टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी गुरुवारी दुपारी देहूतून प्रस्थान ठेवले. संपूर्ण देहू नगरी प्रस्थान सोहळ्यामुळे भक्तिचैतन्यात दंग झाली होती. लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले वारकरी तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत शुक्रवारी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू करणार आहेत. पालखीचा मुक्काम आज इनामदारवाड्यात असेल. 
प्रस्थानापूर्वी शिळा मंदिरात गुरुवारी पहाटे साडेचार वाजता महापूजा करण्यात आली. सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन झाले. दुपारी अडीच वाजता पालखी सोहळ्याच्या प्रस्थान कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रस्थान झाल्यावर मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर फुलांनी सजविलेली तुकाराम महाराजांची पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडली. पालखीसोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्हींच्या माध्यमातूनही सर्वत्र नजर ठेवण्यात येते आहे.
(छायाचित्रे – राजेश स्टिफन)