संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम असलेल्या भागात रविवारी सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्यास आणि परिसरात वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर सोमवारी सकाळी दोन्ही पालख्या सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून बंद केली जाणार आहे.
संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिर येथे रविवारी मुक्कामाला राहणार आहे. त्या ठिकाणाहून सोमवारी सकाळी अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, ए. डी. कॅम्प चौक, रामोशी गेट चौक, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट चौकी चौक, मम्मा देवी चौक, सोलापूर रस्त्याने गाडीतळ येथून लोणीकाळभोरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पहाटे पाचपासून बंद केली जाणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी रविवारी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामाला राहणार आहे. सोमवारी सकाळी पंढरपूरकडे सोलापूर रस्त्याने प्रस्थान करणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. ही पालखी भवानी पेठ, रामोशी गेट चौकी, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट चौकी, मम्मा देवी चौक, सोलापूर रस्त्याने हडपसरगाडी तळ येथून वळून सासवड मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करेल. सासवड येथून दिवेघाटमार्गे येणारी वाहतूक पहाटे तीन पासून बंद केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. पालख्या जसजशा पुढे जातील त्याप्रमाणे वाहतूक टप्प्या-टप्प्याने सुरू केली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा