हवाई वाहतूक, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र, ई-कॉमर्स, कर विश्लेषण, ब्रँड मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग अशा मुलखावेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठय़ा करिअर संधी निर्माण होत आहेत. त्याविषयी..
कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याविषयीची बरीच उत्सुकता पालकांना आणि विद्यार्थ्यांना असते. खरे तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची गरज ही असतेच. असं असलं तरी अमुक एका विशिष्ट क्षेत्रात लगेचच सोनेरी यश मिळेल याची खात्री तुम्हाला कुणीच देऊ शकत नाही. मात्र, मनुष्यबळ विकास क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार पुढील काही क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात-
= हवाई वाहतूक क्षेत्र :
या क्षेत्रात प्रवासी आणि ग्राहक सेवा क्षेत्रांत एक्झिक्युटिव्ह म्हणून संधी मिळू शकते. या व्यक्तींना विमानतळावरील विविध विभागांशी समन्वय साधावा लागतो. प्रवाशांच्या विविध समस्यांचे निराकरण करावे लागते. शिवाय प्रवाशांना विमानापर्यंत पोहोचवण्याचं आणि विमानतळी आणण्याचं कामही करावं लागतं. या क्षेत्रात उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार वेतन मिळत असलं तरी वार्षकि वेतन साधारणत: अडीच ते तीन लाखांपर्यंत असतं. शिवाय दरवर्षी १० टक्के वेतनवाढ मिळते. याशिवाय प्रत्येक विमान कंपनीचे काही विशेष भत्ते आणि सवलती-सुविधाही असतात. कोणत्याही विषयातील पदवीधर व्यक्ती या पदासाठी पात्र असतात. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि उत्तम संवादकौशल्य असल्यास या क्षेत्रात संधी मिळण्याची शक्यता अधिक असते.
= केबिन क्रू :
विमानातील प्रवासादरम्यान प्रवाशांची काळजी घेण्याचं व त्यांना वेळोवेळी सेवा पुरवण्याचं काम या व्यक्तींना करावं लागतं. प्रवाशांच्या सुरक्षेततेचीही काळजी घ्यावी लागते. त्यांना सुरक्षिततेच्या सूचना द्याव्या लागतात. आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या तरुण-तरुणींना या क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकतात. उत्तम संवादकौशल्य, इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या उमेदवारांना निवडीच्या वेळेस झुकते माप मिळू शकते. कोणत्याही विद्याशाखेतील बारावी अथवा पदवीधर युवावर्गाला ही संधी मिळू शकते. या क्षेत्रात वार्षकि वेतन चार लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं. वार्षकि वेतनवाढ १० ते १५ टक्के मिळत असून कंपन्यांनुसार भत्ते व इतर सोयी-सवलती मिळतात.
= बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र :
अतिशय झपाटय़ानं वाढत असलेल्या या क्षेत्रामध्ये रिलेशनशिप मॅनेजर, पर्सनल बँकर, करविश्लेषक अशा संधी मिळू शकतात.
रिलेशनशिप मॅनेजरला ग्राहकांना बँकेच्या विविध वित्तीय सेवांविषयी प्रभावीपणे माहिती द्यावी लागते. गुंतवणुकीच्या नावीन्यपूर्ण योजनांविषयी ग्राहकांना माहिती देऊन त्यांना या गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्याची कामगिरीही साध्य करावी लागते. विक्रीचं निश्चित केलेलं उद्दिष्ट त्यांना साध्य करायचं असतं. कोणत्याही विषयातील पदवी आणि मार्केटिंग/वित्त किंवा वित्तीय व्यवस्थापन विषयातील एमबीए असल्यास या क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी मिळू शकते. प्रारंभीचं वेतन साडेतीन लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं. मात्र, विक्रीच्या उद्दिष्टपूर्तीवर आधारित अधिक अथवा अतिरिक्त वेतनवाढ मिळू शकते. इतर वित्तीय लाभही दिले जातात.
= पर्सनल बँकर :
या व्यक्तीला ग्राहकांच्या व्यक्तिगत वित्तीय समस्यांचं निराकरण करावं लागतं. बँकेच्या दैनंदिन व्यवहारातही भूमिका बजावावी लागते. ग्राहक आणि बँकेमधील संपर्काचा महत्त्वाचा दुवा म्हणून यांची भूमिका महत्त्वाची ठरते. या व्यक्ती बँकेच्या व्यक्तिगत सेवेच्या दर्जाचा आधारस्तंभ असतात. पदवी आणि एमबीए असणाऱ्या व्यक्तींना या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. या क्षेत्रातील प्रारंभीचं वार्षकि वेतन तीन ते साडेतीन लाख रुपये असतं. व्यक्तिगत परिश्रमाच्या बळावर वरच्या टप्प्यावर पोहोचण्याची संधीही त्यांना मिळू शकते.
