नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल या घटकात जागतिक भूगोलाचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना जगाचा नकाशा जवळ बाळगणे आवश्यक आहे आणि वेळ मिळेल तेव्हा जगाच्या नकाशात महत्त्वाची शहरे, डोंगररांगा, नदीप्रणाली तसेच वृत्तपत्रांत उल्लेखलेले एखादे शहर पाहावे, म्हणजे अभ्यास लक्षात ठेवणे सोपे होते. जगाचा अभ्यास खंडांनुसार करणे सोपे असते. उदा. आशिया खंड अभ्यासताना आशिया खंडातील देश, तेथील डोंगररांगा, नदीप्रणाली, हवामान वैशिष्टय़, या खंडात आढळणारी खनिज संपत्ती व येथील वाहतूकप्रणाली असा अभ्यास केल्यास अभ्यास सोपा होतो. आज आपण युरोप खंड अभ्यासणार आहोत.
युरोप : युरोप हा जगातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेला खंड आहे. त्याच्या उत्तरेला बेरेन्टस समुद्र, पश्चिमेला अटलांटिक महासागर आणि दक्षिणेला भूमध्य समुद्र आहे. ग्रेट ब्रिटन, आयलँड आणि आइसलँड ही युरोपातील प्रमुख बेटे आहेत याशिवाय ओर्कने, शेटलँड, फेरोस, सिसिली, साíडना इ. अन्य लहान बेटे आहेत.
युरोप खंडातील महत्त्वाच्या नद्या :
= पो नदी : ही इटलीमधून वाहणारी नदी असून या नदीच्या किनाऱ्यावर व्हेनिस शहर वसलेले आहे.
= तिबर नदी : ही नदी इटलीतून वाहते. रोम शहर या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
= ऱ्होन नदी : ही नदी स्वित्र्झलडमधील जिनिव्हा सरोवरातून वाहत पुढे भूमध्य सागराला जाऊन मिळते.
= डॅन्युब नदी : ही जगातील एकमेव नदी आहे जी आठ देशांमधून वाहते. मध्य युरोपातून वाहत जाऊन पुढे काळ्या समुद्राला जाऊन मिळते. या नदीकिनारी व्हिएन्ना, बुडापेस्ट, बेल्ग्रेड आदी शहरे वसलेली आहेत.
= व्होल्गा नदी : ही युरोपातील सर्वात लांब नदी आहे. (३६९० कि.मी.)
युरोप खंडातील महत्त्वाचे देश :
= स्कॅडिनेव्हियन देश : युरोपातील आइसलँड, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क या देशांना ‘स्कँडिनेव्हियन देश’
असे म्हणतात.
= फिनलँड : फिनलँड हा (रशिया वगळता) युरोपातील पाचव्या क्रमाकांचा देश आहे. इमारत लाकूड आणि कागद उत्पादनात फिनलँड आघाडीचा उत्पादक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठय़ा प्रमाणावर वनोद्योगावर अवलंबून आहे. लाकडाची प्रक्रिया, लाकडाचा लगदा आणि कागद बनवणे हा येथील महत्त्वाचा उद्योग आहे. सरोवरांचा आणि बेटांचा देश असेही फिनलँडचे वर्णन केले जाते. फिनलँडची राजधानी हेलसिंकी आहे.
= आइसलँड : ग्रेट ब्रिटननंतर आइसलँड हे युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. उत्तर अटलांटिक महासागरात आíक्टक वर्तुळाच्या दक्षिणेला लगेच असलेले हे बेट नॉर्वेच्या पश्चिमेला आहे.
= नॉर्वे : या देशाचा उल्लेख ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा देश’ असा केला जातो. उत्तर समुद्रामुळे ब्रिटन आणि नॉर्वे एकमेकापासून अलग झालेले आहेत. या देशात कोळसा, खनिज तेल अत्यल्प प्रमाणात सापडत असल्याने या देशात जलविद्युत शक्तीचा वापर केला आहे. राजधानी ओस्लो हे नॉर्वेतील महत्त्वाचे बेट आहे. नॉर्वेच्या उत्तरेला लोफोटन द्वीपसमूह असून येथे मोठय़ा प्रमाणावर कॉड माशांची शिकार होते.
= स्वीडन : स्वीडन हा सर्वात मोठा स्कॅन्डिनेव्हियन देश आहे. स्वीडनमधील प्रमुख नद्यांचा उगम वायव्येकडील पर्वतश्रेणींमध्ये होतो आणि त्या दक्षिणेला बोयानियाच्या आखाताला मिळतात. स्वीडनची ५५ टक्के भूमी वनाच्छादित असून दक्षिण स्वीडनमधील वनात बीच, ओक आणि अन्य पानगळीचे वृक्ष आढळतात. स्वीडनमधील किरूना आणि गॅलिव्हरा या ठिकाणी उच्च प्रतीचे मॅग्नेटाइट या प्रकारचे लोखंडाचे साठे आढळतात. राजधानी स्टॉकहोम आहे.
= डेन्मार्क : डेन्मार्कच्या पश्चिमेला उत्तर समुद्र व आग्नेयेला बाल्टिक समुद्र आहे. ग्रीनलँड जगातील सर्वात मोठे बेट व फेरो बेट डेन्मार्कच्या ताब्यात आहे. डेन्मार्कचे हवामान समशीतोष्ण प्रकारचे आहे. डेन्मार्कची अर्थव्यवस्था प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, लोणी, चीज तसेच खारवलेले मांस यांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन असून हे प्रमुख औद्योगिक केंद्र व मुख्य बंदर आहे.
(भाग पहिला)
डॉ. जी. आर. पाटील- grpatil2020@gmail.com
एमपीएससी : जगाचा भूगोल
नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल या घटकात जागतिक भूगोलाचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे.
आणखी वाचा
First published on: 04-04-2015 at 02:39 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta mpsc guidence