दूरसंवेदन (Remote Sensing)) भाग- १
राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर १ मध्ये भूगोल घटकाच्या अंतर्गत दूरसंवेदन हा उपघटक येतो. या उपघटकाची तयार करताना सर्वप्रथम संकल्पना समजून घ्याव्यात.  दूरसंवेदनासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांच्या अभ्यासासाठी इंटरनेटची मदत घेता येईल.   ‘एनसीईआरटी’च्या  प्रात्यक्षिक भूगोलातील दूरसंवेदन हा स्वतंत्र घटक अभ्यासावा. दूरसंवेदन हा उपघटक राज्यसेवा मुख्य परीक्षेप्रमाणे यूपीएससीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. यूपीएससी परीक्षेत विज्ञान घटकांतर्गत हा उपघटक येतो.
दूरसंवेदन : कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता, त्यासंबंधी माहिती मिळवणे म्हणजे दूरसंवेदन. आपण जेव्हा एखाद्या कॅमेऱ्याने फोटो घेतो तेव्हा तोही दूरसंवेदनाचाच एक प्रकार आहे. अशा प्रकारे पृथ्वीवरील माहिती संकलित करण्यासाठी दूरसंवेदनाच्या माध्यमातून ज्या उपग्रहांची मदत घेतली जाते, त्यांना सुदूर संवेदी उपग्रह ((Remote Sensing Satellites) असे म्हणतात. दूरसंवेदन तंत्रामुळे भौगोलिक, भूगर्भविषयक, सागरविषयक, हवामान व पर्यावरणविषयक माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे.
दूरसंवेदन तंत्राची वैशिष्टय़े / उपयोग :
=    पृथ्वीवरील वस्तूंनी परावर्तित केलेल्या, पसरवलेल्या किंवा पुनर्परावर्तित केलेल्या सूर्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांच्या मोजमापावरून आकलन होते. इलेक्ट्रो-मॅग्नेटिकपट्टय़ातील दृश्य प्रकाश, इन्फ्रारेड किरण आणि मायक्रोवेव्ह किरणांचा त्यासाठी वापर केला जातो.
=    दूरसंवेदनासाठी विमान व कृत्रिम उपग्रहांचा वापर
केला जातो.
=    १९९० नंतर मानवरहित दूरसंवेदनाची सुरुवात झाली.
=    दूरसंवेदनामार्फत मिळवलेल्या माहितीचा वापर लगेच केला जात नाही. ती माहिती सर्वप्रथम  मुख्य स्थानकाकडे पाठवली जाते, तिथे त्याचे विश्लेषण होते आणि नंतर ती माहिती उपयोगात आणली जाते.
=    हवाई छायाचित्रणापेक्षा उपग्रहाद्वारे केले जाणारे भूसर्वेक्षण आíथकदृष्टय़ा स्वस्त असल्यामुळे अलीकडच्या काळात त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे.
=    दूर संवेदनामार्फत मिळणारी माहिती मानवी हस्तक्षेपाशिवाय असते तसेच विश्वासार्ह असते.
=    टोपोशिट तयार करण्यासाठी (नकाशा) दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा वापर होतो.
=    भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठांतर्गत खनिजे, पाण्याचा साठा, धरणातील पाणीसाठा, धरणाची उंची, खोली व पाणी साठवण क्षमता या गोष्टी सदूर संवेदनांचा वापर करून सांगता येतात.
=    वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण, जीवपुरातत्त्व विषयासंबंधित अधिक माहितीसाठी सदूर संवेदनांचा वापर केला जातो.
=    सुदूर संवदेनांमुळे व्यापक व दुर्गम भागाची व्यवस्थित माहिती मिळवता येते. वलीकरण व प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या भूवैशिष्टय़ांचा अभ्यास करता येतो. शिवाय भूकंप, ज्वालामुखी, वणवा, महापूर, वादळे इत्यादी नसíगक आपत्तींचा अभ्यास करता येतो.
कक्षा : उपग्रह पृथ्वीपासून ज्या उंचीवर स्थिर केले जातात, त्यांना ‘कक्षा’ असे म्हणतात. कक्षा दोन प्रकारच्या असतात-  सूर्यस्थिर कक्षा, भूस्थिर कक्षा.
    १) सूर्यस्थिर कक्षा/उपग्रह    
=    या कक्षेत मुख्यत: IRS उपग्रह सोडले जातात.
=    ही कक्षा वर्तुळाकार ध्रुवीय कक्षा असते.
=    या कक्षेतील उपग्रह उत्तर ते दक्षिण असे भ्रमण करतात.
=    हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० ते १२०० कि.मी. एवढय़ा निश्चित उंचीवर सोडले जातात.
=    या उपग्रहाची व्याप्ती क्षेत्र ८१ अंश N ते ८१ अंश S इतकी असते.
भारतीय सुदूर, संवेदन उपग्रह साधारण वर्तुळाकार अशा ध्रुवीय सूर्यस्थिर कक्षेत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० ते १२०० किमी अंतरावर सोडले जातात, ते उत्तर ते दक्षिण या दिशेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतात.
    २) भू-स्थिर कक्षा/उपग्रह  
=    ही कक्षा वर्तुळाकार  विषुववृत्तीय कक्षा असते.
=    या कक्षेतील उपग्रह पश्चिम ते पूर्व असे भ्रमण करतात.
=    हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३५,७८६ किमी अंतरावर सोडले जातात.
=    या उपग्रहाला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास २४ तास लागतात.
डॉ. जी. आर. पाटील – grpatil2020@gmail.com

Story img Loader