= कर विश्लेषक :
कॉर्पोरेट आणि उच्च श्रेणीतील ग्राहकांना कर विषयक सल्ला देण्यासाठी या व्यक्ती उपयुक्त ठरतात. कर भरणं, त्याचे संगणकीय अहवाल तयार करणं, करविषयक विविध बाबींची पूर्तता करणं ही कामेही या व्यक्तींना करावी लागतात. कोणत्याही विषयातील पदवी आणि एमबीए इन फायनान्स अर्हता प्राप्त केलेल्या व्यक्तींना या क्षेत्रात करिअर करता येतं. या क्षेत्रातील प्रारंभीचं वेतन सुमारे साडेतीन लाख रुपये ते साडेचार लाख रुपये असू शकतं. मात्र, संबंधित व्यक्तीचं विषयातील कौशल्य आणि गती बघून वेतनामध्ये तसेच विशेष भत्त्यांमध्ये वाढ होऊ शकते.
= व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग) :
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कंपनीच्या विविध उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेला प्रभावीपणे चालना द्यावी लागते. प्रतिस्पर्धी कंपनीच्या मार्केटिंग व्यूहनीतीला सक्षमपणे तोंड देणारी उपाययोजना करावी लागते. विक्रीचे उद्दिष्ट साध्य करणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांना सतत राबवावे लागतात. विक्रीच्या उद्दिष्टपूर्तीवर लक्ष केंद्रित करावं लागतं. कोणत्याही विषयातील पदवी आणि मार्केटिंग या स्पेशलायझेशन्समध्ये एमबीए प्राप्त उमेदवारांना या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. प्रारंभी वार्षकि वेतन अडीच लाख रुपये ते साडेतीन लाख रुपये मिळू शकतं. मात्र, विक्रीच्या उद्दिष्टपूर्तीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रोत्साहन भत्ते मिळू शकतात.
= ई-कॉमर्स :
या क्षेत्रात रिलेशनशिप अॅडव्हायझर स्वरुपाचे काम करण्याची संधी त्यांना मिळू शकते. ग्राहकांशी प्रभावीरीत्या संवाद साधत त्यांना कंपनीच्या संकेतस्थळावरून खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करावं लागतं. ग्राहकांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरं द्यावी लागतात. कोणत्याही विषयातील पदवीधर व्यक्तीला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. प्रारंभी तीन लाख ते साडेतीन लाख रुपये इतके वार्षकि वेतन मिळू शकते. दरवर्षी १० ते १५ टक्के वेतनवाढ मिळू शकते. इतर भत्तेही कंपनीच्या नियमांनुसार दिले जातात.
= ब्रँड मार्केटिंग :
या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला सोशल मीडियावर विविध कंपन्यांच्या ब्रँडचं महत्त्व प्रभावीरीत्या ठसवावं लागतं. या अनुषंगाने जाहिरात मोहीम राबवावी लागते. कोणत्याही विद्याशाखेतील पदवी आणि एमबीए इन मार्केटिंग अर्हता असणाऱ्या विद्यार्थ्यांना या करिअरमध्ये संधी मिळू शकते. हे तुलनेनं नवे क्षेत्र असूनही यात सुरुवातीला पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत वार्षकि वेतन मिळू शकते तसेच वेळोवेळी इतर भत्तेही मिळतात. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना वार्षकि वेतनवाढ मिळते.
= ग्राफिक डिझायिनग :
यात जाहिरात संकेतस्थळ/ पोर्टलचं डिझायिनग, देखभाल, नूतनीकरणाचं काम करावं लागतं. जाहिरातीच्या आणि संकेतस्थळाच्या प्रसिद्धीसाठी माहितीपुस्तिकेचं डिझाइन करावं लागतं. ग्राफिक डिझायिनगमधील पदवी किंवा पदविका अर्हता प्राप्त करणाऱ्या व्यक्तींना या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. या क्षेत्रात सुरुवातीला दीड लाख ते अडीच लाख रुपये वार्षकि वेतन मिळू शकतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा