पर्यावरणशास्त्र (१)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये सीसॅट- १ मध्ये पर्यावरणशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा घटक अंतर्भूत केलेला आहे.
या घटकाचा अभ्यास करताना विज्ञान परिस्थितीशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना, विविध परिसंस्था, जलीय परिसंस्था, जैवविविधता, जैवविविधतेचा ऱ्हास, भारतातील वन्यजीवन, महाराष्ट्रातील वन्यजीवन, वन्यजीवन संवर्धन कार्य, हवामानबदल, हवामान बदलाशी संबंधित कायदे, पर्यावरणविषयक विविध समस्या अभ्यासाव्यात. शाश्वत विकास पर्यावरण बदलांचा अभ्यास करताना जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींचा अभ्यास करावा.
आज आपण पर्यावरणशास्त्राच्या महत्त्वाच्या घडामोडी समजून घेऊयात..
= शाश्वत विकास : चालू पिढीच्या गरजा शमवण्यासाठी पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता जो विकास घडवला जातो, त्यास शाश्वत विकास असे म्हणतात. १९९२ साली झालेल्या रिओ दि जेनेरीओ (ब्राझील) येथील वसुंधरा परिषदेत अजेंडा- २१ मान्य करण्यात आला व अजेंडा २१ मध्ये शाश्वत विकासासंबंधी विविध शिफारसी सुचवल्या गेल्या.
= कार्बन सिंक्स : वातावरणात कार्बन डायऑक्साइड हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कार्बन डायऑक्साइडमुळे पृथ्वी उबदार राहण्यास मदत होते. जर वातावरणात कार्बन डायऑक्साइड नसता तर पृथ्वी थंड गोळा झाली असती, मात्र वातावरणात ठरावीक प्रमाणापलीकडे वाढलेला कार्बन डायऑक्साइड घातक ठरू शकतो.
वातावरणामध्ये विविध स्रोतांमध्ये उत्सर्जति होणारा कार्बन डायऑक्साइड वातावरणात तसाच साठून राहत नाही. त्यातील बराचसा कार्बन डायऑक्साइड वातावरणातील काही घटकांकडून शोषला जातो. कार्बन सिंक्स म्हणजे पर्यावरणातील असे घटक, जे उत्सर्जति केलेल्या कार्बन डायऑक्साइडचे शोषण करतात.
= पर्यावरणातील महत्त्वाचे कार्बन सिंक्स : १) महासागर- बराचसा कार्बन डायऑक्साइड हा सागरी जलामध्ये विरघळतो. २) वने व फायटोप्लँक्टन. ३) ध्रुवीय प्रदेशात असणारे हिमनग.
= बायो रेमिडिएशन (जैविक पुनरुत्थान) : मानवी हस्तक्षेपामुळे अनेक जैविक परिसंस्था प्रदूषित होतात. या परिसंस्था मूळस्थितीत आणणे आवश्यक असते. प्रदूषित झालेल्या परिसंस्थांना जैविक साधनांचा वापर करून पुन्हा मूळस्थितीत किंवा मूळस्थितीच्या जवळपास आणून पर्यावरणाची हानी भरून काढण्याची प्रक्रिया म्हणजे बायो रेमिडिएशन होय. बायो रेमिडिएशन प्रक्रियेत जैविक साधनांचा वापर करून प्रदूषके पूर्णपणे नष्ट केली जातात किंवा त्याचे रूपांतर हानिकारक नसणाऱ्या किंवा कमी हानिकारक पदार्थामध्ये केले जाते. यामध्ये निसर्गात आढळणाऱ्या जीवाणूंचा- बुरशीचा आणि वनस्पतींचा मनुष्यास हानिकारक असणाऱ्या प्रदूषकांचे विघटन करण्यासाठी वापर केला जातो. बायो रेमिडिएशनच्या दोन पद्धती आहेत-
= इनसिटू (In-Situ) : या प्रक्रियेत मूळस्थानीच प्रदूषकांवर प्रक्रिया केली जाते. ही सर्वात महत्त्वाची बायो रेमिडिएशन पद्धत आहे तसेच ही सर्वात स्वस्त व कमी हानीकारक
पद्धत आहे.
= एक्स सिटू (Ex- Situ) : या पद्धतीत प्रदूषित पदार्थ सर्वप्रथम वेगळे केले जातात. त्यांना मूळस्थानापासून दूर नेले जाते व या प्रदूषकांवर जैविक साधनांचा वापर करून त्यांचे विघटन केले जाते.
लेखन : डॉ. जी. आर. पाटील