महाराष्ट्रातील जांभा मृदा :
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्य़ात आणि सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा माती आहे. गडचिरोलीच्या पूर्व भागातही जांभा माती आढळते.
पिके : जांभा मृदा जरी साधारण सुपीक असली तरी तिची सुपीकता दख्खनच्या पठारावरील काळ्या मातीपेक्षा कमी असते. या मातीपासून कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रामुख्याने फळबागांची लागवड मोठय़ा प्रमाणात केलेली आहे. रत्नागिरीमधील हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्याची निर्यातीतून परकीय चलन प्राप्त होते. याशिवाय काजू, चिक्कू वगरे फळझाडांचे उत्पादन मिळते.
तांबडी माती :
प्रदेश : तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.
गुणधर्म : तांबडय़ा मातीत सेंद्रिय घटक आणि नायट्रोजनचा अभाव असतो. त्यात मॅग्नेशिअम, लोह, अॅल्युमिनिअम संयुगे आढळतात. या मातीचा रंग त्यात असलेल्या लोहाच्या अंशामुळे लाल, तांबूस किंवा पिवळसर दिसतो.
पिके : पाणी व खतांचा योग्य पुरवठा केल्यास या मातीत विविध प्रकारची पिके घेता येतात. नाचणी, भात, तंबाखू, भाजीपाला या पिकांना ही माती अधिक उपयुक्त आहे. या मातीत भुईमूग, ऊस, रताळी यांची लागवड केली जाते.
महाराष्ट्रातील तांबडी व पिवळसर माती :
महाराष्ट्रातील अतिशय जुन्या अशा िवध्ययन आणि कडाप्पा तसेच आíकयनकालीन गॅ्रनाइट व नीस खडकांवर विदारण क्रिया होऊन तांबडी माती तयार झालेली आहे. महाराष्ट्रातील तांबडी व पिवळसर माती मर्यादित प्रदेशात पसरलेली आहे. सहय़ाद्रीच्या पर्वतमय भागात विशेषत: उत्तर कोकणालगत तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर माती आढळते.
पर्वतीय मृदा :
हिमालयाच्या पर्वतरांगा, सह्य़ाद्रीचा घाटमाथा, पूर्व घाट आणि द्वीपकल्पीय भारताच्या अरण्याच्या प्रदेशात ही माती आढळते. दगड-गोटय़ांच्या मिश्रणातून पर्वतीय व डोंगराळ प्रदेशातील माती तयार झालेली असते. उत्तराखंडातील तराईच्या भागात अरण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे येथे पर्वतीय माती आढळते. या जमिनीत पोटॅश, फॉस्फरस आणि चुनखडीचे प्रमाण कमी असते. चांगल्या उत्पन्नासाठी जमिनीला खतांचा पुरवठा करावा लागतो. अरण्यांचे प्रकार जास्त असल्याने जमिनीला सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा होतो. चहा, कॉफी, फळझाडे, मका, गहू, बार्ली यांच्या लागवडीसाठी ही जमीन पोषक आहे.
वाळवंटी मृदा :
अतिउष्णता, कोरडे हवामान, अत्यल्प पर्जन्य यामुळे प्रदेशातील खडकांचे अपक्षय होऊन वाळू व रेती तयार होते. राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.
गुणधर्म : या मातीत विरघळलेले क्षार अधिक प्रमाणात असतात. हय़ुमसचे प्रमाण कमी असते. ओलावा धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, फॉस्फेटचे प्रमाण जास्त असते, परंतु नायट्रोजनचे प्रमाण कमी असते.
पिके : कृत्रिम जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध केल्यास या जमिनीतून विविध पिके घेता येतात.
किनाऱ्याची गाळाची मृदा :
कोकणामधून वाहणाऱ्या नद्यांच्या प्रवाहाबरोबर आणलेला गाळ या प्रदेशात पसरतो. खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात. ही मृदा कोकणात उत्तर-दक्षिण दिशेने किनारपट्टीलगत असून अतिशय चिंचोळ्या प्रदेशात आढळते. ही माती वाळुमिश्रित लोम प्रकारची आढळते. या मातीत प्रामुख्याने तांदळाचे पीक घेतले जाते, तसेच किनाऱ्यालगतच्या प्रदेशात नारळ- पोफळीच्या बागा आढळतात.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com
एमपीएससी : महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्य़ात आणि सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा माती आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-04-2015 at 09:17 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta mpsc guidence