मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण एमपीएससी परीक्षे संदर्भात माहिती जाणून घेतली. दरम्यानच्या काळात राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल लागला, तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जे विद्यार्थी यशस्वी झाले, त्यांचे मनापासून हार्दकि अभिनंदन! ज्यांना प्रयत्न करून यश प्राप्त झाले नाही, त्यांनी निराश होण्याचे कारण नाही, त्यांनी आपला अभ्यास तसाच पुढे सुरू ठेवावा. गांभीर्यपूर्वक प्रयत्न करूनही दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नानंतर अपयश आले, तर अनेकदा विद्यार्थ्यांना त्याचे कारण लक्षात येत नाही. खरे तर स्पर्धापरीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक घटकांची गरज असते. स्पर्धापरीक्षेतील यशासाठी वेळेच्या योग्य नियोजनाची आवश्यकता असते. स्पर्धापरीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की- ‘If we fail to plan, we plan to fail.l’.’
स्पर्धापरीक्षेच्या यशासाठी दररोज किती तास अभ्यास करायला हवा, याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, स्पर्धापरीक्षेत यश मिळवण्यासाठी १५ ते १६ तास अभ्यास करावा लागतो तर काहींच्या मते आठ ते दहा तासांचा अभ्यास पुरेसा ठरतो. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, आपण किती वेळ अभ्यास केला, यापेक्षा तो किती परिणामकारक पद्धतीने केला याला जास्त महत्त्व आहे. अभ्यास करण्याच्या तंत्रातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वाना आपला प्राइम टाइम म्हणजे दिवसातील आपला उत्साहाचा काळ ओळखता यायला हवा. प्रत्येक माणसागणिक हा उत्साहाचा वेळ बदलत जातो. काहींसाठी सकाळचे एक-दोन तास अत्यंत उत्साहाचे असतात तर काहींसाठी संध्याकाळचा वेळ उत्साहाचा असू शकतो. जर या उत्साहाच्या वेळी अवघड वाटणारे विषय किंवा किचकट वाटणारे घटकविषय वाचले तर आपल्याला सर्वाधिक फायदा होईल.
जर आपण आताच स्पर्धापरीक्षेच्या तयारीला सुरुवात केली असेल तर एका विषयाचे पुस्तक हातात घेतले तर ते संपवल्यानंतरच दुसरे पुस्तक वाचायला सुरुवात करा. उदाहरणार्थ- जर क्रमिक पुस्तकांचे वाचन सुरू केले तर इयत्ता पाचवीची सर्व पुस्तके, नंतर सहावीची, नंतर सातवीची असा वाचनाचा क्रम ठेवू नये. जर भूगोलाचे पुस्तक वाचत असाल तर पाचवी ते दहावीपर्यंतची सर्व भूगोलाची पुस्तके वाचून संपवा. त्यानंतरच दुसऱ्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करा. यामुळे तो विषय तुकडय़ातुकडय़ात न समजता त्याचा आवाका लक्षात यायला मदत होते.
वेळेच्या व्यवस्थापनात वाचन, लेखन आणि उजळणी आवश्यक आहे. समजा, आपण एखादा विषय वाचला असेल तर त्यातील काही मुद्दे एका कागदावर लिहून ठेवा. त्या विषयाची उजळणी करताना त्रोटक स्वरूपातील हे मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचे पेपर पाहिल्यास परीक्षेत एका दिवशी दोन पेपर द्यावे लागतात. अशा वेळी परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याकडे असलेल्या स्वत:च्या हस्ताक्षारातील त्रोटक मुद्दय़ांच्या या नोट्स उपयोगी ठरतात. यूपीएससीचा जो सुधारित अभ्यासक्रम आहे, त्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययनाचा एकेक पेपर असंख्य घटक-उपघटकापासून बनलेला आहे. परीक्षेच्या शेवटच्या कालावधीत पुस्तकाचे वाचन करणे शक्य होत नाही, म्हणून सुरुवातीपासून आपण काही मुद्दे संक्षिप्त स्वरूपात लिहून ठेवले तर त्यांची उपयुक्तता परीक्षेच्या कालावधीत लक्षात येते. एखादा घटक वाचल्यानंतर आपण काय वाचले याचे मनन करणे आवश्यक आहे, तसेच आपण काढलेल्या नोट्स वेळोवेळी पुन्हा वाचून त्यातील मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धापरीक्षेच्या यशासाठी वाचन, लेखन आणि उजळणी या त्रिसूत्रीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धापरीक्षेला दरवर्षी साधारणत: १३ ते १४ लाख विद्यार्थी बसतात. महाराष्ट्रात स्पर्धापरीक्षांबाबत मोठी जागरूकता झाल्याने मोठी चढाओढ असते. हे लक्षात घेत या परीक्षेच्या तयारीला जेवढय़ा लवकरात लवकर सुरुवात कराल, तेवढी यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. जर आपण पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षांला असाल आणि तेव्हापासून तयारी सुरू केली तर अभ्यासासाठी जास्त वेळ मिळतो आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, जर पदवीनंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे वळायचे ठरवलेत तर किमान एक वर्ष तरी या परीक्षांच्या तयारीला पूर्णपणे द्यावे.
वेगवेगळ्या विद्याशाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. त्यामुळे परीक्षेतील विशिष्ट विषय त्या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना सोपे वाटतात, तर काही कठीण वाटतात. कठीण वाटणाऱ्या विषयांची तयारी कशी करावी, हे उद्याच्या अंकात समजून घेऊयात.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com
एमपीएससी : स्पर्धापरीक्षा व वेळेचे व्यवस्थापन
मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण एमपीएससी परीक्षे संदर्भात माहिती जाणून घेतली. दरम्यानच्या काळात राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल लागला,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-04-2015 at 08:48 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta mpsc guidence