मराठी भाषेचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अथवा डॉक्टरेट प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अर्हतेनुसार करिअरच्या विविध संधी प्राप्त होऊ शकतात. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये मराठी भाषाविषयक उच्च शिक्षण उपलब्ध आहे. त्याविषयी..
* मराठी भाषाविषयक करिअर संधी :
– चांगल्या प्रकाशक संस्थांना मराठीवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तींची कायम गरज भासत असते. संपादन, मुद्रितशोधन, कॉपी लेखन यासाठी अशा व्यक्तींची गरज भासते.
– सध्या अनुवादाचे विविध प्रकल्प वेगवेगळ्या संस्थांमार्फत राबवण्यात येतात. मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलेल्या व्यक्तींना या प्रकल्पांमध्ये योगदान देण्याची उत्तम संधी मिळू शकते. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फतही अनुवादाच्या योजना राबवल्या जातात. त्यासाठीही अनुवादकांची गरज भासू शकते. अशीच संधी साहित्य अकादमीमार्फत इतर भाषांमधील पुस्तके मराठीत अनुवादित करण्यासाठी मिळू शकते.
– महाराष्ट्रात प्रकाशित होणाऱ्या सर्व मोठय़ा कंपन्यांच्या जाहिराती मराठीतून देण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे या कॉपी मराठीत लिहिण्यासाठी किंवा मूळ इंग्रजीतील जाहिरात मराठीत अनुवाद करण्यासाठी जाहिरात कंपन्यांना मराठीवर प्रभुत्व असणाऱ्या तज्ज्ञांची गरज भासते. केंद्र सरकारच्या जाहिरातीही सातत्याने प्रकाशित होत असतात. त्यांच्या भाषांतरासाठीही मराठी तज्ज्ञांची गरज भासते.
– पत्रकारिता- मराठी वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिकांमध्ये पत्रकारिता करता येईल. मराठीत प्रभुत्व संपादन केलेल्या व्यक्तींना मराठी वृत्तवाहिन्यांमध्येसुद्धा उत्तम संधी उपलब्ध आहेत.
– राज्य सरकारच्या माहिती व जनंसपर्क महासंचालनालयामध्ये उपसंपादक, साहाय्यक संचालक, जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक या पदांसाठी कोणत्याही विषयातील पदवी आणि पत्रकारिता पदवी किंवा पदविका घेतलेल्या व्यक्तींना संधी मिळू शकते. तथापि, मराठी विषयातील पदवी तसेच पदव्युत्तर पदवी असल्यास अशा उमेदवारांचे एक पाऊल पुढे
राहू शकते.
* केंद्र सरकारच्या माहिती व नभोवाणी मंत्रालयाअंतर्गत आकाशवाणीच्या वृत्तशाखेत वृत्तनिवेदक, वार्ताहर, वृत्तसंपादक आणि कार्यक्रम निर्मिती शाखेत कार्यक्रम अधिकारी म्हणून संधी मिळू शकते. दूरदर्शनची वृत्त शाखा, पत्र सूचना कार्यालय (प्रेस इन्फम्रेशन ब्युरो), क्षेत्रीय प्रसिद्धी (फिल्ड पब्लिसिटी), योजना (मराठी मासिक) येथे संधी मिळू शकते.
– राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागांतर्गत येणाऱ्या विश्वकोश निर्मिती मंडळ, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामध्ये मराठी विषय घेऊन पदवी-पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना संचालक, उपसंचालक, सचिव आदी पदांवर संधी
मिळू शकते.
– शिक्षणसंस्थांमध्ये वेळोवेळी मराठीचे प्राध्यापक आणि शिक्षकांच्या संधी उपलब्ध होतात.
– केंद्रीय नागरी सेवा परीक्षा (भारतीय प्रशासकीय सेवा/ भारतीय पोलीस सेवा व इतर पदासांठी घेण्यात येणारी परीक्षा) मराठी भाषेतून देता येते. मराठी साहित्य हा विषय घेऊन अनेक विद्यार्थी या परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी बजावतात. मराठीतूनही मुलाखत देता येते.
– मराठीतून दर्जेदार लिखाण करणाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे मराठीवर प्रभुत्व मिळवल्यास उत्तम ग्रंथनिर्मिती तसेच इतर वाङ्मयनिर्मितीत आपले योगदान देता येईल.
– चित्रपट/ टीव्ही मालिकांसाठी संवाद लेखन, पटकथा, स्कीट लेखन, गीतकार अशी संधी मिळू शकते.
– राज्याबाहेरील काही विद्यापीठांच्या मराठी भाषा विभागांमध्ये मराठी भाषा तज्ज्ञांची गरज भासते. अशी संधी मराठीत नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळू शकते.
* मराठी भाषाविषयक अभ्यासक्रम :
बारावीनंतर मराठी वाङ्मयाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. हा अभ्यासक्रम राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. मराठी विषयात पदव्युत्तर पदवी, एम.फिल., पीएच.डी करण्याची संधीही या विद्यापीठांमार्फत
उपलब्ध होते.
* मराठी अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्था:
– मुंबई विद्यापीठ : या संस्थेच्या मराठी भाषा विभागात एम.ए. (कालावधी- दोन वष्रे), एम.फिल. (कालावधी- एक वर्ष), पीएच.डी. (कालावधी- चार वष्रे), मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम (कालावधी- एक वर्ष/ अर्हता- दहावी उत्तीर्ण), मराठी पदविका अभ्यासक्रम (कालावधी- एक वर्ष/ अर्हता- मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पत्ता- पहिला मजला, खोली क्रमांक- १५२, रानडे भवन, विद्यानगरी कॅम्पस, कालिना, सांताक्रुझ- पूर्व, मुंबई- ४०००९८.
वेबसाइट- http://www.mu.ac.in
– पुणे विद्यापीठ : या संस्थेच्या मराठी भाषा विभागात एम.ए. एम.फिल, आणि पीएच.डी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पत्ता- खेर वाङ्मय भवन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ४११००७. वेबसाइट- http://www.unipune.ac.in
– शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : या संस्थेच्या मराठी भाषा विभागात पदवी, पदव्युत्तर पदवी, एकात्मिक पदव्युत्तर पदवी, एकात्मिक पीएच.डी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
पत्ता- विद्यानगरी, कोल्हापूर- ४१६००४.
वेबसाइट- unishivaji.ac.in
ईमेल- marathi@unishivaji.ac.in
– बनारस हिंदू विश्वविद्यापीठ : या संस्थेच्या मराठी भाषा विभागामध्ये बी.ए. (ऑनर्स) मराठी, एम.ए.- मराठी, पदविका (पदवीपूर्व पदविका- कालावधी- दोन वष्रे), पदव्युत्तर पदविका (पदव्युत्तर पदविका- कालावधी- दोन वष्रे) आणि पीएच.डी. करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
पत्ता- मराठी भाषा विभाग, बनारस हिंदू विद्यापीठ,
वाराणसी- २२१००५.
ईमेल- head.marathi.bhu@gmail.com
वेबसाइट- http://www.bhu.com
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : मराठी भाषा विभागामध्ये एम.ए. (मराठी भाषा) अभ्यासक्रम
उपलब्ध आहे.
– संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती : येथील मराठी भाषा विभागामध्ये एम.ए. (मराठी भाषा) हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा