दूरसंवेदन (Remote Sensing)-
कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता, त्यासंबंधी माहिती मिळविणे म्हणजे दूरसंवेदन. आपण जेव्हा एखाद्या कॅमेऱ्याने फोटो घेतो तेव्हा तोदेखील दूरसंवेदनाचाच एक प्रकार आहे. अशा प्रकारे पृथ्वीवरील माहिती संकलित करण्यासाठी दूरसंवेदनाच्या माध्यमातून ज्या उपग्रहांची मदत घेतली जाते त्यांना दूरसंवेदी उपग्रह (Remote Sensing Satellites) असे म्हणतात. दूरसंवेदनतंत्रामुळे भौगोलिक, भूगर्भविषयक, सागरविषयक, हवामान व पर्यावरणविषयक माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे.
दूरसंवेदन तंत्राची वैशिष्टय़े/ उपयोग-
१) पृथ्वीवरील वस्तूंनी परावर्तित केलेल्या, पसरविलेल्या किंवा पुनर्परावर्तित केलेल्या सूर्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांच्या मोजमापावरून असे आकलन केले जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पट्टय़ातील दृश्य प्रकाश, इन्फ्रारेड किरण आणि मायक्रोवेव्ह किरणांचा त्यासाठी वापर केला जातो.
२) दूरसंवेदनासाठी विमान व कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो.
३) १९९०नंतर मानवरहित दूरसंवेदनाची सुरुवात झाली.
४) दूरसंवेदनामार्फत मिळवलेल्या माहितीचा वापर लगेच केला जात नाही. ती माहिती सर्वप्रथम बेस स्टेशनकडे पाठविली जाते, तेथे त्याचे विश्लेषण होते व नंतर माहिती वापरली जाते.
५) हवाई छायाचित्रणापेक्षा उपग्रहाद्वारे केले जाणारे भूसर्वेक्षण आíथकदृष्टय़ा स्वस्त असल्यामुळे त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे.
६) दूरसंवेदनामार्फत मिळणारी माहिती मानवी हस्तक्षेपाशिवाय असल्याने, पूर्वग्रहरहित व पूर्ण विश्वासार्ह असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे.
७) टोपोशिट तयार करण्यासाठी (नकाशा) दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा वापर होतो.
८) भूपृष्ठावरील व भूपृष्ठांतर्गत खनिजे, पाण्याचा साठा, धरणातील पाणीसाठा, धरणाची उंची, खोली व पाणी साठवण क्षमता दूरसंवेदनाचा वापर करून सांगता येते.
९) वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण, जीवपुरातत्त्व विषयांसाठी याचा वापर केला जातो.
१०) दूरसंवेदनामुळे व्यापक व दुर्गम भागाची व्यवस्थित माहिती मिळविता येते. वलीकरण व प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या भूवैशिष्टय़ांचा अभ्यास करता येतो. शिवाय भूकंप, ज्वालामुखी, वणवा, महापूर, वादळे इ. नसíगक आपत्तींचा अभ्यास करता येतो.
उपग्रह पृथ्वीपासून ज्या उंचीवर स्थिर केले जातात, त्यांना कक्षा असे म्हणतात. कक्षा दोन प्रकारच्या असतात. १) सूर्यस्थिर कक्षा २) भूस्थिर कक्षा
१) सूर्यस्थिर कक्षा / उपग्रह – (Sun- Synchronous Orbit)
* या कक्षेत मुख्यत (IRS) उपग्रह सोडले जातात.
* ही कक्षा जवळजवळ वर्तुळाकार अशी ध्रुवीय कक्षा असते.
* या कक्षेतील उपग्रह उत्तर ते दक्षिण असे भ्रमण करतात.
* हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० ते १२०० कि.मी. एवढय़ा निश्चित उंचीवर सोडले जातात.
* या उपग्रहाची व्याप्ती क्षेत्र ८१अंश N ते ८१ अंश S इतके असते.
भारतीय दूरसंवेदन उपग्रह (Remote Sensing Satellite) जवळजवळ वर्तुळाकार अशा ध्रुवीय सूर्य स्थिर कक्षेत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० ते १२०० किमी अंतरावर सोडले जातात. ते उत्तर ते दक्षिण या दिशेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतात.
२) भूस्थिर कक्षा / उपग्रह (Geo – Synchronous Orbit)
* ही कक्षा वर्तुळाकार अशी विषुववृत्तीय कक्षा असते.
* या कक्षेतील उपग्रह पश्चिम ते पूर्व असे भ्रमण करतात.
* हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३५,७८६ किमी अंतरावर सोडले जातात.
* या उपग्रहास पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास २४ तास लागतात.
हवाई छायाचित्रण (Aerial Photography)
जेव्हा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचे सर्वेक्षण कॅमेऱ्याच्या साहाय्याने फोटो घेऊन केले जाते, तेव्हा त्यास छायामिती (Photogrammetry) असे म्हणतात, याचे दोन प्रकार पडतात.
१)भूछायाचित्रण- जेव्हा कॅमेऱ्याच्या साहाय्याने पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणाहून छायाचित्र घेतले जाते तेव्हा त्यास भूछायाचित्रण असे म्हणतात.
२)जेव्हा विमानातून कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे घेतली जातात तेव्हा त्यास हवाई छायाचित्रण असे म्हणतात.
हवाई छायाचित्रणासाठी वापरले जाणारे कॅमेरे व फिल्म्स- हवाई छायाचित्रणासाठी विमानात विशिष्ट प्रकारचे कॅमेरे बसविलेले असतात. विमानाचा वेग जास्त असल्यामुळे कॅमेरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या कॅमेऱ्यात अतिजलदतेने उघडझाप करणारी झडप असते, वेगाने छायाचित्र घेणारी भिंगे असतात. जलदपणे परिणाम होणारी अतिसंवेदक फिल्म असते. तसेच कॅमेऱ्यात जास्तीतजास्त छायाचित्रे सामावून घेणारे कप्पे असतात.
छायाचित्रांची स्पष्टता कॅमेऱ्यांवर अवलंबून असते. ज्या वेळी कॅमेऱ्यातील नाभी अंतर कमी असते अशा प्रकारच्या कॅमेऱ्याला वाइड अँगल कॅमेरा असे म्हणतात. या कॅमेऱ्याकडून छायाचित्रणासाठी अधिक प्रमाणात क्षेत्र व्याप्त केले जाते, त्यामुळे त्या क्षेत्रातील भूवैशिष्टय़े स्पष्टपणे छायांकित होत नाहीत. ज्या वेळी कॅमेऱ्यातील नाभी अंतर जास्त असते, अशा कॅमेऱ्याला नॅरो अँगल कॅमेरा असे म्हणतात. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याकडून छायाचित्रणासाठी कमी प्रमाणात क्षेत्र व्यापले जाते. यामध्ये प्राप्त झालेल्या छायाचित्रांची स्पष्टता अधिक असून लहान भूवैशिष्टय़ेसुद्धा स्पष्टपणे छायांकित होतात.
कॅमेऱ्याचे प्रकार
१) फ्रेिमग कॅमेरा- हवाई छायाचित्रणासाठी सामान्यपणे याच प्रकारचा कॅमेरा वापरला जातो. फ्रेमद्वारे छायाचित्र घेतले जात असल्याने यास फ्रेिमग कॅमेरा म्हणतात.
२) पॅनोरॅमिक कॅमेरा- या कॅमेऱ्यातील भिंग स्थिर नसते. त्यामुळे हवाईचित्रणासाठी या प्रकारच्या कॅमेऱ्याचा फारसा उपयोग करत नाहीत.
३) स्ट्रिप कॅमेरा- या प्रकारच्या कॅमेऱ्यात भिंग स्थिर स्वरूपाचे असते, परंतु फिल्म मात्र सतत फिरती असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा