‘लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज’मध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी संघाविषयीच्या मूलभूत माहितीसंबंधी एक निवेदन केले. त्याचा हा गोषवारा..
संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जीवनात देशाचे उत्थान हेच एकमेव लक्ष्य होते. देशाच्या भल्यासाठी होणाऱ्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे.

अनेक जबाबदाऱ्यांतून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की, आपल्या देशावर वारंवार कोणीतरी आक्रमण करतो आणि मग आपण जागे होतो, संकट निवारण होते आणि पुन्हा एकदा आक्रमण होते. या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे तर आपल्या देशातील दोष काढून टाकून समाज स्वस्थ आणि संघटित करण्याची आवश्यकता आहे. हे करण्यासाठी अनेक वर्षे प्रयोग केल्यानंतर १९२५ च्या विजयादशमीला एक अभिनव तंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने त्यांनी सुरू केले. पुढे सुमारे १५ वर्षे या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर तरुणांशी चर्चा करून डिसेंबर १९३९ मध्ये संघाची कार्यपद्धती त्यांनी नक्की केली. हे काम कुणाच्याही विरोधी काम नाही तर सगळ्या कामांना साह्य़भूत ठरेल, असे हे काम आहे. या कामातून डॉक्टर तीन मूलभूत निष्कर्षांवर आले. पहिला मुद्दा, देशाचे भाग्य नेते, सरकार, व्यवस्था आदींवर नव्हे तर सामान्य समाजाच्या संघटितपणावर व गुणवत्तेवर अवलंबून असते. दुसरी गोष्ट, संघटित होण्यासाठी, प्रगती करण्यासाठी ‘स्व’च्या आधारावर एकत्र यावे लागते. तिसरा मुद्दा म्हणजे, सामान्य समाजात गुणवत्ता आणण्यासाठी केवळ बुद्धीने काम भागत नाही तर ती भावना हृदयात उतरावी लागते, शरीराला त्याची सवय व्हावी लागते. या तीन मुद्दय़ांच्या आधारावर संघाचे काम आजवर सुरू आहे. गंमत म्हणजे संघाचे हे मूळ काम सोडून संघाविषयी बाकी बरेच काही समाजाला माहीत आहे. त्याचे कारण गेल्या ८७ वर्षांत अगणित स्वयंसेवक तयार झाले आहेत. काही स्वयंसेवक आपापल्या रुचीनुसार एखादे क्षेत्र निवडून त्यात सक्रिय होतात. आज संघाच्या विविध कामांबद्दल ऐकू येते ती कामे संघाच्या योजनेतून नव्हे तर स्वयंसेवकांच्या योजनेतून सुरू झालेली आहेत. आवश्यकतेनुसार आणि त्या कामाच्या महत्त्वानुसार संघ त्या कामांना मदत करतो. परंतु ती कामे स्वायत्त आहेत आणि निर्णय घेण्यास स्वयंसेवक स्वतंत्र आहेत. ते संघाची मदत मागू शकतात, सल्ला मागू शकतात. तशी मदत आणि सल्ला कोणीही संघाकडे मागू शकतो. परंतु ही कामे करणारे स्वयंसेवक असल्याने त्यांना मदत मागण्यात संकोच वाटत नाही. एवढाच या कामांशी संघाचा संबंध असतो. संघाचे मुख्य काम मात्र मनुष्यनिर्माण आणि चांगल्या व्यक्तींच्या सामाजिक अभिसरणातून वस्त्यांमध्ये चांगले वातावरण तयार करण्याचे आहे.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!

गिरीश कुबेर : आजच्या आधुनिक काळात संघाची कालसांदर्भिकता कितपत आहे?
मोहन भागवत : चांगल्या गोष्टींची आवश्यकता सतत असते. संघटित व गुणसंपन्न समाज ही प्रत्येकवेळी देश चांगला असण्याची पूर्वअट आहे आणि आजच्या काळात तर ते अधिकच सुसंगत आहे. अनेकांना हे जाणवते. संघाचे काम सार्वकालिक, नित्यआवश्यक असल्याने त्याच्या सांदर्भिकतेचा प्रश्न मनात येतच नाही. जेव्हा समाजाची घडी नीट होती तेव्हा घरातील संस्कारांतून आणि समाजातील वातावरणातून माणसे आपोआप घडत असत. आज अमेरिकेत त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही. त्याची त्यांना आवश्यकता नाही. कारण माणसे घडविणाऱ्या त्यांच्या संस्था शाबूत आहेत. त्यांना हवा तसा माणूस त्यातून घडतो आहे. आपल्याकडे मात्र मधल्या धामधुमीच्या काळात अशा संस्था उद्ध्वस्त झाल्या. जुन्या संचिताचे अर्थ विसरले गेले, त्यात विकृती आली. चांगले काय ते सांगणारे कोणी राहिले नाहीत. घरातल्या आणि शिक्षणातल्या संस्कारांमध्येही कमतरता जाणवू लागली. आज जर घर सोडले तर संस्कारांच्या नावाने सर्वत्र अभावच दिसतो. म्हणून संघासारख्या संघटनेची आवश्यकता आहे. आम्हाला ‘समाजात संघटन’ करायचे नाही तर ‘समाजाचे संघटन’ करायचे आहे. संघाच्या नावाने काही करायचे नाही तर समाजाच्या नावाने सारे काही व्हावे, असे आमचे म्हणणे आहे.
गिरीश कुबेर : देशात डाव्यांनी सत्ताकारण उघडपणे केले. संघाने मात्र तसे केले नाही. असे लपविण्याचे कारण काय आणि त्याचे काही तोटे झाले आहेत का?
भागवत : संघ लपवून काहीच ठेवत नाही. संघाला राजकारण करायचे नाही. कारण सध्याचे प्रचलित राजकारण संघ नव्हे समाज बदलू शकतो. संसदेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त झालेल्या भाषणात शरद यादव यांचे भाषण झाले. ‘राजकारण्यांमुळे भ्रष्टाचार होतो हे अगदी खरे आहे. आम्हालाही ते नको आहे. परंतु जनता असा विचार करते की प्रचारासाठी काँग्रेसच्या पाच जीप फिरताहेत म्हणजे काँग्रेसचा जोर आहे, त्यांना मते देऊ. मग आम्हाला निदान चार तरी द्याव्याच लागतात. यासाठी लागणारा पैसा आम्हाला गरीब लोक देत नाहीत, धनवान देतात. ते त्याची  वसुली करतात. या दुष्टचक्राला उपाय या संसदेत सापडणार नाही.’
जोपर्यंत समाजाची वृत्ती बदलत नाही तोपर्यंत यावर उपाय नाही. परंतु आज राजकारण समाजाचा तुटक स्वरूपातच विचार करते. मते हवी असतील तर समाज तुटला पाहिजे आणि त्या तुकडय़ांमध्ये संघर्ष पाहिजे. तरच निवडून येण्याची शक्यता असते. असे राजकारण आम्ही करायचे तर समाज संगटित कसा करणार! एखाद्या स्वयंसेवकाला राजकारणात जायचे असेल तर तो जाऊ शकतो. परंतु मग त्याला संघाची जबाबदारी घेता येत नाही. जबाबदारी असलेल्याला जायचे असेल तर आम्ही सांगतो जबाबदारी सोड, दोन वर्षे काही करू नकोस आणि मग पाहिजे तिकडे जा!
अर्थात, राजकारण हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ते चांगले व्हावे असे वाटणारे तिकडे जातात. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अशाच भावनेने एक पक्ष काढला. त्यांनी त्यासाठी कार्यकर्ते मागितले. तेव्हा संघाच्या कार्यकारिणीने विचार करून ते दिले. सगळ्याच चांगल्या कामांना संघ कार्यकर्ते देतो. आणखी कोणी मागितले तरी देऊ. मी प्रचारक असताना काँग्रेसलासुद्धा तात्कालिक मदत केलेली आहे. हे आम्ही लपवून ठेवत नाही. संघ राजकारणात नाही. संघाला सगळे पक्ष सारखे आहेत. सगळे पक्ष आपले आहेत आणि एकही पक्ष आमचा नाही. आमचे स्वयंसेवक भाजपप्रमाणेच अन्य पक्षांतही आहेत. ‘स्वयंसेवकांनी आपल्या विवेकानुसार हवे त्याचे काम करावे’ अशी सूट आहे. आम्ही जे राष्ट्रीय विषय मानतो तशीच विचारसरणी असणारा एखादा पक्ष सत्तेवर येऊ शकतो आणि तो आला नाही तर खूप नुकसान होईल, अशी स्थिती असेल तर आणि आमची ताकद असेल तर त्याला मदत करण्यास आम्ही स्वयंसेवकांना सांगतो. तीसुद्धा पक्षाला नाही तर विषयाला, मुद्दय़ाला मदत करतो. मात्र आजवर अशा प्रकारे फक्त चार वेळा आम्ही मदत केली आहे. आणीबाणीत प्रथम अशी मदत केली ती सगळ्याच पक्षांना झाली. नंतर त्याचा फायदा प्रथम भाजपला झाला तर अन्य वेळी एनडीएला झाला. पण हे सगळे आम्ही उघडपणे करतो. आडून लपून राजकारण आम्ही करीत नाही. कारण राजकारणात आम्हाला यायचेच नाही.
मुकुंद संगोराम : सर्व समाजाला मदत करू असे म्हणताना समाजात हिंदूंव्यतिरिक्त अन्य घटकांचा विचार तुम्ही कसा करता? तसेच मुस्लिम आपले शत्रू आहेत, असा समज संघाने करून दिल्याचे म्हटले जाते त्याचे काय?
भागवत : समाजाची समजूत सुधारण्याची आवश्यकता आहे. आम्ही हिंदू शब्द वापरतो त्याचा प्रचलित अर्थ जसे ‘ख्रिश्चन’, ‘मुस्लीम’ तसे ‘हिंदू’ अशा प्रकारे घेतला जातो. आम्ही या अर्थाने हिंदू म्हणत नाही. आपल्या देशाची ओळख, आपली राष्ट्रीयता आणि मुस्लीम, ख्रिश्चन यांच्यासहीत आपल्याला जोडणारा एकतेचा धागा  या अर्थाने आम्ही हिंदू शब्द वापरतो. एकता आल्यानंतर समाजाचा पुरुषार्थ प्रकट होतो. भारतात ‘अहिंदू’ कुणीच नाहीत. आहेत ते सगळे भारतमातेचे पुत्र या अर्थाने हिंदूच आहेत. अरबी मुस्लीम अथवा युरोपियन ख्रिश्चन येथे कुणीच नाहीत. एकदा खासदारांशी चर्चा करताना ‘सच्चर समितीला तुमचा विरोध का?’ असा प्रश्न आला. परंतु प्रश्न विचारणाऱ्यानेच त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘येथील मुस्लीम मूळ हिंदूच आहेत. त्यांना आधी भजनाची सवय होती आता ते कव्वाली गातात, मूíतपूजेची सवय होती, आता कबर, मजारीची पूजा करतात. अन्यत्र कुठेही इस्लाममध्ये या गोष्टींना परवानगी नाही, फक्त भारतातच हे होते. अर्थात आज अस्तित्वात असलेला भारत नव्हे तर अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश पसरलेला भारत आम्हाला अभिप्रेत आहे. हे सारे जर त्यांना कळले तर भांडणच संपेल. मात्र यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे.’’ त्यावर मी म्हटले, ‘‘हे जे सारे तुम्ही सांगितले ते आम्हाला १९२५ पासूनच माहीत आहे. तुम्ही हे जे आम्हाला सांगताहात ते तुमच्या समाजाला मान्य आहे का? तुमचे म्हणणे तिथे मान्य होईल त्या दिवशी आम्ही आमचा विरोध मागे घेऊ.
आमची हिंदुत्वाची संकल्पना सांप्रदायिक नाही. संघस्वयंसेवकांनी देशाबाहेर हिंदू संघटन सुरू केले त्याचे नाव ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ असे आहे. आमचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. कारण ती आपली राष्ट्रीयता आहे. ज्याला ‘भारतीय’ म्हटले जाते अशा बहुतांश गोष्टी या रूढार्थाने हिंदू आहेत. उदा. सरकारी बोधवाक्ये, गाडय़ांची नावे इ. हे सारे स्वाभाविक आहे. येशू ख्रिस्त हे भारतातही वंदनीय आहेत, त्यांना विरोध करणे हिंदुत्वात बसत नाही. परंतु ते भारतीय मातीतील नाहीत ही वस्तुस्थिती आपण बदलू नाही शकत. आपण ख्रिश्चन असलो तरी आपले पूर्वज समान आहेत. आम्ही ज्याला अखंड भारत म्हणतो किंवा भौगोलिकदृष्टय़ा ‘इंडो-इराणीयन प्लेट’ म्हटल्या जाणाऱ्या परिसरातील लोकांचे डीएनए समान आहेत. या गोष्टींना आम्ही हिंदुत्वाची लक्षणे मानतो. फक्त काही लोक आपण हिंदू आहोत हे विसरलेले आहेत. काही लोकांना माहीत असूनही स्वार्थापायी बोलत नाहीत. काहींना माहीत आहे, तसे बोलतातही. पण त्यात त्यांना काही विशेष वाटत नाही. तर काहींना मात्र हिंदू असल्याचा अभिमान वाटतो. असे चार प्रकारचे हिंदूच फक्त भारतात राहतात. आम्ही सगळ्यांना बोलावतो. जे येतात त्या सगळ्यांना संघात घेतो. जिथे जिथे मनुष्यवस्ती आहे तिथपर्यंत संघाचे काम पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. श्रीमंत- गरीब यावेत असा प्रयत्न करतो. संघात येणारा आमचा, परंतु न आलेले परके नाहीत, ते उद्या आणायचे आहेत. संघाविषयीचा गैरसमज प्रत्यक्ष दर्शनानेच दूर होतो आणि ते अधिक चांगलेसुद्धा आहे.
प्रशांत दीक्षित : मुळात आजचा तरुण संघाचे ‘दर्शन’ घेतो का? संघाच्या शाखांची संख्या कमी होत आहे, असे चित्र दिसते.
भागवत : आमच्या प्रतिनिधी सभेच्या छायाचित्रावर नजर टाकली तर काळी डोकी किती आणि पांढरी डोकी किती हे सहज लक्षात येईल आणि तुम्हाला जे चित्र दिसते तसे ते नाहीच हे लक्षात येईल. संघात शारीरिक श्रम एवढे करावे लागतात की साठी उलटलेल्याला ते शक्यच नाही. साठी ओलांडल्यावरही माझ्यासारखे काम करणारे फारतर २०० स्वयंसेवक संघात आहेत. इतरांना हे काम झेपणारेच नाही. अर्थात लहानपणापासून संघात येणारे वृद्ध झाल्यानंतरही शाखेत येतच राहणार. त्यांच्याही शाखा लागतात. आता त्याचीच चित्रे पाहिली तर गैरसमज होईल. परंतु आमचे प्राथमिक संघशिक्षा वर्ग होतात. संघात येऊन २-३ वर्षे झालेल्यांमधील काही निवडक स्वयंसेवकांना या वर्गात प्रवेश असतो. दरवर्षी असे ६० हजार ते १ लाख स्वयंसेवक या वर्गात असतात. त्यांचे सरासरी वय ३० असते आणि त्यातही ९० टक्के २० ते २५ वयोगटातील असतात. आयटी क्षेत्रात काम करणारे बहुतांशी स्वयंसेवक तरुणच आहेत. त्यातून आम्हाला प्रचारकही मिळाले आहेत. इंटरनेटवर मुशाफिरी करणाऱ्यांमध्ये ७५ – ८० टक्के आमचे स्वयंसेवक आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सर्वत्र आमचे स्वागत होते. उलट देशभक्ती आणि सेवाकार्य यांचे आवाहन आम्ही करत असल्याने सर्वत्र आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतो.
मधु कांबळे : चातुर्वण्र्य व्यवस्था कायम ठेवून हिंदूंचे संघटन करता येईल का?
भागवत : आज जर कोणी जातिव्यवस्था अथवा चातुर्वण्र्य मानत असेल तर ती व्यवस्था नसून अव्यवस्था आहे. हजारो  वर्षांपूर्वीची ती व्यवस्था आज लागू करणे हे संघ पूर्णपणे अमान्य करतो. समरस, समतायुक्त, शोषणमुक्त समाजाचा संघ पक्षधर आहे. त्या दृष्टीने अनुकूल धोरणांना आमचा पाठिंबा आहे आणि पुढेही असेल. जातपात आम्ही मानत नाही. परंतु ती जात नाही, अनेकांनी प्रयत्न करूनही. याचे कारण ती मनात आहे. आम्ही मनावर उपचार करतो. तुम्ही एकमेकांची जात विचारूच नका, आपण सगळे हिंदू आहोत, असे आवाहन संघ करतो. जीवनाचा दृष्टिकोन बदलण्यात याचा खूप चांगला प्रभाव पडतो, असा आमचा अनुभव आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांमध्ये संघाच्या विचारांचा प्रभाव असणाऱ्यांचीच बहुसंख्या असेल ही मला खात्री आहे. आमची तर अशी भावना आहे की, विषमता काढून टाकणे म्हणजेच हिंदू संघटन आहे.
मधु कांबळे : आरक्षणाबाबत संघाची भूमिका काय आहे?
भागवत : सामाजिक भेदभाव जिथे आहे तिथे आरक्षणाची गरज आहे, अशी संघाची भूमिका आहे. असे आरक्षण देऊन आरक्षणाची गरज समाप्त करू, अशा अपेक्षेने घटनाकारांनी त्यास १० वर्षांची मर्यादा ठेवली होती. विषमता घालवणे हे आरक्षणाचे उद्दिष्ट असल्याने ती जाईपर्यंत आरक्षण सुरू ठेवणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु आपण या हत्याराचा राजकारणासाठी, मते मिळविण्यासाठी दुरुपयोग केला. त्यामुळे संघाची अशी सूचना आहे की, याचा विचार करण्यासाठी एक अराजकीय समिती नेमावी. त्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ, समाजतज्ज्ञ, सरकार, प्रशासन, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असावेत. सामाजिक भेदभाव या आधारावर कोणाकोणाला आरक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी निश्चित करावे. आगामी ३० वर्षांत आरक्षणाची गरज राहणार नाही अशी स्थिती आणण्याचे उद्दिष्ट ठरवावे. तो लागू करणे, न स्वीकारणाऱ्यांना शिक्षा करणे आदी सर्व अधिकार या समितीकडे असावेत. सगळ्यांना एकदा बरोबरीच्या रेषेत आणून हा उपक्रम संपवावा. याउपर जे मागासलेले आहेत त्यांना आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निकालांमध्येही अशाच आशयाच्या सूचना आहेत. आपल्या समाजात पूर्वी भेदभाव झाला होता. तो नष्ट व्हावा यासाठी आरक्षणाचे हत्यार विवेकाने वापरले जावे, अशी संघाची भूमिका आहे.
रेश्मा शिवडेकर : आरक्षण जातीच्या की धर्माच्या आधारावर असावे?
भागवत :  सामाजिक भेदभाव जिथे झाला तिथे आरक्षण असावे. जगभर आरक्षण आर्थिक दुर्बलांना दिले जाते. आपल्याकडे जातींच्या आधारावर भेदभाव झाल्याचा इतिहास असल्याने त्या आधारावर आरक्षण द्यावे लागते. धर्माच्या आधारे भेदभाव आपल्याकडे झालेला नाही. सर्व धर्माचे लोक राज्यकर्ते होते, प्रतिष्ठित होते. आजही कोणत्याही धर्माची व्यक्ती थेट राष्ट्रपती होऊ शकते. त्यामुळे धर्माच्या आधारावर आरक्षण असू नये. सर्व गरिबांना आरक्षण असावे.
उमाकांत देशपांडे : परंतु केवळ आर्थिक निकषावर आरक्षण देऊन विकास साधता येईल का?
भागवत : सगळा समाज एका रांगेत असेल तरच केवळ आर्थिक आरक्षण प्रभावी ठरते. स्पर्धा बरोबरीची असेल तर हे शक्य होते. परंतु सामाजिक भेदभावामुळे स्पर्धा बरोबरीची होत नाही. त्यासाठी प्रथम त्या आधारावर आरक्षण असायला हवे.
