केवळ मतपेटीसाठी राजकारणी लोक शहरावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे गावाच्या विकासास राजकारणी महत्त्व देत नाहीत. म्हणूनच शहरात येणाऱ्या लोकांना त्यांच्या मूळ गावीच मतदानाचा हक्क ठेवावा, अशी मागणी करत ‘हिवरेबाजार’च्या माध्यमातून गावाच्या सर्वागीण विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या पोपटराव पवार यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले.
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘अर्धनागरीकरणाचे आव्हान’ या चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी ‘ग्रामीण भागाच्या शहरीकरणाचा अट्टहास कशाला?’ या विषयावरील चर्चासत्रात ते सहभागी झाले होते. लोकसहभागातून गावांचे व्यवस्थापन केले तर शहरांकडे होणारे अनावश्यक स्थलांतर कमी होईल, असा सूर या सत्रात व्यक्त झाला. गावकरी जर सजग राहिले तर गावांचा विकास साधता येतो हे सोप्या उदाहणांतून दाखवून देणाऱ्या पोपटराव पवार यांच्यासोबत ‘बारीपाडा’ या आदिवासी भागाचा कायापालट करणारे चैतराम पवार, परदेशातील आपल्या निवासानंतर तेथील अनुभवांच्या आधारे ‘नेवासे’ गावात सुधारणा आणणारे भरत कर्डक आणि राजकारणीही शाश्वत विकासाचा विचार करू शकतात हे अकलूजच्या माध्यमातून दाखवून देणारे युवा नेते रणजितसिंह मोहिते-पाटील परिसंवादात सहभागी झाले होते.
मतदारसंघ फेररचनेनंतर शहरी भागात मतदार संघ वाढले आहेत. त्यामुळे शहरकेंद्री विकासावरच राजकारणी भर देऊ लागले. अशा वेळी खेडय़ांकडे दुर्लक्ष होते. परिणामी विकास आणि पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात गावातील नैसर्गिक संपत्तीची लूट सुरू असल्याचा आरोप पोपटरावांनी केला.
ग्रामपंचायत सदस्य ते खासदार असा राजकीय प्रवास केलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घराणेशाहीचा फायदा एखाद्या निवडणुकीपुरताच मिळतो, पुढच्या वेळी गुणवत्ता सिद्ध करण्याशिवाय पर्याय नसल्याचे विशद केले. सहकार आणि विक्रेंद्रीकरणातून अकलूज आणि परिसराचा कायापालट झाल्याचे सांगताना हे गाव आज वैद्यकीय सुविधा, पर्यटन आणि उच्च शिक्षणाचे केंद्र झाल्याचे त्यांनी सांगितले.
बारीपाडा येथे आदिवासींसमवेत काम करणाऱ्या चैतराम पवार यांनी गावकऱ्यांनी श्रमदानातून ११०० एकर जंगल सांभाळल्याचे सांगताना आज गाव स्वयंपूर्ण असल्याचे स्पष्ट केले. स्पेन व ऑस्टेलिया येथे काम केल्यानंतर मायदेशी आलेल्या भारत कर्डक यांनी कर्डकवाडी इंटरनेट पोर्टलद्वारे तरुणांना दिशा दाखवली. त्यातून प्रोत्साहन मिळत गेले. सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यास विकास साधता येतो असे त्यांनी सांगितले.
‘नियोजनशून्यतेचे करायचे काय?’ या विषयावर शहर नियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी आव्हान नियोजनशून्यतेचे नसून नियोजनाबद्दलच्या अनभिज्ञतेचे आहे, असे स्पष्ट केले. ‘जोन्स लँग लासेल’ या सल्लागार संस्थेचे आशुतोष लिमये यांनी विकासकामात, नियोजनात माणूस आणि निसर्ग याच महत्त्वाच्या गोष्टींना स्थान दिले जात नाही, याकडे लक्ष वेधले. नागरीकरणाशी आर्थिक विकासही निगडीत असतो हे विविध राज्यांतील नागरीकरणाचे आणि शहराचे दरडोई उत्पन्नाच्या प्रमाणावरून नियोजनतज्ज्ञ विद्याधर फाटक यांनी दाखवून दिले.
शहराच्या विकासाची योजना नेहमी अभियंत्यांकडून तयार केली जाते. हे चुकीचे आहे. या प्रक्रियेत वास्तुरचनाकारांना सहभागी करून घेतले जायला हवे.
रणजितसिंह मोहिते-पाटील
आपली राष्ट्रीय संपत्ती जपण्याबाबत आपण तितकेसे सजग नसतो. त्याऐवजी आपण तो प्रश्न सरकारवर सोडून मोकळे होतो. हे सरकारही आपल्याला आपले वाटत नाही. सरकार आपले न वाटणे ही भावनाच वाईट आहे.
