाणावर कपडेही वाहत जातात. हे टाळण्यासाठी ‘नदीपात्रात कपडे धुताना मी कपडे वाहून जाऊ देणार नाही’, ‘नदीला प्रदूषणापासून मुक्त करून मी तिची सेवा करेन,’ अशा सोप्या प्रतिज्ञाही या पत्रकावर लिहिल्या आहेत.
केवळ आवाहन करूनच न थांबता संस्थेचे १५० ते २०० कार्यकर्ते वारीनंतर नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी प्रत्यक्ष कामही करणार आहेत. वारीच्या काळात १८ जूनला देहू येथे, १९ तारखेला आळंदीत तर ९ जुलैला पंढरपूरमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
आळंदीत ५० सीसीटीव्ही कॅमेरे
पालखी सोहळ्यादरम्यान आळंदीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणेही उठवण्यात आली असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये या उद्देशाने नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वच्छता, पाणी पुरवठा, अतिक्रमण निर्मूलन पथक, वसुली विभाग व संरक्षण अशी विविध पथके स्थापन केली आहेत. वारीच्या काळात होणारा कचरा उचलण्यासाठी ५० स्वयंचलित यंत्रे वापरण्यात येणार आहेत. तसेच २५० फिरती शौचालयेही वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असेही औंधकर यांनी सांगितले.
इंद्रायणीचे पात्र निर्मळ राखण्यासाठी कार्यकर्ते सरसावले
वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते.
First published on: 19-06-2014 at 05:17 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaladeovata seva abhiyan to clear indrayani river