आरक्षणामुळे समाजातील एखादा वर्ग दुखावतो. परंतु आम्ही सांगतो की, बाबांनो केवळ ५० वर्षे आरक्षणामुळे तुम्हाला त्रास होतो. ते तर २००० वर्षे वंचित राहिले आहेत, हे समजून घ्या. आजची पिढी समतावादी आहे. तिला कोणताही भेदभाव मान्य नाही. सगळ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे, अशी या पिढीची खात्री झाली तर ती विरोध करणार नाही. समाजस्वास्थ्याचा विषय वादविषय होऊ नये.
दिनेश गुणे : आरक्षणाचे फायदे सतत मिळत राहावेत, असे वाटणाराही वर्ग असतोच!
भागवत : आरक्षण नव्हते तेव्हाही एका वर्गाला सुमारे २००० वर्षे फायदे मिळतच आले आहेत. घटनाकारांनी ते कठोरपणे थांबविले. तसेच आता फायदे घेणाऱ्यांनाही कठोरपणे सांगावे लागेल. मात्र त्यासाठी प्रामाणिकपणा व कळकळीची आवश्यकता आहे. संघामध्ये असलेल्या अशा लोकांना काय वाटेल याची तमा न बाळगता संघ भूमिका घेतो. बाळासाहेब देवरसांनी ‘ही चीड समजून घ्या’ असे आवाहन स्वयंसेवकांना केले होते.
वैदेही ठकार : देशात १९५० ते ५५ याच काळात फक्त लक्षणीय सामाजिक सुधारणांची लाट आली होती. आज पुन्हा अशा सुधारणांची गरज आहे. अशा वेळी खासकरून महिलांच्या बाबतीत, सर्व धर्माच्या महिलांबाबत संघाची काही योजना आहे का?
भागवत : आमची कार्यपद्धती ही लहर उत्पन्न करणारा प्रभाव निर्माण करण्याची आहे. महिला जीवनाचाही विचार संघाने सुरू केला आहे. माहिती गोळा होत आहे. त्यासाठी कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यां तयार होत आहेत. एखादी लाट आंदोलनाच्या रूपात येते. परंतु आंदोलनात दोन पक्ष (म्हणजे शत्रू) असतात. त्यात कटुता निर्माण होते. त्यापेक्षा मन वळवण्याचा संघाचा प्रयत्न असतो. प्रवाह उत्पन्न करणारी मने संघ घडवितो. महिलांबाबत काम केले पाहिजे हे आम्हाला मान्य आहे आणि आमच्या पद्धतीने ते आम्ही जरूर करू.
दिनेश गुणे :  अलीकडेच विहिंपने एक पत्रक काढले आहे. त्यात ‘अमरनाथ यात्रा रोखण्याचा प्रयत्न झाल्यास एकाही हज  यात्रेकरूला हिंदुस्थानातून जाऊ देणार नाही’ असा इशारा देण्यात आला आहे. अशी पत्रके निघाली तर समरसता साकारेल का?
भागवत : एवढय़ा कडक भाषेत हे पत्रक का काढले, कुणी काढले याची आम्ही चौकशी करू. परंतु हे आमचे धोरण नाही. बऱ्याचदा तत्कालीन परिस्थितीच्या रेटय़ामुळे अशी भाषा वापरली जाते. पण म्हणून ती चिकटवून घेण्याचे कारण नाही. रामजन्मभूमी प्रकरणाचा निर्णय आला तेव्हा आम्ही एक पत्रक काढले. हा निकाल म्हणजे कोणाच्या जयपराजयाचा मुद्दा नाही. आपण सर्व एका समाजाचे घटक आहोत. एका वादाचा निकाल आता लागला आहे. तो आपण सगळेजण एकोप्याने मान्य करू, अशी आमची भूमिका होती. सर्व संघटनांनी एकत्र बसून, विचार करून ते काढले होते. त्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचाही सहभाग होता. या पत्रकासारख्या घटना घडतात. परंतु घटनांना अर्थ नाही. खरा प्रवाह काय आहे तो महत्त्वाचे असते.
गिरीश कुबेर : संघसंबंधित काही संस्था अशी टोकाची भूमिका घेतात. त्यामुळे संघही बदनाम होतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात संघाला अपयश येते असे वाटत नाही का?
भागवत : संघाची नियंत्रण ठेवण्याची पद्धत वेगळी आहे. एखादे काम करण्याची विशिष्ट सवय लागली असेल तर ती बुद्धीने सांगून सुटत नाही, तर्काने पटवून सुटत नाही. त्याच्या अंगची सवय घालवावी लागते. त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष कामाला लावतो. काम करू लागल्यानंतर, त्यातील अडचणी लक्षात आल्यावर आपोआप सवय सुटते. ही आमची पद्धत आहे. सरसंघचालकांनी सांगितले म्हणून एखाद्या वेळेस ऐकले जाईलही; परंतु त्यातून परिवर्तन होणार नाही. ते होण्यासाठी प्रत्यक्ष कामातूनच त्याची जाणीव होणे हाच उत्तम मार्ग आहे.
संदीप आचार्य : काशी आणि मथुरेबाबत तुमची काय भूमिका आहे?
भागवत : मथुरेच्या बाबतीत कोणत्याही अपिलात जाता येणार नाही, अशा प्रकारे न्यायालयाने पूर्वीच निकाल दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी केवळ व्हायला हवी आहे. वाराणसीतही विश्वनाथाचे नवीन मंदिर आहे त्या आवारातच ‘ते’ स्थान आहे. तिथेही खूप काही करता येण्यासारखे नाहीच आहे. पण मुळात अयोध्येत राम मंदिर भव्य प्रमाणात उभे राहिल्यावर मग या दोन प्रश्नांना हात घालू.
गिरीश कुबेर : संघाचा आर्थिक विचार काय आहे?
भागवत : कोणत्याही देशाचा सर्वागीण विकास हा त्या देशाची प्रकृती, देशातील लोकांची आकांक्षा, देशातील लोकांची पृष्ठभूमी आदींचा विचार करून व्हावा. सगळी मॉडेल बघावीत. घेण्यासारखे आहे ते घ्यावे. विकासाचा उद्देश मनुष्य स्वतंत्र आणि स्वावलंबी व्हावा हाच असतो. तो स्वतंत्र, स्वावलंबी असेल तर मुक्त होतो. म्हणजे स्वावलंबन असले पाहिजे. म्हणजे जे मी घरी तयार करू शकतो ते बाजारातून आणणार नाही. जे गावच्या बाजारात मिळते ते प्रवास करून बाहेरून आणणार नाही. जे देशात मिळते ते परदेशातून आणणार नाही. देशात मिळत नाही, तयारही करता येत नाही आणि जीवनावश्यक आहे ते मी बाहेरून घेईन. पण ते माझ्या अटींवर घेईन. व्यापारात दोन्हीकडून अटी असतात. पण मला फायदेशीर अटींवर घेईन. या पद्धतीला आम्ही स्वदेशी म्हणतो. ती व्यक्त होताना ‘लाइफबॉय वापरू नये’ अशा स्वरूपात व्यक्त होते. ज्ञान, तंत्र सगळीकडून घ्यावे, घेताना आपल्या देशात वापरावे. प्रत्येक देशाला स्वत:चा एक ‘स्व’ असतो. चीन, रशिया, अमेरिका महासत्ता झाल्या. त्यांनी जगाचे काय भले झाले? आम्ही आमच्या प्रकृतीच्या आधारे, आवश्यकतेच्या आधारावर आमचे उद्दिष्ट नक्की करू. अशा प्रकारे मुक्त होऊन ‘स्व’च्या आधारावर मांडणी व्हायला हवी. एवढा मोठा देश नीट चालायचा असेल आणि भ्रष्टाचारमुक्त राहायचा असेल तर अर्थनीती विकेंद्रित असावी लागेल. कमीत कमी ऊर्जा खाणारी आणि पर्यावरणाला कमीत कमी धोका पोहोचविणारी ती असावी. अधिक रोजगार देणारी, स्वावलंबी बनविणारी असावी. आपला देश फक्त ग्राहक नको, तो उत्पादक आणि विक्रेतासुद्धा हवा. त्या दृष्टीने स्वकीय व्यापाराला चालना देणारी आणि संरक्षण देणारी तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारात आपल्याला अनुकूल निर्णय घेता येणारी अर्थनीती असायला हवी. सध्या अनेक क्षेत्रांत आपण क्षमता आणि नैपुण्य असूनही उत्पादन नाही तर फक्त असेम्ब्लग करीत आहोत. मूलभूत संशोधनाला उत्तेजन मिळत नाही. सगळेच बिघडले आहे असे नाही, पण खूप ठीक चाललेले नाही.
गिरीश कुबेर : भारतीय कंपन्या परदेशांमध्ये जात असताना शेणाचा साबण यासारखा स्वदेशीचा नारा लावणे हा विरोधाभास नाही का?
भागवत : स्वदेशीची कल्पना ही नाही. जग जवळ आले आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला आहे आणि त्यात देवघेव असतेच. मात्र असे करताना आपल्या जनतेचा बळी देऊन ते करता उपयोगी नाही. ज्ञानाची देवघेव अवश्य व्हायला हवी. परंतु आपला उद्योग बंद करणे कोणत्याच देशाला चालणारे नाही.
प्रशांत दीक्षित : वाजपेयी सरकारचे आर्थिक धोरण संघाला मान्य होते का?
भागवत : त्याही वेळी जे मान्य नव्हते ते संघाने आणि स्वदेशी जागरण मंचाने स्पष्ट केले होते. मुळात आर्थिक नीतीबाबत एकत्र बसून काही विचार स्वातंत्र्यानंतर आजवर कधी झालेलाच नाही.
सुहास गांगल : एन्रॉन प्रकल्पाला संघाने कडाडून विरोध केला होता. परंतु भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर अचानक संघाने आंदोलन मागे घेतले. असे का घडले?
भागवत : त्या वेळी मी नव्हतो. त्यामुळे त्याचे उत्तर मी देणार नाही. परंतु  एक नक्की, ज्या वृत्तीतून एन्रॉनला आम्ही विरोध केला त्याच वृत्तीतून पुन्हा विरोध करावा लागला तर आम्ही करू! तेव्हा जे काही झाले, ते का झाले या तपशिलात जायचे असेल तर मला आधी माहिती करून घ्यावी लागेल. काहीतरी झाले होते हे मला माहीत आहे. त्यातून पुष्कळजण नाराजही झाले होते. पण शेवटी समग्र राष्ट्रजीवन म्हणजे एक घटना नव्हे.
सुहास गांगल : म्हणजे भाजपचे सरकार असेल अशा ठिकाणी संघाला आंदोलन मागे घ्यावे लागते का?
भागवत : नाही, असे कुठेच होत नाही. भाजपप्रणीत सरकार जिथे आहे तिथे स्वयंसेवकांनी अनेक आंदोलने केलेली आहेत.
पी. वैद्यनाथन अय्यर : संघ हिंदू तत्त्वज्ञान सांगतो. परंतु महाराष्ट्रातच काहीजण अन्य प्रांतातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवतात. हा संकुचितपणा दुफळी माजवणारा आहे, असे तुम्हाला वाटते का?
भागवत : संकुचित विचार नेहमीच दुफळी माजवतो. हिंदुत्वामध्ये तुम्ही तुमचे विचारविश्व संपूर्ण चराचरापर्यंत विस्तारावे, अशी कल्पना आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’. जे फक्त स्वत:चाच विचार करतात ते पशू समजले जातात. परंतु जे संपूर्ण विश्वाचा, अगदी सजीव आणि निर्जीवाचाही विचार करतात त्यांना देव समजले जाते. त्यामुळे हिंदुत्व आणि भाषा, प्रांत, जाती, परस्परांतील वैर आदी गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत.
पी. वैद्यनाथन अय्यर : पण मग अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या राजकारणाबद्दल काय?
भागवत : आमचे म्हणणे आहे, ‘सारा भारत सगळ्या भारतीयांचा’. संघाचे स्वयंसेवक जे अन्य देशांत काम करतात त्यांची प्रार्थना ही ‘विश्व धर्म प्रकाशेण, विश्व शांती प्रवर्ततै। हिंदु संघटनाकार्ये ध्येयनिष्ठा स्थिरातुमा। विश्व शांती देणारा विश्व धर्म हिंदू संघटनेमुळे स्थापित होवो, अशी ही प्रार्थना आहे. आमचे म्हणणे हे आहे.
गिरीश कुबेर : बाळासाहेब देवरस यांच्या काळात संघाचे काम खूप वाढले. परंतु आज मात्र संघ त्यांना मानत नाही, अशी टीका होते.
भागवत : आमचे संबंध असे असतात की विसरले जात नाहीत आणि लक्षात राहावे म्हणून कामही केले जात नाही. घरात पणजोबांचे स्मरण श्राद्धकर्म असेल तरच केले जाते. संघात तर तेही नसते. परंतु बाळासाहेबांसकट सगळ्याच सरसंघचालकांनी जे वळण लावून दिले आहे ते मात्र सुरूच आहे. व्यक्तीचा फार बडेजाव संघात नसतो. संघ स्थापन करणारे म्हणून डॉक्टर हेडगेवार आणि त्यांच्या सूत्ररूप विचारांना मोठे स्थान मिळवून देणारे गुरुजी यांचे फोटो फक्त संघात लावले जातात. स्वत: बाळासाहेबांनीच असे सांगून ठेवले होते की, माझा अंत्यविधी रेशीमबागेत करायचा नाही. रेशीमबाग ही सरसंघचालकांची स्मशानभूमी नाही. फोटो दोनच लावायचे हेही त्यांनीच सांगून ठेवले होते. गुरुजींनीही सांगितले होते, माझे स्मारक करायचे नाही. आम्ही त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञ असतो. त्यांनी घडविल्यानुसार आम्ही लक्षात ठेवून वागतो. याउपर एकेकाची जयंती, पुण्यतिथी असे काही करणे संघटनेला योग्य नसते. हासुद्धा संकेत त्यांनीच दिला आहे.
गिरीश कुबेर : तुम्ही राजकीय भाष्य करण्याचे टाळता. मात्र, मध्यंतरीच्या काळात सरसंघचालकांच्या राजकीय विधानांमुळे बरीच खळबळ उडाली होती. यामध्ये सातत्य असू शकत नाही का?
भागवत : याचे श्रेय मी प्रसारमाध्यमांनाच देतो. मधल्या दोन प्रसंगांबाबतच तुम्ही म्हणताहात ना? त्यातील पहिला प्रसंग लातूरचा आहे. मी तेथे स्वयंसेवकांसमोर बौद्धिक देताना फक्त एवढे म्हटले की, हिंदुत्वाबद्दल आपण जे बोलतो ते आता बहुतेक सर्वाना पटू लागले आहे. त्याला काहीजण विरोध करतात. यासंदर्भात मला अंधुकपणे नितीशकुमार यांचे ‘पंतप्रधान सेक्युलर पाहिजे’ असे विधान आठवत होते. त्याचा उल्लेख केला. त्यांना खरे तर असे म्हणायचे आहे की ‘पंतप्रधान हिंदुत्ववादी नको’, असे मी स्पष्ट केले. परंतु या वाक्याचा अर्थ असा काढला गेला की मी नरेंद मोदींना समर्थन देतो.
यानंतर दुसरा प्रसंग दिल्लीत परदेशी पत्रकारांच्या पत्रकार परिषदेत घडला. तिथे मला विचारले गेले की, बिगरकाँग्रेसी राज्यांत विकास होऊ शकतो का? मी म्हटले, विकास कुठेही होऊ शकतो. त्याची उदाहरणे विचारली तेव्हा मी बिहारचे नाव प्रथम घेतले. आता मी सहा वर्षे बिहारमध्ये क्षेत्र प्रचारक म्हणून राहिलेलो असल्याने स्वाभाविकपणे ते नाव पहिल्यांदा आठवले. याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये व्यवस्थितपणे आले आहे. परंतु तिथे उपस्थित नसतानाही ‘पीटीआय’ने त्याचे वृत्त देताना मी नितीशकुमारांचे नाव प्रथम घेतल्याचे सांगितले. त्यामुळे या भानगडीत न पडण्याचेच सातत्य मी राखतो.
गिरीश कुबेर : पण मग मोदींबाबत संघाची नक्की भूमिका काय आहे?
भागवत : या भानगडीत आम्ही पडतच नाही. हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांनीच ते बघायचे आहे.
स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ :  १९४२ साली स्वातंत्र्यलढय़ात संघ पूर्णाशाने उतरला नव्हता. त्यावरून गोळवलकर गुरुजींवर आजही टीका करण्यात येते.
भागवत : संघ म्हणून कुणाला पाठिंबा अथवा विरोध असा काही प्रकार तेव्हा नव्हता आणि आताही अण्णांच्या आंदोलनात नाही. स्वातंत्र्यलढय़ात गाजलेल्या ‘आष्टी-चिमूर’च्या कांडात ज्यांना फाशी झाली, मग माफी झाली, काही सुटले, काही हुतात्मे झाले त्यांची नावे काढून पाहा, त्यात निम्म्याहून अधिक स्वयंसेवक आहेत. स्वातंत्र्यलढय़ात भूमिगत कार्यकर्त्यांची व्यवस्था कुणी केली? वसंतदादा पाटील सांगली तुरुंगातून पळाले तेव्हा त्यांना खंदकातून खांद्यावर उचलून धावत नेण्याचे काम पडसळगीकर यांनी केले. ते बुद्धिबळपटू आणि कुस्तीगीरही होते. प्रांत संघचालकांच्या सूचनेवरून पडसळगीकरांनी ते काम केले. संघ जर त्यात नव्हता तर प्रांत संघचालकांनाही हे करण्याचे कारण काय? संघ, संघ म्हणून आंदोलनात नव्हता याची कारणे आहेत आणि आता ती सगळ्यांना माहीतही आहेत.
प्रशांत दीक्षित : ८७ वर्षांच्या इतिहासात संघाची कधीच चूक झाली नाही? आणि असे जर असेल तर मग एवढय़ा वर्षांनंतरही संघ राजकीय पक्षांना ‘ओझे’ का वाटतो, ‘मिळकत’ का वाटत नाही?
भागवत : संघाची कधीच चूक झाली की नाही हे पाहावे लागेल. परंतु एकंदरीत संघाचे ठीक चालले आहे. लहानमोठय़ा काही चुका झाल्या असतील. एकत्र चालताना काही ठेचा लागणारच. चूक होण्याची शक्यता एकटय़ाने निर्णय घेताना असते. संघात तर जास्तीत जास्त स्वयंसेवकांपर्यंत जाऊन निर्णय घेतला जातो. त्यामुळे त्यात चूक होण्याची शक्यता फारशी राहातच नाही.  आता प्रश्न राजकीय ओझ्याचा! आमचे कुणाला ओझे वाटत असेल, (वाटते की नाही माहीत नाही) परंतु आमची कुठे कुणावर जबरदस्ती आहे? सगळ्या संघटना स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. त्यांना वाटेल तो निर्णय त्या घेतील. आम्ही संघ म्हणून स्वावलंबीपणे चालतो. त्यामुळे इतर संघटनांना आम्ही ओझे वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
गिरीश कुबेर : संघाच्या जमा-खर्चाचा ताळेबंद केला तर खर्चाच्या रकान्यात काय काय आढळेल? जे स्वयंसेवक भाजपमध्ये जातात त्यांचे राजकीयीकरण होते त्याचे काय?
भागवत : काळाच्या अनुरूप संघकामाची गती वाढविण्यासाठी परिश्रमांचे जे प्रमाण हवे आहे तेवढे आम्हाला आजही वाढविता आलेले नाही. ही गतीची शर्यत आम्ही अद्याप जिंकलेलो नाही ही एकच गोष्ट खर्चाच्या रकान्यात मला दिसते.
स्वयंसेवक राजकारणात गेल्यावर ते संघाच्या संस्कार पद्धतीशी मानसिक संबंध किती ठेवतात, तो स्वयंसेवक आहे म्हणून आम्ही त्याच्याशी संबंध किती ठेवतो आणि विपरीत स्थितीत आपल्या ‘स्व’त्त्वावर ठामपणे उभे राहायची त्याची किती तयारी आहे? या तीन गोष्टींवर त्याचे काय होईल हे अवलंबून असते. या तिन्ही गोष्टी नीट राहिल्या तर तो बिघडत नाही. अशी खूप उदाहरणे आहेत. परंतु यातील एकही गोष्ट बिघडली तर ती घसरण्याची जागा आहे. त्यामुळे तो घसरला तर आश्चर्य नाही. चांगले राहण्याची त्यांची स्वत:ची इच्छा, त्याचा आधार हा संस्कार आहे. दुसऱ्या क्षेत्रात असलो तरी मनाने त्या संस्कारांशी संलग्न राहण्याची त्याची वृत्ती आणि तो दुसऱ्या क्षेत्रात असला तरी स्वयंसेवक म्हणून त्याच्याशी संपर्क ठेवण्याची आमची व्यवस्था या तीन गोष्टींवर सगळे अवलंबून आहे. मात्र असे होणे हा नियम नाही तर जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढे अपवाद आहेत. नियमांची फारशी प्रसिद्धी होत नाही, अपवादांना मोठी प्रसिद्धी मिळते.
गिरीश कुबेर : अगदी नेमके उदाहरण घ्यायचे तर मोदी आणि संजय जोशी यांची नावे घेता येतील. दोघेही संघस्वयंसेवक आहेत. संघ हा भाजपचा ‘एच. आर. मॅनेजर’ आहे, असे मानले तर त्या माणसांना जे वळण लागते त्यावर संघाचे काही नियंत्रण आहे का?
भागवत : संघ हा भाजपचा ‘एच. आर. मॅनेजर’ नाही. प्रत्येकाने आपापले दुकान, धंदा स्वत:च चालवायचा आहे. संघ या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि त्या सगळ्या स्वतंत्र, स्वायत्त संस्था आहेत. आधार फक्त त्यांची समजदारी, संस्कारांशी सांधा आणि त्यांच्याशी ठेवलेला संपर्क या तीन गोष्टींचा आहे. या तीनपैकी एक गोष्ट बिघडली की त्रास होतो. दोन बिघडल्या तर संतुलन ढळते आणि तिन्ही बिघडल्या तर सगळेच संपते. मोदी, जोशी आणि त्यांच्यात मध्यस्थी करणारे सगळेच स्वयंसेवक आहेत. आमच्यासाठी हे दोघेही स्वयंसेवक आहेत. यासंदर्भात मी काही बोलावे हे उचित नाही.
निशांत सरवणकर : परिवारात काहीजण टोकाची भू्मिका घेतात. यातूनच ‘हिंदू अतिरेकी’ तयार होतात का?
भागवत : काही गोष्टी हिंदुत्वाच्या विरुद्धच जातात. त्यांच्या जोडय़ा होऊच शकत नाहीत. अतिरेक्याला ‘हिंदू’ विशेषण लावले तर तो गोंधळ आहे. कारण ही जोडी होऊच शकत नाही. ‘हिंदुत्वा’त सांगितले आहे की, मध्यममार्ग नेहमी श्रेयस्कर असतो. एकीकडे झुकणे हे विनाशाकडे जाणे आहे. हिंदुत्व हे नेहमी मध्यममार्गी आहे. कोणतीही टोकाची भूमिका हिंदुत्वात वज्र्य आहे. परंतु शेवटी मनुष्य हा मनुष्य आहे. एखाद्याला चालले आहे ते पटत नाही आणि काहीतरी करतो. त्याला अतिरेकी म्हणता येईल. परंतु ‘हिंदू अतिरेकी’ म्हणता येणार नाही.
स्वानंद ओक : १९९० च्या दशकात आयटी क्रांती झाली. या क्रांतीमुळे संपूर्ण समाज ढवळून निघाला. आधीच्या २००० वर्षांत झाले नाहीत एवढे बदल पुढच्या १० वर्षांत या क्रांतीने घडवून आणले. कुटुंब, विवाह, शिक्षण अशा सगळ्या संस्थांचे अध:पतन झाले. या साऱ्या परिस्थितीला संघाचा प्रतिसाद कसा आहे?
भागवत : ‘आयटी’ ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन समाजाला हितकारक

* भाजपच्या भानगडीत पडत नाही
* गतीची शर्यत अद्याप जिंकलो नाही
* भारतात अहिंदू कोणीच नाही
* चार्तुवण्र्य ही अव्यवस्था

‘रिमोट कंट्रोल’ची गरज काय?
संघात रिमोट कंट्रोल नसतो. अखिल भारतीय प्रचार विभाग प्रमुख मनमोहन वैद्य इथे बसले आहेत. त्यांनाही मी कंट्रोल करू शकत नाही. कंट्रोल करायला आधार काय आहे आमच्याकडे? प्रेम, दोस्ती, संघसंस्कारांविषयीची कृतज्ञता याचाच फक्त आधार असतो. अनेकदा काही सांगावेही लागत नाही. आपसूकच होते. जबरदस्ती कसलीच नाही. शाखेत येण्याचीसुद्धा जबरदस्ती केली जात नाही. संघात कंट्रोलची भाषाच चुकीची आहे.

तर तुम्ही सरसंघचालक नाहीत..
संघाचे भाजपकरण होणे अशक्य आहे. कारण संघ मी चालवतो किंवा कार्यकारी मंडळ चालवते असे नाही. संघ कसा चालावा याची प्रत्येक स्वयंसेवकाची जी कल्पना असते त्यानुसारच संघ चालतो. संघाला विपरीत वळण मी सरसंघचालक असूनही देऊ शकत नाही. एक प्रसंग सांगतो. डॉक्टर हेडगेवार संघ शिक्षा वर्गात काही स्वयंसेवकांशी गप्पा मारत होते. त्यांनी एक प्रश्न केला. अशी कल्पना करा, समजा मी उद्या, डॉक्टर हेडगेवार, तुम्हाला म्हणालो की,  ‘हिंदुस्थान हिंदू राष्ट्र नाही!’ स्वयंसेवक म्हणाले, तुम्ही असे म्हणणारच नाही. परंतु कल्पना करा की मी असे म्हणालो तर काय कराल? त्यावर स्वयंसेवक म्हणाले, तुम्ही असे म्हणालात तर आम्ही म्हणू, ‘डॉक्टर हेडगेवार आमचे सरसंघचालक नाहीत.’ स्वयंसेवकांचा हा संयुक्त मनोभाव संघ चालवतो. त्यामुळे संघ भटकणे शक्यच नाही.

मीही नाटकात काम केले आहे..
माणसाला कलेची आवड असतेच. गुरुजी उत्तम बासरीवादक होते. डॉक्टर हेडगेवारही संगीताच्या कार्यक्रमांना जायचे. परंतु उत्तम गाणारा संघाचा स्वयंसेवक झाला पाहिजे या दृष्टीने ते अशा ठिकाणी जात. संघाचे स्वयंसेवक कलाक्षेत्रात असतील तर त्यांच्या कार्यक्रमांना आम्ही जाणारच. सुधीर फडके यांचे गीतरामायण ऐकण्यासाठी गुरुजी जाणारच. मी नाटक पाहावे म्हणून नागपूरच्या मंडळींनी खास खेळ ठेवला होता. त्याला मी गेलो. मी कॉलेजमध्ये असताना नाटकात कामे करायचो. मला आवड आहे. परंतु आता प्राथमिकता संघकामाला आहे. ती ठेवताना अन्य विषय अभ्यासावे याला आम्ही प्रोत्साहन देतो. मीही संस्कृतच्या कोविदपर्यंतच्या परीक्षा दिल्या.

सिनेमा बघताना मध्यंतरात समोसाही होतो..
संघाचे बिहारचे क्षेत्र संघचालक थिएटर मालक असोसिएशनचे अध्यक्ष होते. केंद्रीय अधिकारी आले की ते त्यांना आपल्या थिएटरमध्ये घेऊन जात. बाल्कनीत बसवत, मध्यंतरात समोसा, थम्स-अप, पेप्सी- कोला खिलवत (तेव्हा स्वदेशी जागरण मंच अस्तित्वात आला नव्हता) एकदा मदनदासजी देवी आणि इतरांसोबत मुंबईत ‘हे राम’ सिनेमा पाहिला. तो टॉकीजमध्ये पाहिलेला शेवटचा सिनेमा. आवडणाऱ्या कादंबऱ्या अनेक आहेत. परंतु मला वि. स. खांडेकरही आवडतात. मला लहानपणापासून वाचायचा खूप नाद असल्याने मराठी आणि इंग्रजी दोन्ही भरपूर वाचले आहे. ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ ही कादंबरी मला आवडली. फिक्शन वाचतो. जो काही वेळ मिळतो त्यात व्यासंग ठेवण्याचा प्रयत्न करतो.

संघाला विनोदाचे वावडे नाही
सुतकी चेहरे करून बसल्याने संघकार्य होणार नाही, असे डॉक्टर नेहमी सांगत. ‘जहाँ बालों का संघ वहाँ बाजे मृदंग, जहाँ बूढों का संघ वहाँ खर्चो से तंग’ असेही ते म्हणत असत. तणाव घेऊन काम होत नाही हे आम्हाला माहीत आहे. संघाची बैठक हास्यविनोदाशिवाय होतच नाही. एक प्रसंग सांगतो. बाळासाहेबांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या बौद्धिकाचा एक व्हिडीओ करून तो दाखवावा, असा विचार एका बैठकीत मांडला गेला. बाळासाहेबांना ते आवडले नाही. ते म्हणाले, मी गेल्यानंतर नवीन सरसंघचालकांना तसे करायचे तर करू द्या. बाळासाहेबांचे हे निर्वाणीचे शब्द स्वयंसेवकांना लागले आणि ते गंभीर झाले. तेवढय़ात मोरोपंत पिंगळे उठून उभे राहिले आणि म्हणाले, तुम्ही गेल्यानंतरही संघ चालवायचा आहे का? झाले एवढे पुरे नाही का झाले, कंटाळा नाही आला का, असा त्यांच्या प्रश्नाचा आशय होता आणि खास नागपुरी ढंगात त्यांनी तो विचारल्याने एकचा हशा उसळला आणि बैठकीतील ताण हलका झाला. असे प्रसंग नेहमी घडत असतात.

कुजबूज आघाडी?
गोबेल्सच्या तंत्राचा वापर आजवर सर्वात जास्त कुणी केला याचा तुम्हीच शोध घ्या. आता कुजबुजीचे म्हणाल तर समाजात सगळेचजण कुजबुज करीत असतात. प्रवासात, पान खाताना, मित्र भेटल्यावर कुजबूज करीत असतात. आमचे स्वयंसेवकही बोलत असतात. पण आमचे स्वयंसेवक जे बोलतात ते सगळ्यांना पटतं ही खरी पोटदुखी आहे.
alt
अण्णा आणि आम्ही..
अण्णांचे स्थान आहे, त्यांचे व्यक्तित्व आहे. आमच्या ठरावात आम्ही सर्व स्वयंसेवकांना सांगितले होते की, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात तुम्ही भाग घ्या. परंतु आंदोलनाची कल्पना, त्याची रचना ही सगळी अण्णांचीच आहे. त्यांचे श्रेय आम्ही का घ्यावे? स्वयंसेवक नागरिक म्हणून यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत का? बिहार आंदोलनाच्या वेळीही अशीच ओरड होत होती. बाळासाहेब देवरस त्या वेळी म्हणाले होते, आमचे स्वयंसेवक नागरिक नाहीत का? ते ज्यांच्याबरोबर राहतात त्यांच्या सुखदु:खात त्यांच्याबरोबर राहणार नाहीत का? पूर आल्यावर बिहारचा संपर्क तुटतो, दिवसेंदिवस वीज नसते, स्वातंत्र्यानंतर ३० वर्षांनंतरही अशी परिस्थिती असल्याची चीड समाजात आहे. त्याविरुद्ध आंदोलन झाले तर स्वयंसेवक त्यात भाग घेणार नाहीत का? की स्वैपाकघरात बसून राहतील? यामध्ये संघाचा काही गुप्त अजेंडा, छुपा पाठिंबा वगैरे असे काही नाही.

‘लिव्ह इन रिलेशन’, ‘समलिंगी संबंध’
बदलत्या काळात समाजात ‘लिव्ह इन रिलेशन’, ‘समलिंगी संबंध’ आदी प्रवाह पुढे येत आहेत. समाजाचा साकल्याने विचार करणारी संघटना या नात्याने विचार करताना, समाज म्हणजे नुसता समूह नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. समाजाला स्वभावही असतो. वाघांच्या समूहातील एखादा वाघ शेळीबरोबर गवत खाऊ लागला आणि हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती फुटबॉल खेळू लागला तर याला तुम्ही नवीन प्रवाह म्हणणार का? वाघ जंगलातच शोभतो. फुटबॉल खेळणे हे काही हत्तीचे वैशिष्टय़ होऊ शकत नाही. नवीन गोष्ट आली म्हणजे लगेच त्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही. १०० वर्षांनंतर या गोष्टीची स्थिती काय असेल याचाही विचार करायला हवा. या गोष्टींकडे समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार करून आम्ही विरोध करतो.

आमचाही दिनक्रम असतोच की..
सरसंघचालकाने आपले जीवनच राष्ट्रकार्यात लावलेले असते. त्याच्या डोक्यात दुसरा विषय नसतो. या सगळ्यांचा दिवस सकाळी खूप लवकर सुरू होतो. अर्थात प्रत्येक सरसंघचालकांची दिनचर्या वेगवेगळी असते. गुरुजी तीनच तास झोपायचे.  मी सहा तास झोपतो. दुपारी एखादा तास विश्रांती होते. दिवसभर गाठीभेटी, पत्रव्यवहार, बैठका आणि अन्य पुष्कळ कामे असा दिनक्रम असतो.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबरोबर झालेल्या मुक्तसंवादाचा व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive  येथे भेट द्या .

Story img Loader