भारत कर्डक, प्राचार्य
नियोजन हा एक प्राथमिक भाग झाला. पण त्याला प्रभावी अंमलबजावणीची व कटिबद्धतेची जोड नसेल तर नियोजनाचे फळ मिळणार नाही.
अजित जोशी
एफएसआय न वाढवणे हे दारूबंदीसारखे आहे. दारूबंदी काळात पिणारे पितच होते. दारुबंदी उठल्यावर देखील ते पीतच होते. तसेच एफएसआय न वाढविल्यामुळे एफएसआयची चोरी झाली. चोरी करणारे आणि करू देणारे दोघांचाही यात फायदा होता.
विद्याधर फाटक
उद्योजक मनुष्यबळाच्या हिताच्या दृष्टीने सोयीची जागा निवडतात. ज्या ठिकाणी उपलब्ध मनुष्यबळामध्ये अधिक उत्पादनशक्ती (प्रॉडक्टिव्हिटी) देण्याची शक्यता असते तिथे गुंतवणूक करण्यास सगळे तयार असतात. मुंबईसारख्या शहरात कामावर येण्यातच दोन तास खर्ची पडतात. तरीही लोक लोकलमधून धक्के खात जाणेच पसंत करतात. कारण रस्त्याने गेल्यास वेळेत पोचण्याची शाश्वती नसते. मुंबईच्या बाबतीत वक्तशीरपणा आणि आराम या दोन्हीचा विचार वाहतुकीच्या बाबतीत होऊच शकत नाही. अशा ठिकाणी उत्पादनशक्ती कशी वाढणार? मनुष्यबळाच्या रूपाने शहरांची उत्पादनक्षमता कमी होत असेल तर तो शहराच्या विकासाला छेद आहे.
आशुतोष लिमये
क्लस्टर डेव्हलपमेंट योजना खरे तर लोकांना एकत्र घेऊन लोकसहभागातून करण्याची योजना होती. पण त्याचा विपरित अर्थ घेतला गेला. चटई क्षेत्र वाढवून मागण्याचा तो मार्ग झाला. आता क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे कॅन्सर नसलेल्या पेशंटला रेडिएशन देण्यासारखा प्रकार झाला आहे. नागरीकरणाबरोबर सुसंस्कृतीकरण होणे अपेक्षित असते. तोच या शब्दाचा अर्थ आहे. पण लोकांचा सहभाग केवळ विरोधापुरताच असल्याचे दिसते. एलबीटी आला व्यापाऱ्यांनी संप केला. एसईझेड नव्या उद्योगांसाठी आला पण आम्ही जमीन देणार नाही, असा पवित्रा घेतला गेला आणि नागरिक किती जबाबदारीने सोयींचा वापर करतात? आज २५ रुपयांचे पाणी ३ रुपयात वापरतो त्याची लाज का वाटत नाही?
सुलक्षणा महाजन
‘गरज नियोजनबद्ध शहरांची’ या परिसंवादातील तज्ज्ञांची मते
भारताचा इतिहास हा गावांभोवती नाही तर शहरांमध्ये घडला आहे. शहरे ही गरज आहे आणि ती असणारच. गावातून शहराकडे येणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे शहरांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलायला हवा व नियोजनबद्ध व स्वत:च्या पायाभूत सुविधा उभारणारी शहरे तयार करायला हवीत.
अजित गुलाबचंद, लवासा.
नवीन शहरे उभारताना १०० टक्के भूसंपादन शक्य नाही. त्यामुळे स्थानिकांना शहरांच्या विकासात सामावून घेऊनच नियोजन करण्याची गरज आहे. स्थानिक व नवीन शहरात राहायला आलेले नागरिक यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठीही ते उपयोगी पडेल.
संजय भाटिया, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
दळणवळणाची व्यवस्था मजबूत करणे नवीन शहरांच्या विकासासाठी आवश्यक आहे. ही साधने नसल्यास शहरांमधील अर्थव्यवस्था उभी राहू शकत नाही. शहर उभारताना इतर शहरे व गावांशी रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्क यांचा विचार प्रामुख्याने व्हावा.
दिलीप शेकदार, नया रायपूर शहराचे नियोजनकार
लहान, स्वत:ची व्यवस्था तयार करणाऱ्या शहरांमुळे उद्योगांचे विकेंद्रीकरण होऊ शकते. त्यामुळे मोठय़ा शहरांवरील भार कमी होईल व स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होईल. मगरपट्टा हे त्याचे आदर्श उदाहरण आहे.
सतीश मगर, मगरपट्टा टाउनशीपचे विकासक