मानसशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची ओळख आणि मानसशास्त्राचे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संस्थांची माहिती-
मानसशास्त्रात मानवी वर्तणूक आणि भावभावना यांचा पद्धतशीर अभ्यास केला जातो. इतरांच्या मानसिक समस्यांवर उपचार करताना औषधांपेक्षा संबंधित रुग्णाची मानसिकता आणि भावभावना यांचा विचार केला जातो. यात समुपदेशनावर भर देऊन रुग्णाच्या विचारप्रक्रियेत सकारात्मक बदल घडवला
जातो. मानसोपचारतज्ज्ञांना वैद्यकीय शिक्षणाची पाश्र्वभूमी
आवश्यक नसते.
बारावीनंतर मानसशास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. त्यानंतर पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. अशी शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करता येते. काही विद्यापीठांमध्ये तीन वष्रे कालावधीच्या पदवी स्तरावरील विषयांमध्ये एक विषय मानसशास्त्र असतो. या विषयात एम.ए. पदवी घेताना स्पेशलायझेशन करता येते. मानसशास्त्र विषय घेऊन पदवी स्तरावरील अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन (कौन्सेिलग) च्या पदव्युत्तर पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. या क्षेत्रात संशोधन करू इच्छिणारे विद्यार्थी तीन वर्षांत पीएच.डी. अथवा एम.फिल करू शकतात. स्पेशल एज्युकेशन अथवा मेंटल रिटार्डेशन या विषयातील एक वर्ष कालावधीचे पदविका अभ्यासक्रमसुद्धा त्यांना करता येऊ शकतात.
हे शास्त्र मानवी भावनांशी संबंधित असल्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये संयम, संवादकौशल्य असणे आवश्यक आहे. रुग्णांच्या मानसिक वेदनांचा प्रामाणिकपणे शोध घेण्यासाठी लागणारी तीव्र इच्छा हा गुण महत्त्वाचा ठरतो. मानसशास्त्राच्या अभ्यासात वैचारिक प्रक्रिया, शिक्षण, स्वीकार, स्मरण-विस्मरण, मानसिक जडघडण, विकृती, मुलांचा विकास, सामाजिक नातेसंबंध आणि व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम यांचा समावेश केला जातो. या शास्त्रातील सिद्धांतांचा आणि संख्याशास्त्राचा उपयोग करून शिक्षण, समाज, औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या वर्तनाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते.
मानसशास्त्रामध्ये विविध प्रकारे स्पेशलायझेशन करता येते. यामध्ये सामाजिक मानसशास्त्र, मुलांचे मानसशास्त्र, व्यवसायाशी निगडित मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र आदी शाखांचा समावेश आहे. या तज्ज्ञांना व्यवस्थापन, शिक्षण, कायदा आणि क्रीडा या क्षेत्रांत करिअरच्या संधी मिळू शकतात.
विविध शाखा
= वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ- हे तज्ज्ञ रुग्णालय, आरोग्य केंद्र, समुपदेशन केंद्र आदी ठिकाणी काम करतात. भावनिकदृष्टय़ा आणि आजारामुळे त्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम करतात. = समुपदेशन मानसशास्त्र- या विषयातले तज्ज्ञ रुग्णाच्या मानसिक समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर उपाय सुचवतात. = सामाजिक मानसशास्त्र- या विषयातील तज्ज्ञ विविध प्रकारच्या सामाजिक संस्थांच्या संशोधन कार्यात साहाय्य करतात. विविध सामाजिक वातावरणांतील मानवी वर्तणुकीचा अभ्यास करतात. = शैक्षणिक मानसशास्त्र- या शाखेतील तज्ज्ञ शाळा-महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्था याकरता सेवा देतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वर्तणूक समस्यांचे निराकारण करतात. शिवाय शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम सुचवतात. = औद्योगिक मानसशास्त्र- या शाखेतील तज्ज्ञ शासन, कारखाने, व्यवसायाशी संबंधित मानसशास्त्रीय समस्यांचे निराकारण करतात. या द्वारे कार्यालयीन कामकाजातील गुणवत्तेत तसेच संबंधितांच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी विविध उपाययोजना सुचवतात. = संशोधन मानसशास्त्र- या शाखेतील तज्ज्ञ व्यक्तीच्या सामाजिक, भौतिक आणि भावनिक वर्तणूकीचा आणि त्यातील सामाजिक जाणिवांचा शोध घेतात. या शाखेतील तज्ज्ञ प्रयोगशाळेत विविध प्रयोग आणि परीक्षण करतात. यामध्ये मुलाखती, प्रश्नसंचिका, सर्वेक्षण आदी साधनांचा समावेश असतो. हे तज्ज्ञ व्यक्तीच्या प्रेरणा, विचार, शिक्षण, स्मरणशक्ती आदींचा अभ्यास करतात. = विकासशील मानसशास्त्र- या शाखेतील तज्ज्ञ मानसिक,   सामाजिक आणि ज्ञानाच्या विकासाचा अभ्यास करतात. या शाखेतील स्पेशलायझेशनमध्ये बाळंतपणाच्या काळातील महिलांची वर्तणूक, बालपण, पौगंडावस्थेतील वर्तणूक किंवा वृद्धापकाळातील बदल आदींचा समावेश होतो. = क्रीडा मानसशास्त्र- हे तज्ज्ञ खेळाडूंच्या मानसिक समस्यांचे निराकरण करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी साहाय्य करतात.
मानसशास्त्र शिकवणाऱ्या संस्था  –
=    सेंट झेवियर स्वायत्त महाविद्यालय. मुंबई- ४००००१.
    वेबसाइट- http://www.xaviers.edu
=    एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई-४०००२०.
    वेबसाइट-  http://www.sndt.ac.in
=    रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा, मुंबई- ४०००१९.
    वेबसाइट- http://www.ruiacollege.edu
=    डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड सायकॉलॉजी, मुंबई विद्यापीठ, कालिना. या संस्थेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात क्लिनिकल सायकॉलॉजी, कौन्सेिलग सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी आणि सोशल सायकॉलॉजी या विषयांत स्पेशलायझेशन करता येते. येथे पीएच.डी. करण्याची सुविधा उपलब्ध आहे तसेच अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन कौन्सेिलग सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन क्लिनिकल सायकॉलॉजी आणि अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन इंडस्ट्रियल सायकॉलॉजी उपलब्ध आहेत. कालावधी- एक वर्ष. अर्हता- मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी. संबंधित विषयात स्पेशलायझेशन असल्यास प्राधान्य मिळू शकते. वेबसाइट- http://www.mu.ac.in
=    मुंबईतील रुपारेल, कीर्ती, के. जे. सोमैया आणि जयिहद या महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू आहे.
=    सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालय, पुणे.
=    फग्र्युसन कॉलेज, पुणे- या संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात इंडस्ट्रियल सायकॉलॉजी आणि क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयात स्पेशलायझेशन करता येते. या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कौन्सेिलग सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
    वेबसाइट- http://www.fergusson.edu
=    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजीमध्ये एमए आणि पीएच.डी. करण्याची सोय आहे.  वेबसाइट-  http://www.unipune.ac.in
=    नागपूर विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजीमध्ये एमए आणि पीएच.डी. करण्याची सोय आहे.   
    वेबसाइट- http://www.nagpurunivercity.org
=    हिस्लॉप कॉलेज, नागपूर येथे बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रम करण्याची सोय आहे.
    ईमेल- principal@hislopcollege.ac.in
=    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजीमध्ये एम.ए. आणि पीएच.डी. करता येते.
    ईमेल- head.psychology@bamu.net
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा