पंढरपुराची ओढ लागलेल्या वारकऱ्यांची वारी सुखकर व्हावी यासाठी पुण्यातील अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काहींनी वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचारांची सोय केली आहे, काही जणांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे, तर काहींनी पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्र्हिस’च्या रुग्णवाहिका पालखीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असणार आहेत, अशी माहिती या सेवेचे संचालन करणाऱ्या बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष एच. आर. गायकवाड यांनी दिली. पालखी मार्गावर कोणतीही आपत्कालीन वैद्यकीय मदत लागली तर १०८ क्रमांक फिरवल्यास रुग्णवाहिका लगेचच उपलब्ध होणार आहे. योगेश तिवारी मित्र परिवाराच्या वतीने वारकऱ्यांसाठी २२ जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर नारायण पेठेतील निघोचकर मंगल कार्यालयामध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ वेळेत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी दिंडी प्रमुखांनी किंवा वारकऱ्यांनी ९४२१३५०००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परिवारातर्फे करण्यात आले आहे. साई अॅम्ब्युलन्स कॉर्प्सतर्फे २२ जून रोजी मंडई जवळील नेहरू चौकामध्ये सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वारकऱ्यांसाठी मोफत औषधे व प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री नामदेव शिंपी समाज आणि श्री पासोडय़ा विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने पासोडय़ा विठोबा मंदिर येथे पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २१ जून रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. श्री गणेशपेठ पांगुळ आळी व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना सकाळी चहा व खिचडी, तसेच दुपारचे जेवणही देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे.
सलग बारा तास कीर्तनमाला
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने सलग बारा तास नारदीय कीर्तनमालेचे आयोजन लाल महाल येथे करण्यात आले आहे. कीर्तन २२ जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू होईल, अशी माहिती शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.

Story img Loader