मनी पंढरीचा ध्यास, टाळ मृदंगाचा गजर, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी एकनाथ भानुदासाचा जयघोष अशा वातावरणात संत एकनाथ महाराजांची पालखी गुरुवारी पंढरीकडे मार्गस्थ झाली. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांनी पालखीसमोर रिंगण घातले. महिलांनी फुगडय़ांचा फेर धरला. नाथवंशाच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
विठुरायाला भेटण्यासाठी एकनाथांच्या पालखीसमवेत पंढरपूरला जाण्यासाठी औरंगाबाद, जालना, परभणीसह राज्यभरातून भाविक पैठण येथे आले होते. पालखीसोहळ्याचे मार्गदर्शक वसंतमहाराज पांडव यांच्यासह प्रमुखांनी गागाभट्ट चौकासमोर पालखी ठेवली. घंटानाद, काकडा, पवमान, अभिषेक व पंचामृत पूजा करून पालखीचे प्रस्थान करण्यात आले. पालखीचा पहिला मुक्काम चणकवाडी येथे होणार आहे. मान्सून लांबल्याने बळीराजा चिंतातूर आहे. पाऊस न झाल्याने या वर्षी वारकऱ्यांची संख्याही तुलनेने कमी होती. आठ दिवसांत पाऊस झाला तर पेरण्या उरकून वारकरी पुन्हा मार्गस्थ होतील. एकीकडे पालखीची तयारी सुरू होती आणि पावसानेही हजेरी लावली. जोरदार पावसामुळे वारकऱ्यांनी जल्लोष केला. या वेळी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार भाऊसाहेब थोरात, जि. प.चे सभापती रामनाथ चोरमुले, जयाजी सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
नाथमहाराजांची पालखी पंढरीकडे रवाना
मनी पंढरीचा ध्यास, टाळ मृदंगाचा गजर, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी एकनाथ भानुदासाचा जयघोष अशा वातावरणात संत एकनाथ महाराजांची पालखी गुरुवारी पंढरीकडे मार्गस्थ झाली.
First published on: 20-06-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palkhi of nath maharaj departure to pandharpur