ग्रेट ब्रिटन :
युरोपीय देशांमध्ये जर्मनी, फ्रान्स आणि इटलीनंतर ग्रेट ब्रिटन हा चौथा महत्त्वाचा देश आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये ऑस्टीन, मॉरिश, रोल्स राइस या प्रमुख गाडय़ांचे उत्पादन होते. ब्रिटिश लेलँड, फोर्ड, जनरल मोटर्स, ब्रिटिश मोटार कॉर्परेरेशन, या मोटारगाडय़ा निर्मितीच्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत.
जगातील प्रमुख खंडांतर्गत लोहमार्ग  
   खंडातून जाणाऱ्या आणि खंडाच्या दोन टोकांना जोडणाऱ्या लोहमार्गाना ‘खंडांतर्गत लोहमार्ग’ असे म्हणतात.
१) कॅनेडिअन पॅसिफिक लोहमार्ग/ ट्रान्स कॅनेडिअन लोहमार्ग : कॅनडातील हा महत्त्वाचा लोहमार्ग आहे. कॅनडाच्या दक्षिण भागातून जाणाऱ्या या लोहमार्गाची लांबी ५,६०० किमी आहे. हा लोहमार्ग कॅनडाच्या पूर्व किनारपट्टीवरील हॅलिफॅक्स बंदरापासून पश्चिमेकडील पॅसिफिक महासागर किनारपट्टीच्या व्हॅन्कुव्हर बंदरापर्यंत जातो. १८८६ साली हा लोहमार्ग तयार करण्यात आला. या मार्गात क्विबेक- माँट्रिअल- ओटावा- विनिपेग- मॅडिसन- कॅलगरी- व्हायकिंग हॉर्स ही प्रमुख स्थानके आहेत.
२) कॅनेडियन नॅशनल लोहमार्ग :
हा लोहमार्ग कॅनडाच्या अटलांटिक किनाऱ्यावरील हॅलिफॅक्स बंदरापासून पश्चिमेकडील पॅसिफिक किनाऱ्याजवळील व्हॅन्कुव्हर बंदरापर्यंत जातो. क्विबेक- माँट्रियल- विनिपेग- एडमंटन ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके आहेत.
३) ट्रान्स सबेरियन लोहमार्ग :
जगातील सर्वात जास्त लांबीचा हा लोहमार्ग रशियात आहे.  १९०५ साली हा मार्ग पूर्ण झाला. रशियातील पश्चिमेकडील लेनिनग्राडपासून (सेंट पीटर्सबर्ग) पूर्व किनाऱ्याच्या व्हॅलिडिव्होस्टॉकपर्यंत जाणाऱ्या या लोहमार्गाची लांबी
९३३२ किमी. आहे. ट्रान्स सबेरियन लोहमार्गाला ‘रशियाची जीवनरेषा’ म्हणतात. या मार्गावरील प्रमुख स्थानके मॉस्को- गोर्की- ओम्स्क- नोवोसिबिस्र्क- व्हॅलिडिवोस्टॉक आहेत.
अंतर्गत जलमार्ग सेंट लॉरेन्स जलमार्ग :
संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आलेल्या सेंट लॉरेन्स जलमार्गामुळे पंचमहासरोवरे सेंट लॉरेन्स नदीमार्फत अटलांटिक महासागराला जोडलेली आहेत.
सागरी जलमार्ग उत्तर अटलांटिक सागरी मार्ग :
हा जगातील सर्वात रहदारीचा आणि जास्तीत जास्त मालवाहतूक करणारा जलमार्ग आहे. या जलमार्गामुळे उत्तर अमेरिकेच्या पूर्व व ईशान्य किनारपट्टीवरील प्रदेश आणि पश्चिम युरोपातील प्रगत देश परस्परांना जोडले गेले आहेत. जगातील सुमारे २५ टक्के व्यापार या सागरी मार्गाने होतो.
भूमध्य सुएझ कालवा :
उत्तर अटलांटिक मार्गाच्या खालोखाल सुएझ मार्गावर सागरी वाहतूक सर्वाधिक होते. कालव्याची लांबी १६० किमी तर रुंदी ६५ मीटर आहे. या कालव्याच्या मुखाशी तांबडय़ा समुद्रातील पोर्ट सय्यद व सुएझ ही दोन बंदरे जोडली गेलेली आहेत. सुएझ कालव्यामुळे युरोप व आशियातील अंतर केप ऑफ गुड होप मार्गाच्या तुलनेत ८ हजार किमीने कमी झालेले आहेत. मात्र, हा कालवा अरुंद असल्याने मोठय़ा सागरी नौका येथून जाऊ शकत नाहीत.
पनामा कालवा :
पनामा कालव्यामुळे अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडले गेले आहेत. कालव्याच्या अटलांटिक किनाऱ्यावर कोलोन तर पॅसिफिक किनाऱ्यावर पनामा ही बंदरे आहेत. पनामा कालव्याची लांबी ८० किमी आणि रुंदी १८० ते ३३० किमी आहे. या कालव्यामुळे अमेरिकेच्या अटलांटिक व पॅसिफिक किनाऱ्यामधील अंतर कमी झालेले आहे. पनामा कालव्यामुळे संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, संयुक्त संस्थाने ते जपान हे अंतर कमी झाले आहे.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com