फिटनेससंबंधीच्या विविध करिअर क्षेत्रांची  झपाटय़ाने वाढ होत आहे. या क्षेत्रातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ओळख-
समाजात फिटनेसविषयीची जागरूकता वाढू लागली असल्याने स्वास्थ्य क्षेत्राशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये तज्ज्ञांची निकड भासू लागली आहे. या क्षेत्रात निर्माण होऊ लागलेल्या अनेक संधींची दखल युवावर्गाने घ्यायला हवी.  
जीवनशैलीतील बदलांचा तब्येतीवर विपरित परिणाम होऊ नये यासाठी अनेकजण फिटनेस राखण्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रकृतीच्या तक्रारी दूर करण्यासाठी अनेक व्यक्ती  फिट राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आज फिटनेस राखण्यासाठी केवळ जिम हा एकच पर्याय उपलब्ध नसून आता योग, एरोबिक्स, मार्शल आर्ट, नृत्य, चालणे, धावणे या व्यायाम प्रकारांचाही समावेश फिटनेस राखण्याकरता होऊ लागला आहे. यातील तज्ज्ञ प्रशिक्षकांची वानवा या क्षेत्राला भासत असून जर   या क्षेत्रांत उत्तम प्रशिक्षण प्राप्त केले तर प्रशिक्षकाचे करिअर घडवता येणे शक्य आहे.
फिटनेसचे क्षेत्र गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने विकसित होत आहे. या क्षेत्रात जशा संधी आहेत, तशी आव्हानेसुद्धा आहेत. फिटनेस प्रशिक्षक म्हणून काम करताना ग्राहकाला आवश्यक ती मदत योग्य प्रकारे करणे, त्याच्या प्रकृतीमानानुसार त्याला फिटनेसचे धडे देणे, त्याच्या गरजांना अनुसरून प्रशिक्षण रचणे, त्यांचा तणाव दूर करण्यासाठी मदत करणे आदी बाबींकडे लक्ष पुरवावे लागते. खेळाडूंना फिटनेस प्रशिक्षण देताना त्यांची कामगिरी सतत कशी उंचावत राहील याकडे लक्ष पुरवावे लागते. काही रुग्णांना त्यांच्या आजारानुरूप फिटनेसशी संबंधित व्यायाम शिकवावे लागतात. मधुमेह, गुडघ्याचे आजार, रक्तदाब, हृदयरोग, कमकुवत बनलेले स्नायू अशा शारीरकि बाबी ध्यानात ठेवून व्यायाम आणि पोषक आहार यांची सांगड घालावी लागते. ही बाब लक्षात घेतली तर फिटनेसच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला किती बाबींची माहिती असणे आणि किती गोष्टींविषयी सतर्क राहणे आवश्यक आहे, हे स्पष्ट होते.
फिटनेसशी संबंधित करिअरच्या संधी पुढील ठिकाणी मिळू शकतात- योगशाळा किंवा प्रशिक्षण केंद्र, जिम, व्यायामशाळा, स्पा, रिसॉर्ट, पंचतारांकित हॉटेल्स, प्रवासी जहाज, आरोग्य केंद्रे,  पर्सनल ट्रेनर, पंचतारांकित रुग्णालयातील आरोग्य केंद्रे, मोठय़ा कॉर्पोरेट घराण्यांसाठी फिटनेस केंद्रे आदी ठिकाणी प्रशिक्षक अथवा मार्गदर्शक म्हणून करिअर करता येऊ शकते. आपला अनुभव व ज्ञान लक्षात घेऊन स्वत:चे फिटनेस प्रशिक्षण केंद्रसुद्धा सुरू करता येऊ शकते.
या क्षेत्रात करिअरच्या संधी उत्तम असल्या तरी ग्राहकाला दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यावर तज्ज्ञाचे यश अवलंबून असते. त्यामुळे सतत नव्या आणि अभिनव व्यायामप्रकारांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना स्वत:ला सतत  वैशिष्टय़पूर्ण प्रशिक्षणाने अपडेट व्हावे लागते. या प्रशिक्षणांमध्ये किक बॉिक्सग, कराटे, एरोबिक्स, योगासने आदींचा अंतर्भाव करता येईल. ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांच्या फिटनेस कार्यक्रमात या बाबींचा प्रभावीरीत्या समावेश करावा लागेल. हे क्षेत्र आकर्षक वाटत असले तरी त्यात झोकून देऊन काम करावे लागते. दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी प्रशिक्षकाने मानयताप्राप्त संस्थेमधून प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरते. त्याशिवाय उत्तम संवाद कौशल्य अवगत करणे गरजेचे असते.
विविध अभ्यासक्रम
* बीएस्सी इन फिजिकल एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्टस् : हा अभ्यासक्रम इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्टस् सायन्स या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्टस् सायन्स संस्थेमार्फत सुरू करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण. कालावधी- तीन वष्रे. या अभ्यासक्रमाला चाचणीद्वारे प्रवेश दिला जातो.
    पत्ता- बी ब्लॉक, विकास पुरी, न्यू दिल्ली- ११००१८.
    वेबसाइट- http://www.igipess.com
    ईमेल- igipess@bol.net.in
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हेल्थ, फिटनेस अ‍ॅण्ड मॅनेजमेंट : हा अभ्यासक्रम लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनने सुरू केला आहे. ही संस्था स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत कार्यरत आहे. संस्थेचा अभ्यासक्रम केरळ विद्यापीठाशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. अर्हता- ५० टक्के गुणांसह बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन.
* बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन: लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनने  हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण. पत्ता- करिवट्टम, थिरुवनंतपूरम- ६९५५८१.
ईमेल- lncpe@yahoo.com
     वेबसाइट- http://www.lncpe.gov.in
*    बीएस्सी इन एक्सरसाइज फिजिओलॉजी : हा अभ्यासक्रम तामिळनाडू फिजिकल अ‍ॅण्ड स्पोर्टस् युनिव्हर्सटिीने सुरू केला आहे. कालावधी- तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण.
या संस्थेचे इतर अभ्यासक्रम : पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन एक्सरसाइज थेरपी, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन फिटनेस न्युट्रिशन, फिटनेस अ‍ॅण्ड वेलनेस मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन जिम/ फिटनेस इन्स्ट्रक्टर.
    पत्ता- द रजिस्ट्रार, तामिनाळनाडू फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्टस् युनिव्हर्सटि मेलॅकोटैयूर, चन्नई- ६००१२७.
    वेबसाइट- http://www.tnpesu.org
    ईमेल- tnpesu@rediffmail.com
* मास्टर्स ऑफ एक्सरसाइज फिजिओलॉजी अ‍ॅण्ड न्यूट्रिशन : हा अभ्यासक्रम गुरू नानक देव युनिव्हर्सटिीच्या डिपार्टमेंट ऑफ स्पोर्टस्ने सुरू केला आहे. कालावधी-
दोन वष्रे. अर्हता- ५० टक्के गुणांसह होम सायन्स किंवा मेडिकल किंवा डायेटिक्स किंवा क्लिनिकल न्यूट्रिशन या विषयातील पदवी. पत्ता- जी टी रोड, अमृतसर- १४३००५.
    ईमेल-dekoley@gmail.com
  वेबसाइट- http://www.sportsphysiotherapyindia.com sportsmedicineindia.com
* बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन : हा अभ्यासक्रम डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेने सुरू केला आहे. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामार्फत चालवली जाणारी ही स्वायत्त संस्था असून  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न आहे. संस्थेमार्फत बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण. कालावधी- तीन वष्रे. पत्ता- हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,
अमरावती-  ४४४६०५. वेबसाइट- http://www.hvpm.org

नया है यह!
डिप्लोमा कोर्स इन हेल्थ प्रमोशन-
हा अभ्यासक्रम नवी दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अ‍ॅण्ड फॅमिली वेल्फेअर या संस्थेने सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम दूरशिक्षण पद्धतीने करता येतो. या अभ्यासक्रमाला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाची मान्यता आहे. पत्ता- बाबा गंगनाथ मार्ग, नवी दिल्ली- ११००६७.
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com