केवळ मतपेटीसाठी राजकारणी लोक शहरावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे गावाच्या विकासास राजकारणी महत्त्व देत नाहीत. म्हणूनच शहरात येणाऱ्या लोकांना त्यांच्या मूळ गावीच मतदानाचा हक्क ठेवावा, अशी मागणी करत ‘हिवरेबाजार’च्या माध्यमातून गावाच्या सर्वागीण विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या पोपटराव पवार यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले.
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘अर्धनागरीकरणाचे आव्हान’ या चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी ‘ग्रामीण भागाच्या शहरीकरणाचा अट्टहास कशाला?’ या विषयावरील चर्चासत्रात ते सहभागी झाले होते. लोकसहभागातून गावांचे व्यवस्थापन केले तर शहरांकडे होणारे अनावश्यक स्थलांतर कमी होईल, असा सूर या सत्रात व्यक्त झाला. गावकरी जर सजग राहिले तर गावांचा विकास साधता येतो हे सोप्या उदाहणांतून दाखवून देणाऱ्या पोपटराव पवार यांच्यासोबत ‘बारीपाडा’ या आदिवासी भागाचा कायापालट करणारे चैतराम पवार, परदेशातील आपल्या निवासानंतर तेथील अनुभवांच्या आधारे ‘नेवासे’ गावात सुधारणा आणणारे भरत कर्डक आणि राजकारणीही शाश्वत विकासाचा विचार करू शकतात हे अकलूजच्या माध्यमातून दाखवून देणारे युवा नेते रणजितसिंह मोहिते-पाटील परिसंवादात सहभागी झाले होते.
मतदारसंघ फेररचनेनंतर शहरी भागात मतदार संघ वाढले आहेत. त्यामुळे शहरकेंद्री विकासावरच राजकारणी भर देऊ लागले. अशा वेळी खेडय़ांकडे दुर्लक्ष होते. परिणामी विकास आणि पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात गावातील नैसर्गिक संपत्तीची लूट सुरू असल्याचा आरोप पोपटरावांनी केला.
ग्रामपंचायत सदस्य ते खासदार असा राजकीय प्रवास केलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घराणेशाहीचा फायदा एखाद्या निवडणुकीपुरताच मिळतो, पुढच्या वेळी गुणवत्ता सिद्ध करण्याशिवाय पर्याय नसल्याचे विशद केले. सहकार आणि विक्रेंद्रीकरणातून अकलूज आणि परिसराचा कायापालट झाल्याचे सांगताना हे गाव आज वैद्यकीय सुविधा, पर्यटन आणि उच्च शिक्षणाचे केंद्र झाल्याचे त्यांनी सांगितले.
बारीपाडा येथे आदिवासींसमवेत काम करणाऱ्या चैतराम पवार यांनी गावकऱ्यांनी श्रमदानातून ११०० एकर जंगल सांभाळल्याचे सांगताना आज गाव स्वयंपूर्ण असल्याचे स्पष्ट केले. स्पेन व ऑस्टेलिया येथे काम केल्यानंतर मायदेशी आलेल्या भारत कर्डक यांनी कर्डकवाडी इंटरनेट पोर्टलद्वारे तरुणांना दिशा दाखवली. त्यातून प्रोत्साहन मिळत गेले. सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यास विकास साधता येतो असे त्यांनी सांगितले.
‘नियोजनशून्यतेचे करायचे काय?’ या विषयावर शहर नियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी आव्हान नियोजनशून्यतेचे नसून नियोजनाबद्दलच्या अनभिज्ञतेचे आहे, असे स्पष्ट केले. ‘जोन्स लँग लासेल’ या सल्लागार संस्थेचे आशुतोष लिमये यांनी विकासकामात, नियोजनात माणूस आणि निसर्ग याच महत्त्वाच्या गोष्टींना स्थान दिले जात नाही, याकडे लक्ष वेधले. नागरीकरणाशी आर्थिक विकासही निगडीत असतो हे विविध राज्यांतील नागरीकरणाचे आणि शहराचे दरडोई उत्पन्नाच्या प्रमाणावरून नियोजनतज्ज्ञ विद्याधर फाटक यांनी दाखवून दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा