व्यवस्थापन क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेत काही संस्थांनी बारावीनंतर पाच वर्षांचा व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याविषयी..

व्यवस्थापन विद्याशाखेचे वाढते महत्त्व लक्षात घेता बारावीनंतर थेट एमबीए अभ्यासक्रम शिकणे शक्य बनले आहे. व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाच वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाकडे वळायला हरकत नाही.
दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने नाव कमावले आहे. या संस्थेच्या इंदूर शाखेने पाच वर्षे कालावधीचा व्यवस्थापन शाखेचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या संस्थेची स्थापना केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने १९९६ साली केली. व्यवस्थापन शाखेतील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ असा दर्जा संस्थेला बहाल करण्यात आला आहे.
हा अभ्यासक्रम इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (आयपीएम) या नावाने ओळखला जातो. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या तीन वर्षांत व्यवस्थापन शाखेसाठी आवश्यक असणाऱ्या संकल्पनांचा मूलभूत पाया पक्का केला जातो. पुढील दोन वर्षांत या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CAT) द्वारे प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसमवेत व्यवस्थापन शाखेचा मुख्य अभ्यासक्रम शिकवला जातो.
इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही संस्था स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेते.
अर्हता- खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही विद्याशाखेतून बारावीमध्ये आणि दहावीमध्ये ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही शाखेतील बारावीमध्ये आणि दहावीमध्ये ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांचे वय २० वर्षांपेक्षा आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांचे वय २२ वर्षांपेक्षा कमी नसावे. ही किमान अर्हता प्राप्त केलेल्या सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत घेण्यात येणारी अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट द्यावी लागेल. ही टेस्ट मुंबई, दिल्ली, कोलकता, बेंगळुरू, इंदूर आणि हैदराबाद या केंद्रांवर दर वर्षी मे महिन्यात घेण्यात  येते.
अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केली जाते. मुलाखत मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेण्यात येते. या मुलाखती, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, इंदूर आणि हैदराबाद या केंद्रांवर घेतल्या जातील. मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य, सामान्य अध्ययन, मुद्दा ठामपणे मांडण्याचे कौशल्य आदी बाबींची चाचणी तज्ज्ञांकडून केली जाते.
विद्यार्थ्यांची अंतिम निवड अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टसाठी ६० टक्के आणि मुलाखतीसाठी ४० टक्के असे गुणांचे विभाजन ठरलेले आहे.
पत्ता- अ‍ॅडमिशन ऑफिस, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, राऊ- पितमपूर रोड, इंदूर- ४५३५५६.
वेबसाइट- http://www.iimidr.ac.in  
ईमेल- ipmadmissions@iimid.ac.in
*    फूटवेअर डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट
फूटवेअर डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ही संस्था केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम असणारी संस्था आहे. पादत्राणे निर्मिती आणि डिझाईनचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी ही दर्जेदार संस्था समजली जाते. या संस्थेच्या शाखा नॉयडा, रायबरेली, चेन्नई, रोहतक, िछदवाडा, कोलकाता आणि जोधपूर येथे आहेत.
या संस्थेने बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए- एमबीए) हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत नॉयडा कॅम्पसमध्ये ६० विद्यार्थ्यांना आणि रोहतक कॅम्पसमध्ये ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर ऑनलाइन निवडचाचणी घेतली जाते. महाराष्ट्रातील केंद्रे- मुंबई. अर्ज करण्याची अंतिम तारीख-१५ मे २०१५. परीक्षा- १३ ते १६ जून.
पत्ता- फूटवेअर डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट, नॉयडा- २०१३०१. वेबसाइट- http://www.fddiindia.com
 ई-मेल- admission@fddindia.com
*    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
महाराष्ट्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्रवेश जागा- ३० या अभ्यासक्रमाला विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावीमध्ये
५० टक्के गुण आवश्यक. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना
४५ टक्के गुण आवश्यक. पत्ता- रजिस्ट्रार स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सटिी, नांदेड. वेबसाइट- http://www.srtmun.ac.in
ईमेल- resgistrar@srtmum.ac.in
*    जिंदाल ग्लोबल बिझनेस स्कूल
जिंदाल ग्लोबल बिझनेस स्कूल या संस्थेने बीबीए-एमबीए हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
अर्हता- विद्यार्थी कोणत्याही शाखेतील बारावीत  ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाचणी घेतली जाते.
पत्ता- जिंदाल ग्लोबल बिझनेस स्कूल, जगदीशपूर व्हिलेजवळ, सोनिपत, हरियाणा- १३१००१.
वेबसाइट- http://www.jgbs.edu.in
*    बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी
या संस्थेने इंटिग्रेटेड मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण. बारावीमध्ये इंग्रजी विषयात ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. प्रवेश प्रक्रिया- बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचा विचार केला जातो. प्रवेशजागा : अलाहाबाद कॅम्पस- ६०, जयपूर- ६०, कोलकाता- ९०, नॉयडा- ८०, रांची- १०० मुलगे आणि १०० मुली.
पत्ता- डीन, अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड अ‍ॅकेडमिक को-ऑíडनेशन, बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, एक्स्टेन्शन सेन्टर, लालपूर-८३४००१ झारखंड. वेबसाइट- http://www.bitmesra.ac.in
ईमेल- bitlalpur@bitmesra.ac.in
*    गीतम युनिव्हर्सिटी
गीतम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा बीबीए-एमबीए हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जातो.
पत्ता- गीतम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, ऋषीकोडा, विशाखापट्टणम- ५३००४५. वेबसाइट- http://www.gitam.edu
ईमेल- admissions.gim@gitam.in

नया है यह!
सर्टििफकेट कोर्स इन इंटलेक्चुएल प्रॉपर्टी राइट्स अ‍ॅण्ड इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी इन द इंटरनेट एज-
हा ऑनलाइन अभ्यासक्रम नवी दिल्ली येथील इंडियन लॉ इन्स्टिटय़ूटने सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवीधर. पत्ता- भगवानदास रोड, नवी दिल्ली- ११०००१.
वेबसाइट- http://www.ili.ac.in   ईमेल- e_ipr@ili.ac.in

सुरेश वांदिले – ekank@hotmail.com