पारंपरिक पाणी व्यवस्थापन पद्धतीचा आधार घेत राजेंद्र सिंह यांनी राजस्थानातील वाळवंटात हिरवी शेती फुलवली.. ‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’मध्ये संवाद साधताना पाणी प्रश्नासारख्या जागतिक समस्यांचे उत्तर स्थानिक पातळीवरच पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून काढता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन भूसंपादन कायद्यामुळे लोकांची जमिनीवरील मालकी जाऊन मूठभरांच्या हाती ती जाईल, अशी भीती व्यक्त करत त्यांना ठाम विरोध केला. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते सारख्याच पद्धतीने चालते.. महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली विध्वंस सुरू आहे, असेही मत त्यांनी नोंदवले.
सध्याची स्थिती खूप भयाण आहे. कारण सरकार उलटी कामे करत आहे. पाणी, जंगलांवर लोकांचा हक्क होता तो हक्क हिरावून घेऊन मूठभरांच्या हाती देण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे. त्यासाठीच नवा भूसंपादन कायदा केला जात आहे. या कायद्यामध्ये बदल करण्याची भाषा सरकार करत असले तरी तो केवळ शाब्दिक बदल आहे. त्यामागील हेतू मात्र तोच आहे. २०१३च्या कायद्यामध्ये थोडे का होईना पण जमीनमालकांना अधिकार होते. पण नव्या कायद्याद्वारे राष्ट्रहिताच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्या मूठभरांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला जात आहे. राष्ट्रहिताचे निर्णय उद्योगपती, कंत्राटदार घेणार का? नव्या कायद्यामुळे हे सरकार लोकांचे नाही तर कंत्राटदार-कॉर्पोरेट क्षेत्राचे सरकार आहे हे लोकांना कळले आहे. नऊ महिन्यांत लोकांनी सरकारविरुद्ध काहीच आवाज उठवलेला नाही, परंतु या नव्या भूसंपादन कायद्यामुळे सरकारचे मोठे नुकसान होणार आहे. सरकाराला जे विरोध करत आहेत त्यांना ते शत्रू ठरवत आहेत. प्रसिद्धीमाध्यमांनी तरी आता याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. अजूनही या सरकारकडे चूक सुधारण्याची वेळ असून त्यांनी हे नवे विधेयक मंजूर करू नये आणि २०१३चा कायदा तसाच ठेवावा. कायद्यात छोटे बदल करायचे असतील तर त्यांनी जरूर करावेत. पण बदलाच्या नावाखाली त्यांनी लोकांची फसवणूक केली तर लोक सरकारच्या विरोधात उभे ठाकतील. लोकांचा पाणी, जंगलावर अधिकार आहे, मात्र गेल्या नऊ महिन्यांमध्ये या सरकारने झपाटय़ाने जंगल, वनजमिनी ठेकेदार-उद्योगपतींच्या पदरात टाकल्या आहेत. वनजमिनी, जंगलांशी संबंधित जेवढी प्रकरणे प्रलंबित आहे ती लवकरात लवकर निकाली काढा, त्यांना मंजुरी द्या, असे फर्मानच महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या पर्यावरणमंत्र्यांनी दिले आहे. जंगलात खाण उद्योग, विजेच्या वाहिन्या टाकण्यास सर्रास परवानगी दिली गेली आहे. सरकारला वाटते की केवळ तीन किंवा पाचच लोक सरकार चालवू शकतात. त्यातील पहिली तीन नावे मोदी, अदानी आणि अंबानी, आणखी दोन नावांचा समावेश करायचा म्हटला तर ती नावे म्हणजे अमित शाह आणि अरुण जेटली अशी आहेत. तीन किंवा पाचच जणांचा गट देश चालवणार असेल तर देशाचे काम नीट चालणार नाही. ‘येस मॅन’ची संख्या या सरकारमध्ये अधिक वाढली आहे. त्यामुळे जावडेकर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही ‘येस मॅन’ होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. वनजमिनी, जंगले उद्योगांसाठी देण्याचे सगळ्यात अधिक निर्णय हे महाराष्ट्राच्या बाबतीच झालेले आहेत आणि या जमिनी पदरात पाडून घेणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर अदानी, दुसऱ्यावर अंबानीचे नाव घ्यावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा