विजेत्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि बक्षिसे जिंकल्यानंतर केला जाणारा जल्लोष ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ‘द ब्लू रुफ’ क्लबच्या हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी रंगला होता. निमित्त होते ‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या सांगता सोहळ्याचे. कार, वीणा वर्ल्डकडून सिंगापूरची सहल, टी.व्ही., फ्रीज अशी एकाहून एक सरस पारितोषिके स्वीकारताना विजेत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. ठाण्याच्या वासंती वर्तक ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या. त्यांना पारितोषिक म्हणूर कार मिळाली. तर वीणाज् वर्ल्डच्या सिंगापूर सहलीचे पारितोषिक संतोष भुंडारे यांना मिळाले. मान्यवरांच्या हस्ते या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरसारखी मोठी शहरे, त्यातील ८० हून अधिक गृहोपयोगी वस्तूंच्या शो रूम्सनी घेतलेला सहभाग, २१ दिवसांमध्ये ३० हजारांहून अधिक ग्राहकांनी केलेली खरेदी, अशा भरघोस प्रतिसादामुळे ‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल सर्वाच्याच आकर्षणाचा विषय ठरला होता. या महोत्सवाचा अखेरचा बक्षीस वितरणाचा सोहळा सोमवारी ‘द ब्लू रूफ’ क्लबच्या हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमास इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे सीईओ जॉर्ज वर्गीस, व्हीपी थॉमस झकारिया, तरुणकुमार तिवाडी उपस्थित होते. तर या महोत्सवातील प्रायोजकत्व देणारे उद्योजक, व्यापारी, दुकानांचे मालक उपस्थित होते. त्यामध्ये सॉफ्ट कॉर्नरचे डी. एस. कुलकर्णी, संघवी ग्रुपचे राकेश संघवी, पितांबरीचे दीपक परांजपे, वामन हरी पेठे सन्सचे पुरुषोत्तम गुप्ते, तन्वी हर्बलचे पुष्कराज धामणकर, वीणा वल्र्डच्या सुनिला पाटील, टिप-टॉप प्लाझाचे रोहित शहा, द ब्लू रूफ क्लबचे विल्सन गोम्स आदी मान्यवर उपस्थित होते. ‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या भाग्यवान विजेत्या वासंती वर्तक यांना संघवी ग्रुपचे राकेश संघवी आणि इंडियन एक्स्प्रेसचे सीईओ जॉर्ज वर्गीस यांच्या हस्ते गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. तर संतोष भुंडारे यांना वीणा वल्र्डच्या सुनिला पाटील यांच्या हस्ते सिंगापूर सहलीचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. शेवटच्या दिवसांच्या आणि आठवडय़ाच्या विजेत्यांनादेखील सन्मानित करण्यात आले. या वेळी मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला.
सत्य बातम्या देणे हे ‘लोकसत्ता’चे वैशिष्टय़ असून ‘लोकसत्ता’मध्ये एखादी बातमी प्रसिद्ध झाली म्हणजे ती खरीच असणार हा वाचकांचा विश्वास आहे. मात्र अशा पद्धतीच्या फेस्टिव्हलचे आयोजन मात्र प्रथमच ‘लोकसत्ता’ने ठाण्यात केले. असे शॉपिंग फेस्टिव्हलसारखे उपक्रम वाढावेत अशी अपेक्षा आहे. मुंबई बरोबरीनेच झपाटय़ाने वाढणाऱ्या ठाण्यामध्ये उत्साही आणि कलात्मक वातावरण वाढत असून ठाणे आता फेस्टिव्हलचे शहर म्हणूनदेखील भरभराटीला आले आहे. ‘लोकसत्ता’ने ठाणेवासीयांसाठी सुरू केलेला हा उपक्रम उत्साही वातावरणात भर घालणारा आहे, असे ‘टिप-टॉप प्लाझा’चे रोहित शहा म्हणाले.
सुरेश शिंदे (ठाणे) – फ्रीज, मुकेश मेहता (डोंबिवली) – एलईडी टीव्ही, माधुरी पाटील (ठाणे) – फ्रीज, शिल्पा शृंगारपुरे (ठाणे) – एलईडी टीव्ही, काव्या पाटील (ठाणे) – सुवर्ण राजमुद्रा, चंद्रशेखर क्षीरसागर (ठाणे) – पैठणी, प्रांजली कानिटकर (ठाणे) – सुवर्ण राजमुद्रा, छाया पेलणेकर (ठाणे) – पैठणी, माधवी परचुरे (डोंबिवली) – सुवर्ण राजमुद्रा, अजित देशपांडे (डोंबिवली) – पैठणी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा